प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बौद्धसंप्रदाय व दक्षिण हिंदुस्थान.- बुद्धाच्या संप्रदायाचा दक्षिण हिंदुस्थानांत प्रसार कसा झाला हें येथें थोडक्यांत सांगितलें पाहिजे. याविषयीं के. व्ही. सुब्रह्मण्य अय्यर यांनीं एका लेखांत (इं. अँ. पु. ४०) विवेचन केले आहे तें योग्य ते फेरफार करून देतों.
अशोकपूर्वकालीं पांड्यांचा बौद्ध पंथाशीं परिचय.- महावंशांत अशी माहिती आहे कीं, विजय हा उत्तर हिंदुस्थानांत एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्यानें सिंहलद्वीपावर स्वारी करून तें बेट आपल्या ताब्यांत घेतलें. नंतर त्यानें शेजारच्या पांड्य राजाशीं मैत्री करून तेथील राजकन्येशीं विवाह केला. विजय आणि गौतम हे दोघेहि शाक्य वंशांतले आहेत असें बौद्ध भिक्षूंनीं भासविल्यामुळें व तेथे ब्राह्मणांचा प्रवेशच न झाल्यामुळें सिंहली राजानें बौद्ध मताचा स्वाभाविकपणेंच स्वीकार केला असावा असें मानण्यास हरकत नाहीं; व पांड्य लोकांनीं जरी बौद्धमताचा स्वीकार केला नसला, तरी त्या मताविषयीं त्यांनां माहिती असली पाहिजे.