प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
जपानमधील बौद्धसंप्रदाय.- इ. स. ५३८ त बौद्ध संप्रदायाचा जपानांत प्रवेश झाला. चीनमधून कोरियांत व कोरियामधून जपानांत असा ह्या संप्रदायाचा प्रसार होत गेला. इ. स. ५९३ त शोटोक्यु नामक राजपुत्रानें बौद्ध संप्रदायाचा स्वीकार करून बौद्ध देवळें, इमारती, दवाखाने वगैरे बांधले; व बौद्ध संप्रदायाचीं तत्त्वें शिकविण्यासाठीं चीनमध्यें लोक पाठविले. तेव्हांपासून १८६८ पर्यंत या देशांत बौद्ध संप्रदायाचें पाऊन एकसारखें पुढें पुढेंच पडत गेलें. त्यास राजाश्रय मिळाला, व सर्वत्र शांतता नांदण्यास बुद्धाची कृपा अवश्य आहे अशी येथील लोकांची ठाम समजूत झाली. १८६८ मध्यें मात्र जपानांत राज्यक्रांति होऊन बौद्ध संप्रदायाला मिळत असलेला आश्रय बंद करण्यांत आला. परंतु ही चूक पुढें लोकांच्या लक्षांत येऊन ह्या संप्रदायाला पुन्हां उत्तेजन मिळूं लागलें. तथापि नुसत्या बौद्ध संप्रदायावर अवलंबून न राहतां, शितो, कन्फ्यूशिअस व बुद्ध या तिघांच्याहि पंथांतील चांगलीं चांगलीं तत्त्वें एकत्र करून तीं स्वीकारण्याचे जपानी लोकांनीं प्रयत्न चालविले आहेत.
जपानांतील बौद्ध संप्रदायाला ख्रिस्ती संप्रदायाशींहि झगडावें लागलें. बौद्ध लोकांची ख्रिस्ती लोकांविरुद्ध चळवळ चालली असून, खुद्द बौद्ध संप्रदायाची सुधारणा करण्यासाठींहि सुशिक्षितांच्या नव्या संस्था स्थापन झाल्या आहेत.
जपानी भिक्षूंना विवाह करण्याची मोकळीक आहे. जपानी बौद्ध संप्रदायांत अनेक पंथ आहेत. चिनी व जपानी भिक्षू यांमध्यें बरेंच साम्य आहे.