प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बुद्धाचें जातिभेदासंबंधाचें कार्य. - गौतमास जातिभेदाचा द्वेष्टा व समानतेचा पुरस्कर्ता असें म्हणतां येत नाहीं. त्यानें आपल्या भिक्षूंच्या संघांत न्हाव्यास घेतलें किंवा चांडालास घेतलें अशा त-हेचा पुरावा आणल्यानें त्याची जातिभेदविषयक वृत्ति स्पष्ट होत नाहीं. अविवाहित भिक्षूंच्या संघांत कोणीहि कां येईना, त्यानें समाजव्यवस्थेंत फरक पडत नाहीं. तेव्हां आपण त्याची विवाहविषयक वृत्ति काय होती हें शोधलें पाहिजे. विवाह करणेंच चांगले नाहीं आणि गृहस्थाचें मुख्य कर्तव्य भिक्षूस शिधा देणें हें होय अशी त्याची सामान्यतः विवाहविषयक वृत्ति होती. अंबठ्ठसुत्तांत त्यानें आपल्याशीं वादविवाद करणा-या ब्राह्मणांस तुम्ही ब्राह्मण क्षत्रियवैश्यांच्या मुलींबरोबर लग्नें करतां म्हणून निर्भत्सना केली आहे; आणि आपल्या कुलाच्या शुद्धतेविषयीं सांगतांना, आमच्या पूर्वजांनीं जातीबाहेर लग्ने करणें टाळण्यासाठीं भावाबहिणींचा संबंध केला असे उद्गार काढले आहेत. एवंच त्यास भावाबहिणींनीं लग्न करणें हें जातीबाहेर लग्न करण्यापेक्षां अधिक बरें वाटे. त्यानें जातिभेदाविरुद्ध चळवळ मुळींच केली नसून ब्रह्मणांविरुद्ध मात्र चळवळ केली. ब्राह्मणांच्या ज्ञानांत अर्थ नाहीं, ब्राह्मणांची जात क्षत्रियांच्या खालीं आहे, ब्राह्मण हीन कुलांतले आहेत, इत्यादि वाक्यें तो वारंवार बोले. म्हणजे त्याची जातिभेदाविरुद्ध ओरड नसून त्याच्यामध्यें ब्राह्मणमत्सर मूर्तिमंत वास करीत होता असें दिसतें.