प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
कार्त्तिक शुद्ध ८ हा बुद्धनिर्वाणदिन धरण्याची अनवश्यकता.- डॉ. फ्लीट यांनीं देवानां पिय तिस्स याचे दोन्ही राज्याभिषेक (ख्रि. पू. २४७ तील मार्गशीर्ष शुद्ध १ व ख्रि. पू. २४६ तील वैशाल शु. १५) आणि महेंद्राचें सिलोनमध्यें आगमन (ख्रि. पू. २४७ तील ज्येष्ठ शुद्ध १५), या तीनहि गोष्टी निर्वाणशक २३६ (गत) या वर्षींच पडाव्या म्हणून, कार्तिक शुद्ध ८ ही बुद्धाच्या निर्वाणाची तिथि घेतली आहे. परंतु तसें करण्याची कांहीं आवश्यकता नाहीं. कारण बिगंडेट्सच्या पुस्तकांत दिलेल्या तिथीवरून जुन्या पंचांगपद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास केला असतां असें दिसून येईल कीं, जरी शकारंभ निरनिराळ्या काळीं निरनिराळ्या दिवसांपासून केला होता तरी वर्षारंभ नेहमीं फाल्गुन शुद्ध प्रतिपदेसच होत असे. ही गोष्ट लक्षांत ठेविली, व ख्रि. पू. २४२ हा 'देवानां पिय तिस्सा' चा राज्याभिषेककाल धरला म्हणजे बौद्ध ग्रंथांत दिलेली वैशाख शु. १५ ही निर्वाणतिथि धरूनहि दुसरी व तिसरी अशा दोन्हीहि गोष्टी निर्वाणशक २३६ गत (म्हणजे २३७ वर्तमान) या सालींच पडतील; व पहिली निर्वाण शक २३६ वर्तमानमध्यें येईल.