प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्धाचा काल.- बुद्धाच्या जन्माचा काल ख्रि. पू. ५६० धरतात. हा जन्मकाल तो ऐशीं वर्षें जगला आणि ख्रि. पू. ४८० सालीं निर्वाणाप्रत गेला या दोन विधानांवरून ठरवितात. तथापि ख्रि. पू. ४८० हें त्याच्या मृत्यूचें साल निश्चितपणें ठरलेलें नाहीं. परंतु एकंदरींत कांहीं वर्षांच्या फरकानें ५६०-४८० हाच त्याचा हयातकाल धरण्यास हरकत नाहीं असें अभ्यासकांचें मत आहे. मृत्युकाल निर्णयार्थ अनेक वादविवाद झाले आहेत त्यांपैकीं कांहींचा गोषवारा येथें देतों.