प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बुद्धअजातशत्रुसंवाद - ''अशा प्रकारचें संभाषण झाल्यावर अजातशत्रु राजा भगवान् बुद्धास म्हणाला : 'अगदीं उत्तम, भगवान, फार छार गोष्ट ! ज्याप्रमाणें एखाद्या मनुष्यानें पडत्यास आधार देऊन उन्नत करावें, किंवा एखाद्याने हरवलेली वस्तु परत आणून दाखवावी, किंवा आडमार्गानें जाणा-यास योग्य मार्ग दाखवावा, किंवा अंधारांत चांचपडत असलेल्यास वस्तूंचीं स्वरूपें ज्ञात होण्याकरितां दिवा दाखवावा, त्याप्रमाणें भगवानांकडून मला सत्याचें स्वरूप ज्ञात झालें. म्हणून आतां मी बुद्ध, धर्म व संघ यांस शरण आलों आहे. शरीरांत प्राण आहे तोंपर्यंत मी बुद्धाचा शिष्य राहीन म्हणून आपणांस शरण आलों आहे, माझा स्वीकार व्हावा. प्रभो अत्यंत दुर्बल, मूर्ख असा जो मी त्या माझ्या हातून साम्राज्यतृष्णेमुळें पितृवधाचें अघोर पाप घडलें, मी त्या परमपुज्य, सन्मार्गी राजाचा वध केला ! भगवानांनीं माझ्या हातून घडलेल्या घोर अपराधाची चुकी पदरांत घ्यावी. ह्या योगानें मृत्युकालपर्यंत माझ्या मनावर माझा ताबा राहील.'
'खरोखर, राजा, अशा त-हेचें कृत्य तुझ्या हातून घडण्यांत मोठें पाप झालें आहे. परंतु ज्या अर्थी स्वमुखानें आपल्या हातून घडलेल्या पापाची तूं कबुली देत आहेस त्या अर्थीं तुझा आम्ही स्वीकार करतों.
'कारण, राजा, सत्पुरुषांनीं घालून दिलेल्या आचारधर्मांत असें सांगितलें आहे कीं, जो कोणी आपला अपराध जाणतो व कबूल करतो तो भविष्यकाली मनःसंयम करूं शकेल.'
अशा रीतीनें संभाषण झाल्यावर, राजा अजातशत्रु बुद्धास म्हणाला,
'भगवान आतां रजा घेतों. कारण आम्हांला बरीच कामें करावयाचीं आहेत.'
'राजन, जा, व तुला योगय दिसतील तींच कृत्यें करीत जा.'
बुद्धाच्या वरील शब्दांनीं राजा संतुष्ट व आनंदित होऊन आपल्या आसनावरून उठला व बुद्धास नमस्कार करून त्याच्या डाव्या बाजूनें निघून गेला.
राजा अजातशत्रु निघून गेल्यावर बुद्ध शिष्यास म्हणाला, 'बंधूंनों, ह्या राजाला अंतःकरणापासून वाईट वाटलें आहे. परंतु ह्यानें जर आपल्या पूज्य बापाचा-सदाचारी राजाचा-वध केला नसता तर येथें तो बसला असतांना त्याला सत्याविषयीं अत्यंत सूक्ष्म व निष्कलंक दृष्टि उत्पन्न झाली असती.'
अशा रीतीनें बुद्धाचें वचन ऐकून भोंवतालच्या शिष्य मंडळीस धन्य वाटलें व आनंद झाला.'
बुद्धाचें हें अजातशत्रूशीं वर्णन केलेलें वर्तन वाचून आज पुष्कळांस आश्चर्य वाटेल. या बुद्धाच्या वर्तनावर व्हिन्सेंट स्मिथ येणेंप्रमाणें टीका करतो:-
''वरील कथेंतील शिष्यांच्या आनंदाबद्दल व संतोषाबद्दल सहानुभूति वाटणें कठिण आहे. पितृबधासारख्या अघोर व भयंकर साहसकर्माबद्दल बुद्धासारख्या महान् नीतितत्त्वांच्या उपदेशकानें निर्भीडपणें, कसल्याहि प्रकारची भीति न बाळगतां गंभीर शब्दांनी राजाची निर्भत्सना केली असेल अशी वाचकाची अपेक्षा असते; परंतु वरील कथानकांत तसा कांहींच प्रकार दिसून न येतां त्याऐवजीं एखाद्या खूषमस्क-याच्या तोंडीं शोभेल अशी दरबारी भाषा व वर्तन बुद्धाच्या ठिकाणीं आढळून येतें. वरील अपराधी राजाच्या पश्चात्तापाबद्दल व मनौधैर्याबद्दल आपलें मत कांहीं कां असेना, एवढी गोष्ट मात्र निश्चित आहे कीं, एकंदर बौद्ध कथांवरून वरील आख्यायिकांचें मूळ म्हणजे अजातशत्रूच्या हातून बापाचा वध ही गोष्ट मात्र सत्य असल्याबद्दल प्रतीत होतें.''
गौतम, अजातशत्रू व त्याचा मामा कोसलाधिप प्रसेनजित् यांचा परस्परसंबंध जो जातकांवरून दिसतो तो सूक्ष्मतेनें विचार करण्यासारखा आहे. आपल्या मेव्हण्याचा-बिंबसाराचा-नाश केला म्हणून भाच्याविरुद्ध-अजातशत्रूविरुद्ध-कोसलाधिप रागावला, व त्यामुळें दोघांत युद्ध झालें. राजनीतींत खासगी प्रेमाच्या नात्यांस कोठें वाव असतो ! पुढें या भांडणांत बौद्ध भिक्षू पडले व या बौद्ध भिक्षूंच्याच योगानें प्रसेनजित् यास विजय मिळाला, हें वट्टकी सृकर व तच्छ सूकर जातक यांवरून स्पष्ट दिसतें. याचा सूड अजातशत्रूनें पुढें शाक्य लिच्छवी यांचा समूळ उच्छेद करून उगविला. अशा त-हेनें हे भिक्षू राजकारणांत पडले होते. प्रसेनजित् यास 'मल्लिका' नांवाची सुस्वरूप माळीण मिळवून देण्यांत गौतमानें साहाय्य केलें होतें, व त्यामुळेंच गौतमाचा राजवाड्यांत प्रवेश झाला.