प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

गौतमाचा मनोनिग्रह - यापुढील गौतमाचा आयुष्यक्रम सर्व ग्रंथांतून जो दिलेला आहे त्यावरून त्यास आपल्या मनावर विजय मिळाला होता असें तर दिसत नाहींच; पण उलट कसाबसा राजदरबारांत आपल्या मताचा प्रवेश होऊन त्याची महती वाढावी अशी लालसा त्यास असावी असें दिसतें. या विधानाच्या समर्थनार्थ कांहीं आख्यायिका देतो:-

अपकारकर्त्यावर उपकार करावा, चित्त अक्षोभ असावें, सर्वमूर्ती दया, क्षमा व शांति असावी, हा जो गौतमाचा दुस-यास उपदेश होता तसें त्याचें स्वतःचे वर्तन खास नव्हतें हें त्याचा व देवदत्ताचा जो संबंध ग्रंथातरीं सर्वत्र वर्णिला आहे त्यावरून अगदीं स्पष्ट होते. देवदत्ताचें व गौतमाचें इतकें वांकडें कां यावें याचें, तो यशोधरेचा भाऊ होता याच एका कारणावांचून दुसरें कोणतेंहि सयुक्तिक कारण दिसत नाहीं. देवदत्तच काय परंतु यशोधरेचा बाप जो सुप्रबुद्ध त्याच्याशींहि गौतमाचें अत्यंत वैर होतें; आणि यशोधरेचें पत्‍नी या नात्यानें गौतमाशीं जे वर्तन झालें तें वगळलें तर हें अकारण वैर पाहून व या पितापुत्रांशीं गौतमानें व त्याच्या शिष्यांनीं जें वर्तन केले तें वाचून, अशी दृढतर शंका येते कीं, या दोघांच्या मरणाचें भविष्य म्हणून जें गौतमानें वर्तविलें ते भविष्य नसून त्यानेंच घडवून आणलेल्या त्या आपत्ती होत्या.

बौद्ध ग्रंथांत दिलेली हकीकत वाचली म्हणजे असें वाटतें कीं देवदत्तानें जो एक पंथ स्थापिला तो त्याच्या मरणापूर्वीच नाहीसा झाला होता. गौतमाचे शिष्य जे सारिपुत्र व मोग्गलान त्यांच्या खटपटीनें त्याचे सर्व शिष्य त्यास सोडून गेले होते. परंतु वस्तुतः तसें मुळींच नाहीं. शके ३२१ च्या सुमारास फाहिआन म्हणतो कीं, देवदत्ताचा शिष्यसंप्रदाय अद्यापहि आहे; व तो त्यास आणि त्याच्या पूर्वीच्या तीन बुद्धांस मानतो, गौतमास मानीत नाहीं. तसेंच 'कर्णसुवर्ण' येथें तीन संघाराम होते. त्यांतील भिक्षु देवदत्ताच्या आज्ञेप्रमाणें लोण्याचा उपयोग करीत नसत असें हुएनत्संग म्हणतो.

तेव्हां गौतमाच्या चरित्रकारांनीं जे देवदत्ताविषयीं दर्शविलें आहे तें सत्य नव्हे. देवदत्ताचें आणि गौतमाचें यशोधरेच्या खासगी संबंधापासून उत्पन्न झालेलें वैषम्य जर एकीकडे ठविलें तर, त्यांचें परस्परवितुष्ट येण्यासारखें असें देवदत्तानें काय केलें होतें ? गौतम म्हणतो देवदत्त माझा शिष्य होता; ही गोष्ट देवदत्त नाकबूल करतो. देवदत्तानें गौतमास, पूर्वीच्या बुद्धांच्या परंपरेस अनुसरून पांच गोष्टी करण्यास सांगितलें आणि तें गौतमानें नाकारिलें; तेव्हां देवदत्तानें स्वतंत्र मठस्थापना केली. यांत गौतमास वैषम्य वाटण्यासारखें कांहीं नव्हतें. परंतु देवदत्ताविषयीं गौतमाचा केवढा तीव्र द्वेष होता हें त्यासंबंधींच्या जातकांवरून दिसून येईल. एकंदर जातकें ५४७ आहेत. त्यांतील पुष्कळशीं म्हणजे जवळ जवळ दोन तृतीयांशाहून जास्त जातकें पतित झालेल्या भिक्षूंसंबंधीं आहेत. इतरांत देवदत्ताची जितकी निंदा करणें शक्य आहे तितकी केलेली आहे. बरें असा देवदत्ताचा अपराध तरी कोणता ? कदाचित् कोणी असें म्हणतील कीं, हीं सर्व जातके कांहीं गौतमाच्या तोंडचीं नव्हत, तेव्हां त्यांच्याबद्दल गौतमास दोष काय ? त्याला उत्तर एवढेंच कीं, जे प्रमाण गौतमास तेंच देवदत्तास, दुसरें कित्येक असे म्हणतील कीं, देवदत्तानें गौतमास मारण्याचा तीनदां प्रयत्न केला होता; एकदां त्याच्या अंगावर त्यानें शिला ढकलली, एकदां चाळीस बाणकरी त्यानें गौतमास मारण्यास भाड्यानें लाविले, व एकदां नालगिरी नांवाचा हत्ती त्याच्या अंगावर त्यानें घातला. या गोष्टी ख-या असल्या तरी गौतमानें क्षमेचाच अंगीकार केला पाहिजे होता. परंतु या गोष्टींत अद्भुताची इतकी भेसळ आहे कीं त्या ख-या दिसत नाहींत. उलट गौतमचरित्रकारांनीं कितीहि मखलाशी केली, तरी गौतम व गौतमशिष्य यांचे जें वर्तन देवदत्ताशीं झालें त्यावरून गौतमानें देवदत्तास तो हयात होता तोंपर्यंत अत्यंत त्रास दिला व शेवटीं त्याचें मरणाहि घडवून आणिले हे दृग्गोचर होतें. त्याच्या मरणा नंतरहि त्याच्या संबंधीं बौद्धांनीं अत्यंत वाईट लिहून त्याचा सूड घेतला.

