प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
वेई घराणें.- ख्रिस्तोत्तर दुस-या शतकाच्या अखेरीस हान घराण्याला उतरती कळा लागली. इ. स. १७३ मध्यें एक भयंकर रोगाची साथ सुरू झाली ती ११ वर्षें चालू राहिली. या प्लेगच्या रोगावर चंगचिओ या धर्मोपदेशकानें एक जादूचा उपाय काढला. त्यामुळें एका महिन्यांत त्याला इतके अनुयायी मिळाले कीं, तो साम्राज्याचा उत्तरेकडील प्रांत बळकावून बसला. परंतु साम्राज्यपद मिळवूं इच्छिणा-या त्सौ. त्सौ नांवाच्या इसमानें त्याचा पराभव केला. व त्याचा मुलगा त्सौ पेइ यानें इ. स. २२० मध्यें स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केलें व आपल्या घराण्याला वेई हें नांव दिलें. परंतु त्याला दुसरे दोघे प्रतिस्पर्धी उत्पन्न झाले. पहिला लिउ पेइ हा अलीकडला स्झे चुएन हा प्रांत बळकावून बसला आणि दुसरा प्रतिस्पर्धी सुन च्वान यानें दक्षिणेंकडील प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. याप्रमाणें या कालविभागांत चीनमध्यें तीन निरनिराळीं राज्यें सुरू झालीं.