प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धाची वेदांविषयीं वृत्ति - बुद्धाची वेदांविषयीं वृत्ति अनिश्चित होती. वेदांत काय असावें याची त्यास कल्पना होती असें म्हणण्यास पुरावा नाहीं. त्यास संस्कृत येत होतें कीं नव्हतें याविषयीं संशयच आहे. पांडित्याच्या अभावामुळें वेदांस निश्चयाने विरोध करण्याचें साहस गौतमास करतां आलें नसावें. कश्यपसुत्तांत त्यानें मंत्रदृष्ट्या ॠषींस ब्रह्मज्ञान कोठें होतें असें म्हणून वेदांचा उपहास केला आहे. तर जातकांत प्रारंभींच आपला उपदेश वेदांचें सार होय म्हणून म्हटलें आहे.