प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
बुद्धचरित्रावरील वाङ्मय - गौतम बुद्धाचें चरित्र चांगलें सूक्ष्मपणें अजून लिहिलें गेलें नाहीं. त्याच्या चरित्रावर अनेक भाषांतून ग्रंथ आहेत. तथापि सामान्यपणें असा प्रकार होतो कीं, बहुतेक चरित्रें अनुयायी व भक्त मंडळींनीं लिहिलेलीं आहेत. शिवाय बुद्धाची खरी ऐतिहासिक कल्पना करतांना जो दुसरा पक्ष ब्राह्मणांचा त्याविषयीं यूरोपीय लेखकांमध्यें फारसें प्रेम पाघळत होतें असें नाहीं. यूरोपीय संस्कृत पंडितांचा वर्ग बौद्ध वाङ्मयाशीं अथवा पाली भाषेशीं अपरिचित असे आणि पाली ग्रंथांचे अभ्यासक संस्कृत वाङ्मयाकडे दुर्लक्ष करीत. बुद्धाची कामगिरी पहावयाची म्हणजे ती तत्कालीन बौद्ध तसेच श्रौतधर्मी, उपनिषद्मागीं व जैन यांचे ग्रंथ पाहून अजमाविली पाहिजे. महाराष्ट्रीयांपैकीं बौद्धवाङ्मयाशीं परिचित वर्ग फार थोडा आहे. त्यांतल्या त्यांत ब्राह्मणी भिक्षुकीच्या विरुद्ध असलेला वर्ग असें समजे कीं, पूर्वींच्या ब्राह्मणी लुच्चेगिरीवर गौतमानें प्रहार केले म्हणून गौतमाची तारीफ करणें योग्य आहे. जातिभेदाच्या विरुद्ध असलेला वर्ग असें समजे कीं, जातिभेद बुद्धानें बंद केला पण ब्राह्मणांचा पुन्हां वरचष्मा झाल्यामुळें तो प्रज्वलित झाला. अशा समजुती पसरल्यामुळें बुद्धसंबंधीं आणखी अनुकूल मत उत्पन्न झालें. आणि ब्राह्मणाब्राह्मणेतर वादांत बुद्ध हा ब्राह्मणेतरांच्या हातांतील हुकुमाचा एक्का झाला. याशिवाय ख्रिस्ती लोक आपल्या ख्रिस्ताचें नांव पुढें करूं लागले, म्हणजे आपल्याकडील कोणाचें तरी नांव पुढें केलें पाहिजे आणि तें बरेच मोठें असलें पाहिजे अशी भावना लोकांत असल्यामुळे, बुद्ध हा सर्वांनांच वर्णनीय झाला आणि बुद्ध चरित्राचें सूक्ष्म निरीक्षण मात्र राहिलें.