प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

मिंग घराणें.- चु युएन चंग हा एका चिनी मजुराचा मुलगा होता. त्यानें पुढारीपणा स्वीकारून जिकडे तिकडे सुव्यस्थित राज्यकारभार करण्याचा प्रयत्न चालविल्यामुळें लोकांनी फारसा विरोध केला नाहीं. १३५५ मध्यें त्यानें नानकिंग घेतलें व दुसरा बराच मुलूख त्याच्या सत्तेखालीं आला पण त्यानें आला पण त्यानें राजा ही पदवी घेतली नाहीं. पुढें १३ वर्षांनीं म्हणजे १३६८ मध्यें उपर्युक्त मोंगल घराणें नष्ट होऊन सर्व चिनी साम्राज्य त्याच्या सत्तेखालीं आलें व त्यानें लोकाग्रहास्तव बादशहा ही पदवी स्वीकारली. पुढें तातारवर स्वारी करून तेथील मोंगलांची सत्ता नष्ट केली. नंतर लाओ तुंग हा प्रांत त्यानें मोंगलांपासून जिंकून घेतला व हुंग वु हें नवें नांव धारण करून आपलें मिंग (तेजस्वी) हें नवें घराणें स्थापन केलें. १३९८ मध्यें हुंग वु मरण पावल्यावर त्याचा नातू किएन वेन हा बादशहा झाला. परंतु राजघराण्यांत आपसांत यादवी माजून युंग लो यानें १४०३ मध्यें किएन वेन याला हांकलून देऊन राज्यपद बळकाविलें. युंग लो नें कोचीन चीन व टाँगकिंग हे प्रांत जिंकून आपल्या राज्यास जोडिले. तो १४२५ मध्यें मरण पावल्यावर दोन वर्षें त्याचा मुलगा हुंग हि हा बादशहा होता व नंतर सुएन ते नांवाच्या इसमानें १४२६-१४३६ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दींत कोचीन चीन बंड करून पुन्हां स्वतंत्र झाला. पुढचा बादशहा चेंग तुंग हा १४३६ मध्यें राजयावर आल्यावर पुढें १४५० मध्यें तातार लोकांच्या पुढा-यानें चीनवर स्वारी करून बादशहाला कैद करून नेलें. पण १४५७ मध्यें लाओ तुंग प्रांतांतील चिनी लोकांनीं तातार लोकांचा पूर्ण पराभव करून बादशहाला परत सोडवून आणिलें. या बादशहाच्या नंतर १४६५ ते १४८८ पर्यंत चेंग व्हा आणि १४८८ ते १५०६ पर्यंत हुंग चि या दोन बादशहाच्या कारकीर्दीं शांततेंत गेल्या.

यानंतरची चेंग ते या बादशहाची कारकीर्द (१५०६-१५२२) फार महत्वाची आहे कारण १५१७ मध्यें कँटन बंदरांत पोतुगीज लोक येऊन उतरले व तेव्हांपासून यूरोपियन लोकांशीं चीनचा संबंध सुरू झाला. शिवाय या कारकीर्दींत चीनमध्यें एक मोठें बंड झाले व त्याचा फायदा घेऊन तातार लोकांनीं चीनवर पुन्हां हल्ले केले आणि जपान देशच्या आरमारानेंहि चीनच्या कांहीं भागावर हल्ला केला. किआत्सिंग (१५२२-१५६७) याच्या कारकीर्दींत हे हल्ले चालू होते परंतु या बादशहाला त्यांचें निवारण करितां आलें नाहीं. नंतरचे बादशहहा लुंग किंग (१५६७-१५७३) व वान लि (१५७३-१६२०) या दोघांनी तातार लोकांनां कांहीं व्यापारी हक्क देऊन व कांहीं जमिनी देऊन सख्य राखिलें. १५९२ मध्यें जपानी लोकांनीं कोरियावर हल्ला केला. पण यावेळीं चिनी आरमारानें जपानी लोकांचा पूर्ण पराभव केला आणि जपाननें तह केला. तथापि १५९७ मध्यें जपानी लोकांनीं कोरियावर पुन्हा हल्ला केला आणि चिनी आरमाराचा पराभव केला. हा विजय मिळाला असूनहि जपानी लोक एकदम कोरिया सोडून गेले, त्यामुळें तो पुन्हा चीनच्या सत्तेखालीं आला. १६०१ मध्यें मत्तेओ रिसि हा ख्रिस्ती मिशनरी चीनच्या दरबारीं गेला व त्याची विद्वत्ता पाहून चिनी बादशहानें शास्त्रीय सल्लागार म्हणून त्याला आपल्या दरबारी ठेवून घेतलें. तो १६१० मध्ये मरेपर्यंत चीनच्या दरबारींच होता.