प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
गौतम बुद्धाचें देहावसान- आनंदाबरोबर बुद्ध हा मल्लदेशांत कुशनगरामध्यें उपवर्तन नामक शालवृक्षांची राई होती तेथें आला. त्या ठिकाणीं त्यानें आज्ञा केल्यावरून दोन शालवृक्षांच्या मध्यभागीं एक आसन त्याचा शिरोभाग उत्तरेकडे करून आंथरण्यांत आलें. या आसनावर बुद्ध आपल्या उजव्या कुशीवर एखाद्या सिंहाप्रमाणें आडवा झाला आणि पायावर पाय ठेवून सावधानतेनें पडून राहिला. वृक्षांनां त्यांचा फुलांचा ॠतु नसतांहि फुलांचा बहर आला, व या वृक्षांनीं बुद्ध वरीलप्रमाणें पडला असतां त्याजवर फुलांचा वर्षाव केला. बुद्धाचे शेवटले क्षण आनंद आणि तेथें जमलेले दुसरे यतिजन यांस कार्यविषयक सूचना व उपदेश करण्यांत गेले. सुभद्र नांवाचा एक संन्याशी फिरत फिरत त्या ठिकाणीं प्राप्त झाला असतां बुसमारो येण्याची संधि त्यास मिळाली. तेथें बुद्धाचा उपदेश ऐकून तो त्याचा अनुयायी झाला. हा पुण्यपावन बुद्धानें स्वतः केलेला शेवटचा चेला होय. यानंतर आपल्या चेल्यांनां बुद्धानें बोलावून घेतलें, व आपली शिकवण म्हणजे धम्म आणि संघाचे नियम यासंबंधानें तुम्हांस कांहीं शंका असल्यास त्या सांगा म्हणजे मी त्या दूर करतो असें म्हटलें. मी गेल्यानंतर माझी शिकवण (धम्म) व माझी शिस्त (संघनियम) हेच तुमच्या गुरुस्थानीं तुम्हीं समजावें असेंहि त्यानें सांगितलें. खालील प्रश्न त्यानें तीन वेळां पुनः पुन्हां विचारला:-
'बंधूंनों, तुम्हांपैकीं कोणाला बुद्ध धम्म, संघ, माग्ग, विनय यासंबंधानें कांहीं शंका असेल, कारण तशी ती असणें शक्य आहे, तर कोणताहि प्रश्न विचारा. पुढें तुम्हांला असा पश्चात्ताप करण्याची वेळ न यावी कीं, आमचा गुरु आमच्यांत असतां आम्ही त्याला आमच्या सर्व शंका सांगितल्या नाहींत'
याप्रमाणें बुद्ध बोलला असतां सर्व बंधुगण मौन धरून राहिला. 'बंधूंनों गुरूविषयींचा आदरभाव तुम्हाला प्रश्न विचारूं देत नसेल कदाचित, असें असेल तर आपापल्या मित्राजवळ प्रत्येकानें बोलावें.'
यानंतरहि बंधुगण मौनीच राहिला. तेव्हां मग पूज्यवर आनंद हा पुण्यपावन बुद्धास म्हणाला.
'पूज्यपाद ही केवढी आश्चर्याची व अलौकिक गोष्ट आहे. माझा असा विश्वास आहे की, या सर्व सभेंत एकाहि बांधवाला बुद्ध धम्म, संघ, माग्ग किंवा विनय यासंबंधानें शंका किंवा भ्रम राहिलेला नाहीं.'
'आनंद तूं हें म्हणत आहेस तें केवळ श्रद्धेनें म्हणत आहेस. परंतु तथागताची गोष्ट तशी नाहीं. या बांधवसभेंत एकाहि बांधवाला बुद्ध धम्म, संघ माग्ग किंवा विनय यासंबंधानें एकहि शंका किंवा भ्रम राहिलेला नाहीं हें तथागताला विदित आहे. या पांचशें बंधूंपैकीं प्रत्येकजण, अगदीं मागसलेला इसम देखील, पूर्णपणें बुद्धानुयायी बनलेला आहे. यांपैकीं कोणालाहि दुःखाचा जन्म येणार नसून प्रत्येकाला निर्वाणप्राप्तीची खात्री आहे.'
यानंतर पुण्यपावन बुद्ध बंधुगणाला म्हणाला : 'बंधूंनो ! आतां मी तुमची रजा घेतों. अस्तित्वाचे सर्व घटक विनाशी आहेत. आपआपली मुक्ति प्रयत्न करून मिळवा.' हे तथागताचे शेवटचे शब्द होत.
यानंतर तो पुण्यपावन पहिल्या ध्यानांत प्रवेश करता झाला. पहिल्या ध्यानांतून उठून दुस-या ध्यानांत, दुस-यांतून तिस-यांत, तिस-यांतून चवथ्यांत व चवथ्यांतून अनंत आकाशांत तो प्रविष्ट झाला. तेथून अनंत चित्सृष्टींत, या चित्सृष्टींतून शून्यसृष्टींत, शून्यांतून भानाभानहीन सृष्टीत व तेथून भान व संवेदना यांच्या अभावाच्या स्थितीस तो प्राप्त झाला.
येथें गौतमाचें चरित्र संपलें. गौतम म्हणून ३५ व बुद्ध म्हणून ४५ अशी ८० वर्षांची ही कथा आहे; परंतु या काळांतील उपलब्ध अशा गोष्टी फारच थोड्या आहेत. वर दिल्या त्या, व शिवाय अनाथपिण्डदाचें जेतवन विहाराचें बांधणें, आनंदाच्या विनवणीवरून स्त्रियांच्या भिक्षुणी म्हणून संघांत प्रवेश, गौतमाविरुद्ध कांहीं स्त्रियांच्या तक्रारी, आणि गौतमाचें सिलोनांत गमन ह्या होत. या शेवटच्या आख्यायिकेबद्दल शंका असल्याकारणानें ती एकीकडे ठेविली तर विशेष महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी राहतात. जेतवनीं विहार झाल्याकारणानें बौद्धसंघास एक प्रकारचें व्यवस्थित स्वरूप आलें. भिक्षूंपैकीं बरेच चातुर्वर्ण्यबाह्य असल्यानें ती एक प्रकारची शक्तीच गौतमाच्या हातांत आली. अजातशत्रु व प्रसेनजित् यांच्यासंबंधीं जें वर लिहिले आहे त्यावरून त्या शक्तीचा उपयोग गौतमानें राजकारणांत करण्याचा प्रयत्नहि पण केला असें दिसतें.