प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

सत्ररूप द्वादशाह- द्वादशाह हा यज्ञ जेव्हां पुष्कळ यजमान एकत्र मिळून करितात तेव्हां त्या यज्ञास सत्र अशी संज्ञा प्राप्त होते. त्यात एक मुख्य यजमान निवडला जातो त्यास गृहपति म्हणतात. गृहपति जो ठरेल त्याच्या अरणीवर मंथन करून अग्नि उत्पन्न करावयाचा व गार्हपत्य आणि आहवनीय या दोन रूपानें दोन स्थली त्याची स्थापना करावयाची व इतरांनीं आपले अग्नी तेच आहेत असें मानावयाचें. व्रतदुग्ध (नित्य प्राशन करावयाचें दूध) लौकिकाग्नीवर तापवून आणावयाचें असा एक पक्ष, व कोणाच्याहि एका अरणीवर प्रत्येक ॠत्विजानें मंथन करून निरनिराळे (गार्हपत्य व आहवनीय) अग्नी उत्पन्न करून एकाच गार्हपत्यांत टाकून मग त्यांतील एक भाग आहवनीयांत टाकावयाचा असा दुसरा पक्ष. व्रतदुग्धाबद्दल वरीलच नियम से. सत्राला आरंभ झाल्यावर त्यांत समाविष्ट होण्यासाठीं कोणी एखादा दीक्षित आला तर त्यानें गृहपतीच्या अरणीवर मंथन करून मंथनोत्पादित अग्नीपैकी अर्धा गार्हपत्यांत व अर्धा आहवनीयांत टाकावा. व्रतदुग्धहि वरील सर्वाप्रमाणेंच एकत्र ठेवावें.