प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
दक्षिणेकडील व उत्तरेकडील बौद्ध दंतकथा व कर्नचे विचार - दक्षिणेंतील बौद्धांनां संमत असलेला ख्रि. पू. ५४३ हा बुद्धाचा काल बरोबर आहे असें मत जेव्हां टर्नर यानें दिलें तेव्हां तो काल बहुतेक सर्वमान्य झाला. तथापि हा काल मान्य असलेल्या लोकांनांहि, यांत ६० वर्षांची चूक आहे हें कबूल आहे. टर्नर साहेबांचें मत दक्षिणेकडील बौद्ध ग्रंथांच्या आधारावर रचलेलें आहे.
दक्षिणेकडील बौद्ध ग्रंथ उत्तरेकडील बौद्ध ग्रंथांपेक्षां जास्त विश्वसनीय आहेत हें जरी कबूल असलें, तरी दक्षिणेकडील ग्रंथांच्या आधारावर काढलेल्या बुद्धाच्या कालांत ६० वर्षांची चूक पडते, म्हणून त्याच्यावर पूर्ण सत्यतेचा शिक्का मारतां येत नाहीं. सिंहली ग्रंथांत तीन बौद्ध सभांचा उल्लेख आहे. एक बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेच झाली, दुसरी बरोबर १०० वर्षांनंतर काल अशोकाच्या कारकीर्दीत झाली व तिसरी दुसरीनंतर ११८ अथवा १३५ वर्षांनीं अशोकाच्या कारकीर्दींत झाली असें त्यांत म्हटलें आहे. परंतु हें असंबद्ध आहे. कारण अशोक नांवाचे दोन राजे झाले असा कोठेंच उल्लेख नसून ज्या ग्रंथांत ही माहिती आहे त्याच ग्रंथांत पुन्हां विरोधी उल्लेख आहेत. उत्तरेकडील बौद्धांनां अशोकापर्यंतच्या फक्त दोनच बौद्ध सभांची माहिती असून त्यांत दुसरी पहिलीनंतर ११० वर्षांनीं झाली असें त्यांचें मत आहे.
टर्नरचें असें म्हणणें आहे कीं, ज्या अर्थी ख्रि. पू. ५४३ हा बुद्धाचा निर्वाणकाल नाहीं असें आपण सिद्ध करूं शकत नाहीं त्या अर्थी तोच बरोबर आहे हें मान्य करणें प्राप्त आहे. उलट पक्षीं, प्रो. कर्न याचें असें मत आहे कीं, ख्रि. पू. ५४३ हा निर्वाणकाल आहे असें म्हणणा-यांनीं बुद्धाचा निर्वाणकाल अशोकापूर्वी २१८, २६० अथवा त्याहून जास्त पूर्वीं आहे हें सिद्ध केलें पाहिजे; कारण, नुसत्या दंतकथांवरून कोणत्याहि विधानाची सत्यता सिद्ध होत नसते.
चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीस ख्रि. पू. ३२२ मध्यें सुरुवात झाली असें प्रो. कर्न याचें मत असून तें इतर आधारांनीं त्यानें सिद्ध केलें आहे. चंद्रगुप्तानें २४ व त्याच्या मुलानें २८ वर्षे राज्य केलें, व त्यानंतर (म्ह. ५२ वर्षांनीं) अशोक गादीवर आला. तेव्हां अर्थात ख्रि. पू. २७० हा अशोकाचा राज्यारोहणकाल असला पाहिजे असें कर्न यास वाटतें. अशोकाच्या शिलालेखांत ज्या ग्रीक राजांचा उल्लेख आहे त्यांच्या कालावरून पाहतां हे लेख ख्रि. पू. २५८ त अथवा त्यानंतर लवकरच लिहीले असावे असें दिसतें व त्यावरूनहि ख्रि. पू. २७० हा अशोकाचा काल चूक ठरत नाहीं असें तो प्रतिपादितो. तेव्हां 'अशोक-अवदानाप्रमाणें बुद्धाचा मृत्यु अशोकापूर्वी १०० (११०) वर्षे झाला असें गृहीत धरलें तर ख्रि. पू. ३८० हा बुद्धाचा निर्वाणकाल ठरतो [इं. अँ. पु. ३, पृ. ७७]. परंतु सिलोनी दंतकथांतच परस्परविरोध असल्यामुळें त्या आपणांस विश्वसनीय दिसत नाहींत.