देवदत्ताबद्दलचीं जीं जातकें आहेत त्यांत, तो गौतमाचें अनुकरण करतो म्हणूनच त्याची बरीचशी निंदा केली आहे; जणूं काय शिष्यशाखा मिळविणें व प्रवचन करणें हा अधिकार फक्त एकट्या गौतमासच मिळाला होता.

गौतमानें देवदत्ताचा सूड कसा उगविला तें आतां दाखवितों:-

देवदत्ताचा कोक्कालिक म्हणून एक शिष्य होता. तो बरेच दिवस त्याच्याशीं शिष्याच्या नात्यानें वागला, पण पुढें त्याचें व गौतमशिष्य सारिपुत्र व मोग्गलान यांचें सख्य जमलें. तें कसें व कां तें गूढ आहे. एके प्रसंगीं देवदत्त हा आपल्या मठांत आपल्या ५०० शिष्यांस प्रवचन करीत बसला असतां सारिपुत्र व मोग्गलान हे तेथें आले तेव्हां कोक्कालिकानें देवदत्तास सांगितलें कीं त्यांस जवळ येऊं देऊं नका, दगा होईल. देवदत्तानें त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष्य केलें. सारिपुत्र व मोग्गलान हे आंत येऊन ते देवदत्ताच्या दोन बाजूंस दोन उभे राहिले. पुढें वर्णन आहे तें असे:- 'प्रवचन करीत असतां देवदत्तास निद्रा लागली. सारिपुत्रानें प्रवचन केलें व देवदत्ताचे सर्व शिष्य त्यास सोडून गेले तो उठून पाहतो तो सर्व शिष्य गेलेले. देवदत्त तेव्हांपासून नऊ महिने आजारी होता' येथें आजारी कशानें झाला तें दिलेलें नाहीं. विरोचन जातकांत कथा दिली आहे, ती अशी:-

'गयासीस येथें देवदत्त बुद्धाप्रमाणें वागत होता ... एकदां देवदत्त निजला असतां कोक्कालिकानें त्याचे कपडे हिरावून घेऊन त्याच्या छातींत एक लाथ मारली. त्याबरोबर देवदत्त रक्त ओकला व त्या दिवसापासून त्यास छातीचे दुखणेंच लागलें.'

वरील दोन्ही हकीकतींवरून सारिपुत्र व मोग्गलान यांनीं देवदत्तास ज्या वेळीं भेट देऊन त्याचे ५०० शिष्य नेले तेव्हांच कोक्कालिकानेंहि आपल्या गुरूस गुरुदक्षिणा दिली, कीं हे दोन भिन्न प्रसंग होते हे कांहीं कळत नाहीं; तथापि या सर्व कृत्यांत गौतमाचा हात नव्हता अशी कल्पनाहि करवत नाहीं.

हरामखोरास जें प्राचश्चित मिळावयाचें तेंच कोक्कालिकासहि पुढें मिळालें. तित्तिर, सिंह कोलुक, सिंहचर्म्म, कछप व कोक्कालिक या जातकांवरून कोक्कालिक जें बोलूं नये तें बोलूं लागला म्हणून मरण पावला असें गौतमाचें म्हणणें होतें. तक्करिय जातकांत तो कसा मेला याचें वर्णन दिलें आहे. सारिपुत्र व मोग्गलान यांनीं आपल्या देखत पातक केलें, असें कोक्कालिकानें म्हटल्यावर त्याच्या सर्व अंगांतून रक्त स्त्रवूं लागलें व तो जेतवनाच्या दाराशींच मेला.

