प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

कुबलाईखान बादशहाचें युएन घराणें :- (इ.स. १२८०-१३६८) १२८० पासून कुबलाईखानानें सर्व चीनवर आपली सत्ता सुरू केली व शित्सु ही पदवी घेऊन युएन घराणें प्रस्थापित केलें. त्यानें आपल्या राजधानीकरितां कानबालिग (खानाचें शहर) या नांवाचें नवीन शहर बसविलें. यावेळी कुबलाईखानाची सत्ता हिंदुस्थान, अरबस्तान व आशियाचा कांहीं पश्चिम भाग याखेरीज बाकी नीपर नदीपर्यंतच्या सर्व देशांतील मोंगल राजे त्याचें सार्वभौमत्व कबूल करून त्याला निमुटपणें खंडणी देत असत. याच्याच कारकीर्दींत मार्कोपोलो यानें चीनला भेट दिली कुबलाईखानानें सुज्ञपणानें राज्यकारभार केला. अनेक लोकोपयोगी सार्वजनिक कामें केलीं, वाङ्मयाला उत्तेजन दिलें व गरीब लोकांच्या आपत्ती दूर केल्या. तथापि तो परकी असल्यामुळें चिनी प्रजेचें त्याच्यावर प्रेम नव्हतें. कुबलाईखान १२९४ मध्यें मरण पावला व नंतर १३१२ पर्यंत दुसरे दोन चार बादशहा होऊन त्या सालीं जेनत्सुंग हा राज्य करूं लागला. त्यानें कान्फ्यूशियस या सुप्रसिद्ध चिनी पुरूषाबद्दल बहुमान दाखविला व मोंगल लोकांबरोबर चिनी लोकांनांहि मोठमोठ्या अधिकाराच्या जागांवर नेमिले. यामुळें चिनी प्रजा संतुष्ट होऊन त्याची कारकीर्द शांततेंत व भरभराटींत गेली. तो १३२० मध्यें मरण पावल्यावर १३६८ पर्यंत कित्येक नालायक व व्यसनी मोंगल बादशहा झाले. शेवटीं चु युएन चंग याच्या नेतृत्वाखालीं चिनी लोकांनीं बंड केले व या मोंगल घराण्याची सत्ता नष्ट केली.