प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

कोरियामधील बौद्ध संप्रदाय.- कोरियामध्यें बौद्ध संप्रदायाचा प्रवेश चीन देशांतून झाला. प्रथम चिनी राजानें संदो नांवाच्या चिनी मनुष्यास बुद्धाच्या मूर्ती व कांहीं ग्रंथ देऊन या देशांत पाठविलें; व पुढें कोरियाच्या राजानें चीनमधून आणखी मतप्रचारक आणवून या मतप्रचारकांकडून बौद्धसंप्रदायाचा सर्व कोरियाभर प्रसार केला. कोणत्याहि प्राण्याची हिंसा करावयाची नाहीं असा लवकरच येथें कायदा करण्यांत आला; व अनेक लोकांनीं भिक्षूची दीक्षा घेऊन आपली मालमत्ता मठांनां देऊन टाकिली. कांहीं कालानें एक बौद्ध भिक्षूच येथें राज्यपदारूढ झाल्यामुळें त्याच्याकडून बौद्ध संप्रदायाला अतिशय प्रोत्साहन मिळालें. बौद्ध संप्रदायानें कोरियांत उत्तम उत्तम सुधारणा घडवून आणल्या. परंतु चौदव्या शतकाच्या अखेरीस मोठी राज्यक्रांति होऊन राजसत्ता मिंग घराण्याकडे गेली. या घराण्यांतील राजांनीं कन्फ्यूशिअसच्या पंथाला राजाश्रय दिल्यामुळें बौद्ध संप्रदायाला उतरती कळा लागली, व तो अगदीं निकृष्टावस्थेप्रत गेला. भिक्षूंनां राजधानींत येण्याची बंदी झाली, त्यांचे मठ उध्वस्त केले गेले व नवीन मठ बांधण्याची मनाई करण्यांत आली. अशा प्रकारें येथें भिक्षूंचा छळ सुरू झाला होता; परंतु कोरियांत जपानचें वर्चस्व झाल्यापासून भिक्षूंनां तापदायक असलेले कायदे रद्द करण्यांत येऊन बौद्ध संप्रदायाला थोडा बहुत पुन्हां राजाश्रय मिळूं लागला.