प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धजन्म - बुद्धाविषयीं ऐतिहासिक संशोधन मात्र फारसें झालेलें नाहीं. बुद्धाविषयीं निश्चित माहिती एवढीच देतां येईल कीं बुद्धाचा जन्म ख्रि. पू. ५६० या सालीं किंवा त्या सुमारास झाला. कपिलवस्तु नांवाच्या प्राचीन नगराजवळ लुंबिनी नांवाच्या राईंत बुद्ध जन्मास आला. कपिलवस्तु नगराचे अवशेष ब्रिटिश हद्दीपलीकडे दक्षिण नेपाळांत दाट तराईंत आहेत. ही तराई संयुक्त प्रांतांतील वस्ती जिल्ह्याच्या उत्तरेस कांहीं मैलांवर आहे. बुद्धाचें जन्मस्थान १८९५ सालाच्या पूर्वीं निश्चित झालेलें नव्हतें. या सालीं सदरील लुंबिनी राईंत बौद्ध राजा अशोक यानें उभा केलेला स्तंभ सांपडला, व त्यायोगें बुद्धाचें जन्मस्थान निश्चित झाले. हा स्तंभ त्या राजानें आपल्या यात्राप्रसंगीं उभा केला होता. अशोकानें आरंभिलेल्या यात्रेचा हेतु बुद्धानें आपल्या जिवंतपणी आपल्या कृतींनीं अथवा केवळ वस्तीनें जीं स्थानें पावल केली होतीं त्यांतील मुख्य मुख्य स्थानें पहावीं आणि तेथें उपासना करावी हा होता. अशोकाच्या यात्रेचा मार्ग पाटलिपुत्र म्हणजे त्याचें राजधानीचें नगर, त्यानंतर लुंबिनीवन व कपिलवस्तु, बुद्धगया, सारनाथ, बनारसचा आसमंत भाग, श्रावस्ती, कुशनगर व इतर पवित्र स्थानें याप्रमाणें होता. या स्थानांपैकीं कांहींचीं ठिकाणें अद्यापि बरोबर निश्चित झालेलीं नाहींत. या प्रत्येक स्थानावर त्यानें स्तंभ बांधिले किंवा स्तूप बांधून काढले. या स्तंभांवर अथवा स्तूपांवर आपल्या आगमनाची तिथ आणि त्या त्या स्थानीं बुद्धाच्या जीवनाचा संबंध कोणता आला ती गोष्ट तो लिहवीत असे. लुंबिनी वनांतील स्तंभावर जें लिखाण आहे तें निर्व्यंग असून त्यांतील अक्षरें तीं कोरलीं गेलीं तेव्हांइतकींच आजहि स्वच्छ व सुवाच्य आहेत. एवढेंच कीं, कांहीं शब्दांचा अर्थ नीट लागत नाहीं. हा शिलालेख येणेंप्रमाणें:-

'राजा देवनांपिय-पियदस्सी यानें त्याच्या अभिषेकाच्या विसाव्या वर्षी हें स्थान आपल्या खुद्द स्वारीच्या आगमनानें पुनीत केलें. या ठिकाणीं शाक्य मुनि बुद्ध जन्मास आला म्हणून त्या राजानें या ठिकाणाभोंवती दगडी प्राकार उभा केला, व येथें एक दगडी स्तंभ उभारला. तो पुण्यश्लोक येथें जन्मला म्हणून राजानें लुंबिनी गांवाला सा-याची माफी दिली आणि धान्याच्या आठव्या (राज) भागाची मालकी त्याजकडे दिली.'

बुद्धाच्या चरित्राचें ऐतिहासिक निरीक्षण करण्यासाठीं आपण त्याच्या चरित्राचे योग्य येणेंप्रमाणें पाडूं:-
(१)  बुद्धाचें वैयक्ति चरित्र,
(२)  बुद्धाचें जातिभेदासंबंधाचें कार्य,
(३)  बुद्धाचें विचार व शिस्त यांचा प्रवर्तक या नात्यानें कार्य.

या तीन गोष्टीपैकीं येथें प्रथम त्याच्या वैयक्तिक चरित्राकडे लक्ष देऊं.