प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

तिस्साच्या मतप्रसारकांचें पांड्य देशांत आगमन.- सिंहलद्वीपामध्यें मूतिशिव ह्याचा दुसरा मुलगा तिस्स ह्यानें बौद्ध संप्रदाय आणला अशीहि माहिती महावंशांत आहे. ह्या राजाच्या वेळीं तेथें अरिट्ट आणि महिंद असे दोन प्रमुख मतप्रसारक होऊन गेले. त्यांची मतप्रसार करण्याच्या कामांत राजाला बरीच मदत झाली. हे दोघेहि सिंहलद्वीपामधून मतप्रसार करण्याकरितां बाहेर गेले. पहिल्यानें ते पांड्य देशांतच आले असावे. कारण पांड्य देश सिलोनच्या शेजारीं असून या दोन देशांमधील दळणवळणहि बरेंच वाढलेलें होतें. वरील विधान करण्यास आणखीहि कांहीं गुहांतील शिलालेखांचे आधार सांपडतात (असिस्टंट आर्किऑलॉजिकल सुपरिंटेंडेंट यांचे 'अर्लिएस्ट लिथिक मॉन्युमेंट्स ऑप दि तामीळ कंट्री' या नांवाखालीं प्रसिद्ध झालेले १९०६-७, १९०७-८ व १९०८-९ सालांचे वार्षिक अहवाल पहा).