प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
निर्वाणवर्ष ख्रि. पू. ४७७ कीं ४७८- इंडियन अँटिक्वरीच्या १९१४ सालांतील आगस्ट महिन्याच्या अंकांत महावीराचा निर्वाणकाल ठरवीत असतां, ख्रि.पू. ४७७ हें बुद्धाच्या निर्वाणाचें साल असलें पाहिजे असें प्रो. शार्पेन्टिये यांनीं निर्णीत केलें आहे. हा निर्णय त्यांनीं ज्या पुराव्यांवरून केला त्यांतील महत्त्वाचे मुद्दे वर आलेच आहेत. ख्रि. पू. ४७७ हा बुद्धाचा निर्वाणकाल धरला असतां मरणाच्या वेळीं त्याचें वय ८० वर्षाचें होतें ही गोष्ट जरी त्यांच्या निर्णयास अनुकूल पडते, तरी त्या सालच्या फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस, म्हणजे निर्वाणशकाच्या आरंभदिवशीं, रविवार किंवा सोमवार येत नसल्यामुळे, ते साल धरणें बरोबर होणार नाहीं. ख्रि. पू. ४७८ हें निर्वाणाचें वर्ष मानिलें असतां बुद्धाच्या वयास मरणाच्या वेळीं ७९ वर्षें झालीं होतीं असें म्हणणें प्रापत होतें खरें. परंतु त्याचे निधन ईत्झन शक १४८ (वर्तमान) या वर्षीं झालें असें मानलें असतां तिथि, वार, नक्षत्र व शक यांविषयीं सर्व अडचणी दूर होतात.