प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

तिबेटांतील बौद्धसंप्रदाय - इ. स. च्या सातव्या शतकांत तिबेटांत बौद्ध संप्रदायाचा प्रवेश झाला. कालांतरानें तेथील राजानें हिंदुस्थानांतून बौद्ध भिक्षू व त्यांचे ग्रंथ आपल्या देशांत आणविले. प्रथमतः तिबेटांत बोन नामक एक पंथ प्रचलित होता. तो पंथ व बौद्ध संप्रदाय यांचें मिश्रण होऊन लामा पंथ उत्पन्न झाला. लामा पंथांत राजापेक्षां धर्मगुरूला अधिक मान आहे. महायान पंथापासूनच या लामा पंथाची उत्पत्ति झालेली आहे. लामा पंथांत बुद्धाच्या मूर्तीशिवाय इतर अनेक मूर्ती पूजेसाठीं ठेविलेल्या असतात. हे लामा लोक इतर लोकांच्या घरींहि प्रार्थना करण्याकरितां जातात. ते भिक्षा मागत नाहींत; लोक त्यांनां त्यांच्या मठांतच शिजलेलें अन्न आणून देतात. लामापंथामध्यें पुन्हां अनेक पोटपंथ आहेत. तिबेटांत ३,००० पेक्षां अधिक मठ असून प्रत्येकांत सुमारें दहा हजारांपर्यंत भिक्षू राहतात. ल्हासा येथील दलाई लामाचा मठ फार महत्त्वाचा आहे. तिबेटांत पूर्वी रानटी लोकांची वस्ती होती. पण बौद्ध लोकांनीं त्यांनां सुशिक्षित केलें. लामा पंथांत कमळ ही अत्यंत पवित्र वस्तु मानण्यांत येते. तिबेटांतील मंदिरांत कित्येक प्राण्यांचीं चित्रें असतात, व ते सर्व पवित्र समजलें जातात. हल्लींचे लामा, लोकांनां ख-या धर्माचा मार्ग न दाखवितां त्यांची राजरोसपणें फसवणूक करीत असतात. त्यांच्या अंगीं धनतृष्णा आलस्य वगैरे अनेक दुर्गुण जडले आहेत.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत बौद्ध ग्रंथांचा प्रचार यूरोपीय लोकांत झाला. आज सुशिक्षित यूरोपीयांत वीस हजारांवर बुद्धानुयायी आहेत असें म्हणतात.