खुद्द देवदत्ताचें मरण 'समुद्रवाणिज' या जातकांत दिलें आहे. देवदत्त गौतमास भेटण्यास आला असतां व कदाचित् अपराधांची क्षमा मागण्याचीहि त्याची इच्छा असतां, गौतमानें त्याचा द्वेष सोडला नाहीं. असा दीर्घद्वेष संसारी मनुष्यहि करणार नाहीं. मग ज्यानें मनावर विजय मिळविला आहे, दयेचें व क्षमेचें या जगावर साम्राज्य पसरिलें आहे, अशा गौतमानें तो आपल्या जिवाशीं कसा धरला हें आश्चर्य आहे.

देवदत्तानें गौतमाच्या जिवाचा घात करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून उल्लेख तरी आहे, व या दृष्टीने गौतमाचा देवदत्ताविषयींचा द्वेष कांहींसा सकारण तरी ठरतो. परंतु त्याचा बाप जो सुप्रबुद्ध त्यानें गौतमाचें कांहीं वाईट केल्याचा अथवा चिंतिल्याचा कोठेंहि उल्लेख नाहीं. परंतु त्याचाहि आमरण गौतमानें द्वेषच केला.

एके वेळीं सुप्रबुद्ध रस्त्यानें चालला होता व मागून गौतम येत होता. गौतमाच्या शिष्यांनीं सुप्रबुद्धास सांगितलें कीं, मागून गौतम येत आहे त्यास वाट द्या. सुप्रबुद्ध अमलांत होता, तो म्हणाला गौतम माझ्याहून लहान व त्यांत तो माझा जावई आहे तेव्हां त्यानेंच मला वाट द्यावी. गौतम तें ऐकून व पाहून किंचित हंसला (!) व म्हणाला सात दिवसांत जिन्याखालीं पडून हा मरेल.

हे गौतमाचें भविष्य खरें होऊं नये म्हणून सुप्रबुद्धानें आपली सर्व व्यवस्था घराच्या वरच्या मजल्यांवरच करविली. परंतु सातव्या दिवशीं खालीं कांहीं गोंगाट झाला तो कशाचा म्हणून तो जों पहावयास आला, तों त्याच्या रक्षकांनीं त्यास खालीं ढकललें आणि तो खालीं पडून मेला.

सासरा व मेहुणा-पितापुत्रा-व गौतम यांचें या अशा त-हेचें प्रेम होतें. गौतमाच्या चरित्रकारांनीं त्याच्या गृहसौख्याचें चित्र कसेंहि रेखाटलें तरी गौतमाचें मन या दोषांसंबंधीं द्वेषपूर्ण होतें ही गोष्ट त्यांस केव्हांहि झांकतां येणें शक्य नव्हतें. या द्वेषाचें कारण उत्तरवयांत झालेलें नसून - कारण तसें घडून आलेलें कोठें वर्णिलें नाहीं - पूर्ववयांतच उत्पन्न झालेलें आहे. त्याचा स्पष्ट खुलासा बोधिसत्त्वावदानांत व भद्रकल्पावदानांतच फक्त दिला आहे - इतरत्र तो अंतरित असल्यानें दूरान्वयानें सुचविला आहे. परंतु सर्व ग्रंथांतून गौतमाचें वर्तन या दोघांशीं अत्यंत द्वेषमूलक होतें हें मात्र स्पष्ट आहे.

देवदत्ताशीं ज्याचा निकट संबंध आला अशा अजातशत्रु राजाचेंहि चित्र बौद्ध ग्रंथकारांनीं बरेंच उठावदार काढलें आहे.

अजातशत्रूनें आपल्या गौतमानुयायी बापास मारिल्याचा आरोप त्यावर आहे. परंतु गादीवर आल्यावर देवदत्ताचा तसा झालेला अंत पाहून तो जेव्हां 'जीवकाच्या' सल्ल्याने गौतमास भेटण्यास आला तेव्हांचे जे चित्र चरित्रकारांनीं रेखाटलें आहे त्यावरून, गौतमाच्याच वर्तनाचें अत्यंत, आश्चर्य वाटतें. भेटींत गौतमानें अजातशत्रूस त्याच्या पापाबद्दल कांहीं एक बोलूं नये व उपदेशहि करूं नये, उलट त्यास आपल्या शिष्यांत लागलीच गणावें हें विलक्षण भासते. तो मुलाखतीचा प्रसंग येथे वर्णिला पाहिजे.