प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

जैन संप्रदायाचा दक्षिणेंतील समकालीन प्रसार.- बौद्ध संप्रदायचा दक्षिण हिंदुस्थानांत प्रसार होत असतांना त्याच्या बरोबर जैन संप्रदायाचा देखील तेथें प्रसार होत असावा हें खालीं दिलेल्या गोष्टींवरून सिद्ध होतें:-

ह्युएनत्संग ह्यानें दिलेल्या माहितीवरून (इं. गॅ, पु. २ पृ. १६ पहा) असें वाटतें कीं, हे दोन्ही संप्रदाय जणूं काय एकाच पंथाच्या दोन शाखा आहेत. ह्या दोन्हीहि संप्रदायांप्रमाणें गौतमापूर्वीं चोवीस बुद्ध होऊन गेले. म्हणून दोघांचाहि गौतम एकच असावा. ह्या दोन्ही संप्रदायांत भेद फार थोडा आहे. शिवाय, गौतम बुद्ध हा जैन महावीर ह्याचा शिष्य होता असें म्हटलेलें आहे. ह्यावरून असें दिसते कीं ह्या दोन्ही संप्रदायांची कांहीं शतकेंपर्यंत बरीच दोस्ती असावी.

मौर्य घराण्यांतील चंद्रगुप्त राजा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत जैन गुरु भद्रबाहु याच्यासह म्हैसूरमध्यें श्रवणबेळगोळ येथें येऊन राहिला होता. ह्या गोष्टीला सिद्धपूर येथील डोंगरांत कोरलेल्या अशोकाच्या आज्ञापत्राचाच आधार सांपडतो. इसवी सनाच्या दुस-या शतकाच्या शेवटीं जैन उपाध्याय सिंहनन्दि हा म्हैसूरच्या दुस-या एका भागांत जाऊन राहिला; व तेथें दडिग आणि माधव हे दोघेहि राजे त्याचे शिष्य झाले. दक्षिणेंतील कांहीं राजांनीं जैन पंथ स्वीकारला होता. कांची येथील कांहीं पल्लव आणि पांड्य राजे ह्या संप्रदायाचे कट्टे अनुयायी होते. पश्चिमेकडील चालुक्य राजे जैन संप्रदायालाच उत्तेजन देत होते. पल्लवांचा राजा महेंद्रवर्मा व राष्ट्रकूटांचे कांहीं राजे जैनपंथी होते. पहिल्या अमोघवर्ष हा स्वतः जैन मताचा असून त्यानें जैन लोकांकरितां आपल्या राजाकडून खाण्यापिण्याची सोय करून घेतल्याची नोंद आहे. समंतभद्र, अकलंक, विद्यानंद, माणिक्यनंद, प्रभाचंद्र, जिनसेन आणि गणभद्र ह्या सर्वांनीं जैन संप्रदायाचा प्रसार करण्यास चांगलाच हातभार लाविला. अज्जणन्दि नांवाच्या एका जैन आचार्याचा एक शिलालेख सांपडला असून त्यांत त्या वेळच्या निरनिराळ्या जैन शिक्षकांचीं नांवें दिलीं आहेत; आणि आणैमलै (मदुरेपासून ६ मैल) हा जैन वसाहतींपैकीं एक गांव होता असेंहि त्या शिलालेखांत म्हटले आहे. पांड्य देशांत शिलालेख सांपडले आहेत (मद्रास एपिग्राफिकल कलेक्शन फॉर १९१०, नं. ६१, ६२ व ६८) त्यांवरून असें दिसतें कीं, कुरंदी अष्टोपवासी हा एक प्रख्यात जैन उपाध्याय होऊन गेला व त्याचे कनकनंदि वगैरे बरेच शिष्य झाले. उत्तर आणि दक्षिण अर्काट, मदुरा, तिनवेल्ली आणि म्हैसूर येथें जैन तीर्थंकरांचीं मंदिरें व त्यांतील जैन भिक्षूंचीं नांवें आढळतात. पल्लवांचा राजा महेंद्रवर्मा ह्यानें कडलोर येथील जैन स्मारकें उध्वस्त केलीं असा पेरियपुराणम् या ग्रंथांत उल्लेख आहे.