प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

अशोकाच्या राज्यारोहणकालावरून बुद्धाच्या निर्वाणाचें साल ठरविण्याचा प्रयत्न -  अशोकाच्या १३ व्श शिलालेखावरून असें दिसून येते कीं, त्याला राज्याभिषेक झाल्यानंतर १३ व्या वर्षीं जेव्हां त्यानें खडकावर हा लेख कोरविला तेव्हां अँटायोकस थीऑस व मगस हे ग्रीक राजे राज्य करीत होते. अँटायोकस ख्रि. पू. २६१ मध्यें गादीवर बसला; व मगस ख्रि. पू. २५८ व्या वर्षीं मरण पावला असल्यामुळें, अशोकाच्या राज्याभिषेकानंतरचें १३ वें वर्ष ख्रि. पू. २६० व २५८ या दोन सालांच्या दरम्यान पडलें असावें. म्हणजे त्याला ख्रि. पू. २७२ व २७० यांच्या दरम्यान राज्याभिषेक झाला असावा हें उघड आहे. आतां वायुपुराणावरून असें समजतें कीं, बिंबिसाराच्या मृत्यूनंतर ३५३ वर्षांनीं (म्हणजे बुद्धनिर्वाणानंतर ३४५ वर्षांनीं - कारण अजातशत्रूनें बिंबिसाराचा वध करून राज्य बळकाविल्यावर ८ वर्षांनीं बुद्ध मेला असें बौद्ध ग्रंथांत म्हटलें आहे) अशोक मरण पावला. पण शिशुनाग घराण्यांतील नंदिवर्धन व महानंदी हे दोन राजे, नंदघराण्यांतील नंद व महापद्मनंद या दोन राजांचीच द्विरुक्ति होऊन लिहिले जाणें संभवनीय असल्यामुळें, नंद घराण्यांतील राजाबद्दल दिलेला १०० वर्षांचा संशयास्पद काळ या ३४५ वर्षांतून काढून टाकिला असतां, बुद्धानंतर २४५ वर्षांनीं अशोक मरण पावला असें म्हणणें प्राप्त होतें. आतां राज्याभिषेक झाल्यानंतर अशोकानें आणखी ३७ वर्षें राज्य केलें असें बौद्ध ग्रंथांत म्हटलें असल्या कारणानें, निर्वाणानंतर २०८ वर्षांनीं अशोकास राज्याभिषेक झाला असें, व तो ख्रि. पू. २७२-२७० च्या दरम्यान झाला हें आपणांस ठाऊक असल्यामुळें - बुद्धाचें निर्वाण ख्रि. पू. ४८० व ४७८ या दोन सालांच्या दरम्यान केव्हां तरी झालें असें सिद्ध होतें.