प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धाची ज्ञानविषयक वृत्ति.- बुद्धास अज्ञानमूलक पूर्वग्रहांचा द्वेष्टा असेंहि म्हणतां येणार नाहीं. त्यास प्रत्ययावर रचलेलें ज्ञान नको होतें. ग्रहणें वर्तविणें, गणित करणें, औषधिज्ञान हीं फार हलकीं, यांत सर्व प्रकारचा विटाळ भरला आहे, असें त्याचें मत होतें. आणि असल्या गोष्टींपासून मी अलिप्त आहें याबद्दल तो गर्व बाळगीत होता. त्याची शास्त्रद्वेष्टी विचारपद्धति येणेंप्रमाणें होतीः ब्राह्मणांचीं शास्त्रें शिकाल तर तुम्ही अधोगतीस जाल; कां कीं, ब्राह्मणांचीं शास्त्रें अनुभवावर रचलीं आहेत. अनुभव म्हणजे काय, तर पदार्थ आणि इंद्रिय यांचा संनिकर्ष. पण पदार्थ आणि इंद्रिय यांचा संनिकर्ष झाल्यानें वासना उत्पन्न होते, आणि वासना म्हणजे सर्व अधोगतीचें कारण होय. म्हणून अनुभवमूलक शास्त्रें शिकाल तर तुम्हांस वासना उत्पन्न होऊन तुम्ही अधोगतीस जाल. गौतमास त्या वेळच्या अज्ञानाचा द्वेष्टा न म्हणतां, ज्ञानसंचयाचा द्वेष्टा व अडाणी लोकांच्या टोळींत बसून ज्ञानी वर्गाची चेष्टा करणारा म्हटलें पाहिजे. तो स्वतः गूढ ''शास्त्रें'' किंवा फलज्योतिष असल्या प्रकारच्या विद्यांचा व्यापार करण्याच्या पापापासून मुक्त नव्हता. जेव्हां त्यास भेटल्यास आलेल्या एका तरुणास शरीरलक्षणांवरून बुद्ध हा महापुरुष आहे असें वाटूं लागलें, आणि महापुरुषाचें आणखी एक लक्षण म्हणजे गुह्येंद्रियाचा विशिष्ट आकार हे मानलें जात असल्यामुळें ते लक्षण गौतमास आहे किंवा नाहीं याविषयीं संदेह उत्पन्न झाला. तेव्हां आपल्या महत्त्वास साधक असें प्रमाण त्यास दाखविण्यासाठीं गौतमानें त्यास आपलें गुह्येंद्रिय उघडून दाखविलें ! असो.

या त-हेच्या सर्व गोष्टी लक्षांत घेतल्या म्हणजे बुद्धाचे स्वरूप चांगले ध्यानांत येतें. बुद्ध विद्वान् नव्हता, मोठा सात्विक मनुष्य नव्हता, किंवा विशिष्ट नीतिमत्तेचा आग्रहीहि नव्हता. हे सर्व त्याचे गुण त्याच्या मतप्रसारास सहाय्यक झाले. तो विशिष्ट तत्त्वाचा आग्रही असता तर त्यास संप्रदायप्रसारांत यश आलें असतें कीं नाहीं याची शंकाच आहे. जेव्हां अनेक भिक्षू गोळा करावयाचे, त्यांच्या निर्वाहासाठीं मोठमोठ्या रकमा जमवावयाच्या आणि मालमत्ता मिळवावयाची तेव्हां त्या मनुष्यास तत्त्ववेत्तेपणापेक्षां मुत्सद्दीपणा पतकरावा लागतो; आणि ज्या गोष्टी त्यास अयोग्य वाटत असतील त्याहि कराव्या लागतात. गौतमाचें असेंच झालें असावेसें दिसतें. ज्याप्रमाणें लूथरला धर्म सुधारावयाचा असतां राजाश्रय मिळविण्यासाठीं दोन बायका करण्यास अनुकूल असा एका राजाला शास्त्रार्थ काढून द्यावा लागला, त्याप्रमाणेंच अनेक गोष्टी गौतमास कराव्या लागल्या असतील. गौतम संघचालक आणि धर्मोपदेशक असल्यामुळे त्यास विचार आणि आचारण यांत येणारी असंगति पतकरावी लागली असें दिसतें. आमच्या मतें गौतमाची अपूर्वता ज्ञानमूलक किंवा आचरणमूलक नसून संघचालकत्वमूलक होती.

संघचालकत्वामुळें गौतमावर येणा-या अपवादांचे निराकरण करतां येईल हें खरें, तरी तेवढ्यानें तो दोषापासून अजीबात सुटतो असें मात्र नाहीं. तथापि त्यामुळें तो फारसा मोठा दोषी ठरत नाहीं, एवढें मात्र कबूल केलें पाहिजे. त्याची जातिभेदविषयक वृत्ति जरी केवळ मत्सरप्रेरित असली, तरी तो त्यामुळें मोठ्या दोषाला पात्र होतो असें नाहीं. सामाजिक चळवळींत अंग ठेवणा-या पुष्कळ लोकांची वृत्ति वरिष्ठ वर्गाविषयीं मत्सरयुक्त असते; आणि तो मत्सर त्यांस जातिभेदाविरुद्ध बोलावयास प्रेरणा करतो. अशी एकंदरींत स्थिति असतां त्याबद्दल एकट्या गौतमासच दोष कशाला ? गौतम या बाबतींत वाईट दिसण्याचें कारण एवढेंच कीं, अलौकिक सदगुण त्यावर लोकांनीं विनाकारण लादले. आणि अलौकिकत्वाच्या दृष्टीनें त्याचें परीक्षण करूं लागलें म्हणजे त्याचें वैगुण्य विषयक ठळकपणें दिसून येते. आचरणानें केवळ सामान्य मनुष्य व धंद्यानें मुत्सद्दी या त-हेचीच दृष्टि गौतमाच्या आयुष्याचें परीक्षण करतांना ठेवली, म्हणजे गौतम वाईट मनुष्य मूळींच दिसत नाहीं.