प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
अशोकाच्या प्रेषितांकडून झालेला मतप्रसार.- पांड्य देशाशिवाय आणखीहि निरनिराळ्या जागीं बौद्ध संप्रदायाचा प्रसार झाला, व तो अशोक राजानें पाठविलेल्या मतप्रसारकांनीं केला. तीं ठिकाणें म्हटलीं म्हणजे कांची, महिषमंडल, वनवासी, अपरान्त आणि महारट्ट हीं होत. कांचीसंबंधानें ह्युएनत्संग असें म्हणतो कीं, हें शहर बुद्धाच्या कालाइतकें प्राचीन आहे (सेवेल, लिस्ट ऑफ अँटिक्विटीज, पु. १ पृ. १७६). तेथील लोकांनां बुद्धानें दीक्ष दिली; आणि कांचीच्या शेजारीं त्यानें स्तूप बांधले असेंहि म्हटलेले आहे. महिषमंडल हें हल्लींचें म्हैसूर होय. वनवासी ही कदंबांची राजधानी होती व ती पल्लवांच्या राज्याच्या सरहद्दीवर होती. महारट्टांत पुण्याच्या भोंवतालच्या प्रदेशाचा समावेश होत असावा. अपरात्नांत कोंकण येतें.