प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
चीन देशांतील बौद्ध संप्रदाय.- हान घराण्याचे राजे राज्य करीत असतां चीनमध्यें बौद्ध संप्रदायाचा प्रवेश झाला. बौद्ध संप्रदायाचा महायानी पंथ येथें फार प्राचीन काळापासून चालू आहे. देव, अर्हत व बोधिसत्त्व किंवा बुद्ध या निरनिराळ्या निर्वाणाच्या पाय-यांप्रत सर्व मानव जातीला नेणें हें चिनी बौद्ध संप्रदायाचें मुख्य ध्येय आहे. हीनयान पंथाचा स्वीकार केल्यानें मनुष्य अर्हत या पायरीपर्यंतच जाऊं शकतो, त्यापुढें त्याची प्रगति होऊं शकत नाहीं, असें मोक्ष मिळविण्याची खटपट करणा-या मनुष्यास येथील भिक्षू लोक सांगतात. मठांत वास्तव्य करणें हें महायान पंथाचें मुख्य तत्त्व आहे; व या पंथाचा स्वीकार केल्यानें बोधिसत्त्व व बुद्ध या अर्हताच्या पुढच्या दोन पाय-या चढतां येतात, असें प्रतिपादण्यांत येतें. मठांमध्यें बोधिसत्त्वाच्या व बुद्धाच्या मूर्ती स्थापिलेल्या असून निर्वाणप्राप्तीसाठीं त्या मूर्तीची पूजा करण्यांत येते.
बौद्ध भिक्षूंचे अन्न सात्विक असतें. वनस्पत्याहाराशिवाय दुसरा आहार त्यांनां निषिद्ध आहे. त्यांचा पोषाख साधा असतो. प्रत्येक मठामध्यें अध्यापनाची व्यवस्था केलेली असते. धर्मप्रवचन हें अत्यंत पवित्र व पुण्यप्रद कार्य आहे अशी त्यांची समजूत आहे. एखादा मनुष्य मरण पावला असतां त्याच्या प्रेतापाशीं धर्मग्रंथ वाचण्याची चाल असून हें काम भिक्षूंनीं करावयाचें असतें. असें केल्यानें मृताचा आत्मा बोधिसत्त्वाप्रत जातो अशी त्यांची कल्पना आहे. या वेळीं वाचावयाच्या धर्मग्रंथांमध्यें अमिताभ-सूत्र हा ग्रंथ मुख्य असून बुद्धाच्या हजारों नांवांचाहि उच्चार करावयाचा असतो.
प्रथम बौद्ध भिक्षू होण्याला राजाची परवानगी लागत असे, आणि ती फारशी कोणाला मिळत नसे. यामुळें हिंदुस्थानांतून आणि मध्य आशियांतून गेलेले भिक्षूच फक्त मतप्रचाराचें काम करीत. परंतु पुढें राजाच्या परवानगीचा निर्बंध काढून टाकण्यांत आल्यावर चिनी बौद्ध भिक्षूंची संख्या वाढत गेली. कित्येक भिक्षू बौद्ध शास्त्राचें अध्ययन करण्यासाठीं हिंदुस्थानांत येत, व परत आपल्या देशांत गेल्यावर तेथें विहारांत राहून हिंदी ग्रंथांचीं चिनी भाषांतरें करीत. अशा प्रकारें चिनी बौद्ध ग्रंथांची संख्या बरीच वाढली. फा हिआन, ह्युएन त्संग व इ त्सिंग हे चिनी प्रवासी अशा प्रकारेंच हिंदुस्थानांत येऊन गेले.
चीन देशांतील बौद्ध लोकांत ध्यानाचें माहात्म्य फार आहे. ध्यान व चिंतन करण्यासाठीं मठामध्यें निराळी जागा राखून ठेवलेली असते.
बौद्ध लोकांत भूतदयेला विशेष महत्त्व देण्यांत येत असल्यामुळें गुलामगिरीची चाल बौद्ध लोकांनीं मोडून टाकली. प्रत्यक्ष आईबापांच्या खुनाबद्दलहि सूड न घेतां क्षमाच करावी असें बौद्ध लोकांचें तत्त्व आहे.
बौद्ध लोकांच्या मठांमध्यें धर्म, बुद्ध व संघ या त्रिरत्नांच्या मूर्तीं असल्यामुळें त्यांचा हवामानावर व पर्जन्यावर बराच परिणाम होतो अशी समजूत आहे.
सातव्या शतकापर्यंत बौद्ध संप्रदायाचा चीन देशांत उत्कर्ष झाला. परंतु पुढें आठव्या शतकापासून मात्र बौद्ध प्रचारकांचा तेथें छळ होऊं लागला. कन्फ्यूशिअनी पंथ हा तेथील राजधर्म असल्यामुळें त्याच्याशीं बौद्धसंप्रदायाला झगडावें लागलें. इ. स. ८४५ त वु-त्संग नामक बादशहानें ४,६०० मठ व ४०,००० इतर धार्मिक इमारती उध्वस्त करून टाकल्या; व २,६०,००० भिक्षू व भिक्षुणीं यांनां पुन्हां गृहस्थाश्रम घेण्यास लाविलें दहाव्या शतकांत हजारों बौद्ध मंदिरांचा विध्वंस करण्यांत आला. राजाच्या हुकुमाशिवाय बौद्ध लोकांनीं मठ वगैरे बांधूं नयेत, कोणाहि बौद्ध भिक्षूनें एकापेक्षां अधिक शिष्य ठेवूं नये व ४० वर्षांचें वय होईपर्यंत कोणींहि मतप्रचाराचें काम करूं नये असे कायदे चीनमध्यें केलेले आहेत. यामुळें बौद्ध भिक्षू व भिक्षुणी यांची संख्या अगदीं कमी झाली आहे; परंतु गृहस्थाश्रमी बौद्ध लोक बरेच आहेत. ते एकमेकांनां साहाय्य करतात. निर्वाणप्राप्तीसाठीं मठांत जाऊन राहिलेंच पाहिजे असा निर्बंध नसल्यामुळें, खून, चोरी, अनीतिकर्म, असत्य भाषण व मादक पदार्थांचें सेवन या पांच गोष्टींपासून अलिप्त राहणें एवढा धर्म सामान्य जनांस पुरेसा होतो. आठव्या नवव्या शतकापर्यंत बौद्ध संप्रदायास फक्त कन्फ्यूशिअनी पंथाशींच झगडावें लागलें; परंतु त्यानंतर त्याला ब्रह्माचें सर्वव्यापित्व बोधणारा ताओ पंथ हा आणखी एक प्रतिस्पर्धी उत्पन्न झाला. या ताओ पंथाचें बौद्ध संप्रदायाशीं कांहीं गोष्टींत साम्य आहे. एका चिनी बादशहानें हे दोन्ही संप्रदाय एक करून टाकण्याचा प्रयत्न केला, व त्या कामी त्याला थोडें बहुत यशहि मिळालें. चीनमध्यें हिंदुस्थानांतून जे अनेक श्रमण गेले, व ज्यांनीं चिनी भाषेंत अनेक ग्रंथ लिहिले अशांची यादी प्रस्तावनाखंडाच्या पहिल्या विभागांत चीनवरील प्रकरणांत दिली आहे.