प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बुद्ध निर्वाणाचा नक्की दिवस.- वरील विवेचनावरून आपणांस बुद्धाचा निर्वाणकाल स्थूलमानानें ख्रि. पू. ४८०-४७८ असा ठरवितां येतो असें दिसून येईल. बुद्धाच्या मृत्यूचें नक्की वर्ष, महिना व दिवस काढण्याकरितां बिशप बिगंडेट्सकृत गोदमचरित्रांतील पुढें दिलेल्या तिथी गोपाल अय्यर यांस महत्त्वाच्या वाटतात.

१. फान्गुनशुद्ध १ रोज शनिवारपासून कौझ्द शक प्रचारांतून गेला !!!
२. चैत्रशुद्ध १ रोज रविवारपासून ईत्झन शक प्रचारांत आला.
३. वैशाख शुद्ध १५ (ईत्झन) शक ६८ रोजी शुक्रवारीं विशाखा नक्षत्र असतांना बुद्ध जन्मास आला.
४. ९६ सालीं रविवार आषाढ शुद्ध १५ रोजीं उत्तराषाढा नक्षत्र असतांना बुद्ध कपिलवस्तु सोडून गेला.
५. १०३ सालीं वैशाख शुद्ध पौर्णिमेस बुधवारीं विशाखा नक्षत्र असतांना बुद्धास पूर्णज्ञान प्राप्त झालें.
६. १०७ सालीं श्रावणशुद्ध पौर्णिमेंस शनिवारीं सूर्योदयीं शुद्धोदन मरण पावला
७. १४८ सालीं वैशाख शुद्ध पौर्णिमेस, मंगळवारी, विशाखा नक्षत्रावर सूर्योदयाच्या किंचित् अगोदर बुद्धाचें निधन झालें.
८. फाल्गुन शु. १ रोज सोमवार शके १४८ पासून बौद्ध पंथाचा शक सुरू झाला.

बुद्धाच्या निर्वाणाची जेवढीं म्हणून वर्षें सुचविण्यांत आलीं आहेत त्यांपैकीं फक्त ख्रि. पू. ४७८ हेंच वर्ष घेतलें असतां वरील तिथी त्या त्या ठिकाणीं दर्शविलेल्या वारीं पडतात, व जेथें नक्षत्रे दिलीं आहेत तेथें तींहि जुळतात. यावरून ख्रि. पू. ४७८ या वर्षांतील वैशाख शुद्ध पौर्णिमेस म्हणजे एप्रिल महिन्याच्या १ ल्या तारखेस बुद्ध मरण पावला असला पाहिजे हे निर्विवाद सिद्ध होतें.