प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
अशोकाच्या उत्तेजनामुळें बौद्ध संप्रदायाचा प्रसार - हिंदुस्थानांतील बौद्ध संप्रदायाच्या इतिहासांत अशोकाच्या कारकीर्दीचा काल अत्यंत महत्त्वाचा आहे. या बलाढ्य राजाच्या पाठिंब्यामुळें हिंदुस्थानांत त्या विचारांचा प्रसार फार जारीनें सुरू झाला. अशोकानें स्वतः बौद्ध संप्रदायाचा स्वीकार केला इतकेंच नाहीं, तर त्यानें सिलोन, म्हैसूर, महाराष्ट्र, काश्मीर, वगैरे देशांत धर्मप्रचारक पाठविले, व अनेक मठ स्थापून भिक्षू व भिक्षुणी यांची राहण्याचीं सोय केली. अशा प्रकारें या संप्रदायास अमर्याद उत्तेजन मिळाल्यामुळें कित्येक हलक्या प्रतीचे लोक संघांत प्रविष्ट होऊन त्यांच्या स्वैर वर्तनानें बौद्ध संप्रदायाच्या तत्त्वांत घोटाळे माजले. अशोकानें हलकट लोकांनां संघांतून घालवून देऊन कथावत्थु हा ग्रंथ रचिला; व ख्रि. पू. २५३ त पाटलीपुत्र येथें तिसरी धर्मसभा बोलाविली.
अशोकाला बौद्ध मतांची विशेष आस्था असल्यामुळें, त्यानें धर्मविषयक माहिती शिलास्तंभांवर लिहून ठेविली. या त्याच्या शिलालेखांवरून तत्कालीन बौद्ध संप्रदायाच्या इतिहासाची चांगली माहिती मिळते.