प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
गौतमाचें कुल - गौतमाच्या नांवाचा असा अनिश्चय आहे. आतां त्याच्या कुलासंबंधीं विचार करूं.
सुत्तनिपाताच्या उरगवर्गांतील खड्गविषाणसूत्रांत आणि महावर्गांतील प्रव्रज्जसूत्रांत गौतम व बिंबसार यांचा जो संवाद आहे, त्यांत गौतम आपण आदिच्य कुटुंबातील आहों असें म्हणतो. गौतम हा शाक्यांपैकीं होता, अशी प्रसिद्धि आहे. परंतु शाक्यांत लच्छवी (लिच्छवी), मल्ल, नाग, बलि व कोळी, यांचा समावेश होतो (५३१ कुस जातक, ४३५ भद्र जातक ३०१ चुल्लकलिंग). गौतमाची रक्षा ज्या सात जणांनीं वाटून घेतली ते मगधांतील मागध, वैशालीचे लच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकप्पचे बली, रामग्रामचे कोळी, पावाचे मल्ल व वेथदीपाचा ब्राह्मण, ज्यानें रक्षेचा विभाग केला तो, यांपैकीं पहिला व शेवटचा खेरीज करून इतर सर्व शाक्यवंशीय होते. कुस जातकांत गौतमाचा मूळ पुरुष ओक्काक हा मल्लांचा राजा होता असें म्हटलें आहे. गौतमानें आपल्या परिनिर्वाणाच्या वेळीं (मरणसमयीं) मल्लांस बोलाविण्यास आनंद यास आज्ञा केली होती. लिच्छवींचा नाश म्हणजे आप्तांचा नाश टाळण्याचा गौतमानें प्रयत्न केला. तेव्हां गौतम शाक्य खरा, परंतु वर दिल्यापैकीं कोणत्या कुळांतील ? आदिच्य कुटुंब हे कोणतें ? आदिच्य कां औदिच्य ! असे अनेक प्रश्न आहेत, भागवतांत गौतम कोणत्या कुळांत जन्मला तें दिले आहे व तें कुळ आज आपणांस ओळखतांहि येतें.
ततः कलौ संप्रवृत्ते संमोहाय सुरद्विषाम् ।
बुद्धो नाम्नाऽञ्ज्नसुत कीकटेषु भविष्यति ॥ १.३, २४
येथें 'कीकटेषु' हें बहुवचनी पद जनवाचक अथवा जनपदवाचक आहे, या संशयाची निवृति याच्या वरचा श्लोक वाचला म्हणजे होते.
एकोनविंश विंशतितमे वृष्णिषु प्राप्य जन्मनि ।
रामकृष्णाविति भुवो भगवानहरदभरम् ॥
येथें 'वृष्णिषु' हें पद 'कीकटेषु' पदाप्रमाणेंच सप्तमीचें बहुवचन आहे, आणि हीं दोन्ही पदें एका विशिष्ट अर्थानेंच उपयोजिलेलीं आहेत. रामकृष्ण हे 'वृष्णींत' जन्मले व बुद्ध हा 'कीकटांत' जन्मला. 'वृष्णी' हें कुल आहे, जनपद नाहीं. तेव्हां 'कीकट' हेंहि येथें कुलवाचक आहे. जनपदार्थी नाहीं.
हे पुरातन 'कीकट' आजचे कोण याचा निश्चय करण्यापूर्वीं गौतमाचा वंश प्रथम देतों.