प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
गौतमाची गृहस्थिति व शारीरस्थिति.- गौतमाच्या अथवा त्याच्या बापाच्या ऐश्वर्याचें जें वर्णन केलेलें आढळतें त्यांत सत्यांश थोडा असून कविलाघवाचाच प्रकार फार अधिक आहे. गौतमाचा जन्म अरण्यांत एका झाडाखालीं झाला. फार दिवसांनीं आपन्नसत्वा झालेली माया ही जर राजपत्नी अथवा राजकन्या असती तर अगदीं शेजारीं असलेल्या माहेराला इतक्या उशिरां कां जाती ? पण याहूनहि पुढील चमत्कार विशेषच आहे. मुलगा झाल्याबरोबर त्यास धुवावें लागतें तें मायेनें गौतमास एका ओहोळाच्या गार पाण्यानें धुतलें. यानंतर बाळबाळंतीण परत आपल्या घरीं गेलीं, माहेरीं गेलीं नाहींत. पुढें सातव्या दिवशीं गौतमाची आई परलोकवासी झाली.
गौतमाचा जन्म ज्या दिवशीं यशोधरा जन्मली त्याच दिवशीं झाला. म्हणजे गौतम व त्याची भावी पत्नी हीं एकाच वयाचीं होतीं; आणि यशोधरेचा बाप सुप्रबुद्ध हा नाखुष असतां तिचें व गौतमाचें शुद्धोदनाच्या आग्रहानें लग्न लागलें. याचा परिणाम पुढें चांगला झाला नाहीं.
नेपाळांतील संस्कृतांत असलेला बौद्ध ग्रंथांचा संग्रह जो राजेंद्रलाल मित्र यांस मिळाला, अथवा ज्याची सूचि त्यांनीं केली, त्यांत 'भद्रकल्पावदानं' म्हणून एक ग्रंथ आहे. यांतील विषय म्हणजे जयश्री यानें जिनश्रीस ३४ कथा निवेदन केलेल्या आहेत. त्यांत गौतम व यशोधरा यांच्या विवाहासंबंधीं व त्यानंतरच्या आयुष्यासंबंधीं कांहीं माहिती आहे; त्यावरून असें दिसतें कीं यशोधरेचा पिता सुप्रबुद्ध, तिचा बन्धु देवदत्त व स्वतः यशोधरा ही या विवाहाच्या विरुद्ध होतीं. थोडक्यांत लिहावयाचें म्हणजे यशोधरेला गौतम घरांतून निघून गेल्यानंतर ६ वर्षांनीं मागें 'राहुल' पुत्र झाला. अशी गौतमाची गृहस्थिति होती. त्याची स्वतःची स्थितीहि याच संग्रहांत 'बोधिसत्त्वावदानकल्पलता' या ग्रंथावरून जी दिसून येते ती अशी की, गौतमास पुढें जशीं दशबलें प्राप्त झालीं तशीं पूर्वीं त्यास दशवैगुण्येंहि होती. हीं वैगुण्यें येणेंप्रमाणें:-
(१) त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर व्रण होतें.
(२) त्याच्या पायास कांठ्यानें कुरुप केलें होते.
(३) त्याचें भिक्षापात्र नेहमीं रिकामें असे (तो खादाड होता हें चण्डानें त्यास अखेर जें भोजन दिलें त्या वेळीं स्पष्ट निदर्शनास आलें, व म्हणूनच मिलिंदप्रश्नांत याबद्दल सारवासारव करणारें विवेचन केलें आहे).
(४) सुंदरी नांवाच्या स्त्रीनें त्याच्यावर आरोप आणला होता.
(५) एका भिक्षुणीनें त्याच्यावर खोटा आळ आणला होता. येथें सुंदरीच्या बाबतींत 'खोटा' हा शब्द घातलेला नाहीं हे लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे.
