प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धाचें वैयक्तिक चरित्र - वैयक्तिक चरित्रासंबंधीं अज्ञानच असतें तर जी माहिती मिळाली ती दिली म्हणजे भागलें असतें. पण आजची गोष्ट तशी नाहीं. बुद्धास अवतार बनविणारें व अत्यंत लोकप्रिय झालेलें असें ललितविस्तर म्हणून जें काव्य प्रसिद्ध आहे, त्यानें काव्याचा नायक बुद्ध हा उत्तम त-हेनें सजविला आहे. रामायण ज्याप्रमाणें रामाची कथा आहे तशीच सांगत असेल असा विश्वास नाहीं, त्याप्रमाणेंच ललितविस्तराचीहि गोष्ट होय. काव्याचा नायक सजविणें आणि लोकांत भक्ति वाढवावी म्हणून लिहिणें या दोन्ही हेतूंचा ललितविस्तरावर परिणाम झाला आहे. हे दोन्ही हेतू ऐतिहासिक सत्यास विरोधी आहेत. तथापि ललितविस्तराचें म्हणणें काय आहे हे दिल्याशिवाय पुढें जाणें योग्य नाहीं. ललितविस्तराचा गोषवारा येणेंप्रमाणें:-