प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बौद्ध व जैन संप्रदायांच्या दक्षिणेंत झालेल्या -हासाचीं कारणें.- बौद्ध व जैन संप्रदायांचा -हास होण्याला खालील गोष्टी कारणीभूत झाल्या:- (१) सातव्या, आठव्या आणि नवव्या शतकांत जैन आचार्यांची संख्या बरीच वाढली. उलट पक्षीं बौद्ध पंथाचे खरे पुढारी कोणी राहिले नव्हते; व राजांकडूनहि त्या संप्रदायाला मदत झाली नाहीं. (२) जैन व बौद्ध मतांच्या प्रसारकांस अनुयायांची संख्या वाढविण्याची हांव सुटून त्या त्या पंथांतील राजांच्या अधिका-यांनीं लोकांवर सक्ति करण्यास सुरुवात केली. तेव्हां लोकहि आपला पक्ष सांवरून धरण्याकरीतां आणि अधिका-यांपासून आपली सुटका करून घेण्याकरितां दुस-याच्या मदतीची अपेक्षा करूं लागले. ह्याच सुमारास शैव पंथाचे ज्ञानसंबंध, तिरुनावुक्करशु व सुंदर, वैष्णवपंथाचे नम्मालवार, मधुरकवि व तिरुमंगै आणि अद्वैतमताचे प्रख्यात शंकराचार्य आणि मणिक्कवाचगर हे पुढारी उदयास आले; व त्यांनीं दक्षिणेंत फिरून आपआपल्या पंथांचा प्रसार केला. (३) पल्लव आणि पांड्य राजांनां अनुक्रमें अप्पर आणि ज्ञानसंबंध यांनीं शैव पंथाची दीक्षा दिल्यामुळें जैन पंथाला तामीळ देशांतून पुरताच खो मिळाला. (४) वर दिलेल्या शैव, वैष्णव आणि अद्वैत मतांच्या पुढा-यांनीं निरनिराळ्या जागीं मठस्थापना करून इ. स. च्या ९ व्या शतकानंतर थोडक्याच वर्षांत दोन्ही पंथांनां नामशेष करून टाकल्यासारखें केलें. (५) म्हैसूरमध्यें जैन पंथ आणखी तीन शतकांपर्यंत होता. परंतु इ. स. च्या १२ या शतकांत लिंगायत किंवा वीरशैव पंथ पुढें आला. या पंथांतील पुढा-यांनीं व इ. स. च्या १२ व्या शतकांत झालेल्या वैष्णवांच्या रामानुज नांवाच्या आचार्यानें जैनपंथाची कानडी देशांतून कायमची हकालपट्टी केली. येथपर्यंत बौद्ध संप्रदायाची त्याच्या जन्मदेशांतील स्थिति कशी काय होती याचें विवेचन झालें. आतां सरहद्दीवरील व हिंदुस्थानाबाहेरील बौद्ध संप्रदायाच्या प्रसाराचा हिशेब घेऊं.