प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

पोषाख व आचारनियम.- हिंदुस्थानांतील बौद्ध भिक्षूंचा पोषाख प्रथमतः पिवळ्या रंगाचा असे; परंतु कालांतरानें ते तांबूस रंगाची वस्त्रें वापरूं लागले. आरंभीं बौद्ध भिक्षू अरण्यामध्यें किंवा गुहांमध्यें राहून मतप्रचाराच्या कामासाठीं बाहेर हिंडत असत. पावसाळ्यामध्यें मात्र ते मतप्रचाराचें काम बंद ठेवून कोठें तरी एकत्र वास्तव्य करीत. पुढें पुढें धार्मिक बौद्ध गृहस्थ भिक्षूंसाठीं स्वखर्चानें वसतिगृहें बांधून देऊं लागले. अशा वसतिगृहांनां विहार अशी संज्ञा होती. व कांहीं काळानें बौद्ध भिक्षू अरण्यांत रहाण्याचें सोडून देऊन या विहारांमध्येंच निरंतर राहूं लागले. अशा प्रकारें मठ बांधण्याची पद्धत प्रचारांत आली. बौद्ध भिक्षू आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून करीत; परंतु भिक्षा मागते वेळीं कांहींएक बोलावयाचें नाहीं असा निर्बंध होता. ते दुपारीं फक्त एकदां भोजन करीत. तूप, लोणी, मध, साखर यांचा उपयोग फक्त आजारीपणांत करण्यांत येई.