प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
धर्मसभा - बुद्धाच्या निर्वाणानंतर थोड्या दिवसांनीं महाकाश्यप नांवाच्या त्याच्या एका शिष्यानें राजगृह येथें भिक्षूंची एक सभा भरविली. बुद्धाच्या आज्ञा नीट समजावून देणें हा या सभेचा उद्देश होता. या पहिल्या धर्मसभेनें संघासंबंधाच्या कडक नियमांत व आचारांत कांहीं सुधारणा केल्या; परंतु धर्मशास्त्रांतल्या वचनांच्या स्पष्टीकरणासंबंधी कित्येक प्रश्न उपस्थित झाल्यामुळें, पहिल्या सभेनंतर १०० वर्षांनीं वैशाली येथें दुसरी धर्मसंगीति भरविण्यांत आली. बौद्धांची तिसरी धर्मसभा प्रसिद्ध बौद्ध राजा अशोक याच्या कारकीर्दींत पाटलिपुत्र येथें भरली होती.