प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

चिनी दंतकथेच्या आधारें बुद्धकालनिर्णय - मॅक्स मुल्लर साहेबांच्या मतें गौतमबुद्ध ख्रिस्ताच्या पूर्वीं ४७७ सालीं मरण पावला. त्यांनीं आपल्या मतास आधार म्हणून मि. बनियु नँजिओच्या लेखाचें इत्थंभूत भाषंतर दिलें आहे. त्यांतील गोषवारा येणेंप्रमाणें :  बुद्धाच्या मरणानंतर लवकरच उपालीनें विनयपिटकाचा संग्रह केला, व ज्या वर्षीं संग्रह केला त्याच वर्षाच्या ७ व्या महिन्याच्या १५ व्या दिवशीं पुष्पादिकांनीं त्याची पूजा करून त्याच्या प्रारंभीं एक टिंब दिलें. त्याचा प्रतिवर्षीं हाच क्रम चालू असे. पुढें तो (उपाली) ख्रिस्तापूर्वीं ४४७ सालीं आपला शिष्य दाशक ह्याच्या स्वाधीन विनयपिटक करून आपण निर्वाणाप्रत गेला. दाशक ख्रिस्तापूर्वीं ३९७ सालीं मरण पावला. ह्याच्या नंतर विनयपिटक सोनकाच्या हातीं आलें. हा आपला शिष्य सिग्गव ह्याच्या ताब्यांत विनयपिटक देऊन ख्रिस्तापूर्वीं ३५३ सालीं मरण पावला. सिग्गवानें ख्रिस्तापूर्वी ३०० १/२ सालीं विनय पिटक मौद्गल्यायनीपुत्र तिष्य ह्याच्या हवालीं केलें. तिष्यानें तें ख्रिस्तापूर्वी २३३ सालीं चंडवग्गी ह्याला दिलें. ह्याप्रमाणें शिष्यपरंपरा चालत जाऊन, विनय पिटक शेवटीं संगभद्रास प्राप्त झालें. संगभद्रानें आणखी एका चिनी उपाध्यायाच्या मदतीनें विनयपिटकाचें भाषांतर केलें; व त्याला वेणुवनविहार असें नांव दिलें. हें भाषांतर इ. स. ४९० या वर्षी झालें. ह्या वेळीं मूळ विनयपिटकावर एका वर्षास एक टिंब ह्याप्रमाणें ९७५ वर्षें दर्शविणारीं ९७५ टिंबें होतीं.

आतां आपणांस बुद्धाचा मृत्युकाल पहावयाचा असल्यास ९७५ वर्षांतून इ. सनाचीं ४९० वर्षें वजा केलीं पाहिजेत. म्हणजे बाकी राहिलेलीं वर्षें बुद्धाचा ख्रिस्तपूर्व निर्वाणकाल दर्शवितील. ह्याप्रमाणें ख्रिस्तापूर्वीं ४८५ या वर्षीं बुद्धाच्या विनयपिटकाचा संग्रह झाला असावा, व ह्याच्या सुमारें ८ वर्षें अगोदर बुद्ध मृत्यु पावला असावा. ह्यावरून ४७७ हें बुद्धाचें मृत्युवर्ष खरें धरण्यास हरकत नाहीं असें इं. अँ. पु. १३ (पृ. १४८-५१) मध्यें प्रतिपादिलेलें आहे.