(६) त्यास कोद्रूवर रहावें लागे (यावरून त्याची पचनशक्ति फार क्षीण झाली होती. हेंच अखेरच्या मांसभोजनाचा जो परिणाम झाला व शेवटीं अतिसारानें त्याच्या प्राणावर बेतली त्यावरून सिद्ध होतें).
(७) या जन्मीं-गौतम म्हणून जन्मास आल्यावर-त्यानें ६ वर्षे अनीतींत घालविलीं (केशी गौतमीची व गौतमाची चांदण्या रात्रीं झालेली भेट जो कोणी वाचून मनन करील त्यास या वैगुण्याचें रहस्य कळेल).
(८) त्यास धातुक्षयाचा आजार होता.
(९) त्यास शीर्षवेदना नेहमीं होत होत्या.
(१०) त्यास संधिवाताचें दुखणें असे.
मिलिंदप्रश्नांत गौतमास चार प्रकारच्या शारीर व्यथा होत्या असें म्हटलें आहे. या व्यथा अशा:-
(१) त्याच्या एका पायांत पाषाणखण्ड घुसून त्याचें लासूर बनलें होतें.
(२) मृत्युसमयीं त्यास अतिसार झाला होता - म्हणजे तो मंदाग्नि होता.
(३) त्यास जीवकाकडून ढाळक द्यावें लागलें- म्हणजे तो बद्धकोष्ठ होता.
(४) त्यास संधिवाताचें दुःख असे.
मिलिंदप्रश्नांतील व बोधिसत्त्वावदानकल्पलतेंतील गौतमाची शारीरिक दुःखें सारखींच होतीं असे म्हटलें तरी चालेल; आणि यावरून त्याच्या चरित्रकारांनीं त्याच्या अचाट शक्तीचें जें वर्णन मुद्दाम केलें आहे ते 'विरुद्धाचें समर्थन' या दृष्टीनें पाहिलें म्हणजे गौतम खरोखर अशक्त होता, निदान प्रथम प्रथम तरी तो तसा होता, असें म्हणावें लागतें.
गौतमाचा गृहत्याग- अशा त-हेची गृहस्थिति व शारीर स्थिति असल्यावर गौतमास या जगांत दुःख कां दिसूं नये ? त्यास वैराग्य आलें असावें असें म्हणण्याऐवजीं त्यास गृह नकोसें झालें असावें हें म्हणणें अधिक सयुक्तिक आहे.
गौतम बाहेर पडल्यावर त्याची व बिम्बसाराची राजगृहीं भेट झालीं; आणि नंतर तो 'आलारकालाम' व 'उद्रक' यांच्याकडे गेला. त्यांनीं गौतमास ध्यानयोग व समाधि यांचा उपदेश केला. रामपुत्र उद्रकासंबंधीं हुएनत्संग यानें असे उद्गार काढले आहेत कीं, हा गौतमास उपदेश देण्यास योग्य गुरु होता; कारण त्याचें मत कपिलाच्याहि पुढें गेलेलें होतें म्हणजे तो निरीश्वरवादी होता.
येथून गौतम पुढें अरण्यांत गेला. तेथें त्याच्या बरोबर आणखी पांच तपस्वी होते. या सहांनीं मिळून तप केलें. त्या वेळीं गौतमानें आपलें मन ताब्यांत यावें व वासनेचा क्षय व्हावा म्हणून अन्न सोडिलें. परंतु त्यामुळें त्यास इतकी अशक्तता आली कीं, एक वेळ तो निश्चेष्ट पडला. तेव्हां वासनेचा क्षय होण्याचा हा मार्ग नाहीं, असें जाणून त्यानें सुजाता नामक एका गोळ्याच्या मुलीच्या हातचा दूधभात घेतला. योग्यास दूधभाताचें अन्नच विहित धरलें आहे. हे अन्न ग्रहण केल्यावर तो एका अश्वत्थ वृक्षाखालीं जाऊन बसला; आणि तेथें त्यानें आसन घालून योगसाधन केले असतां, आपणास निरामयता प्राप्त झाली असें त्यास वाटलें.