प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

गौतमाच्या नीतिविषयक कल्पनेचें उदाहरण - परंतु याहूनहि चमत्कार वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे 'मल्लिकेनें' व्यभिचार केला त्या बाबतींत कोसलाधिपास गौतमानें जो उपदेश केला ती होय. पब्बतूपथ्यहर, खष्टिवण्णन, कोसिय, सेय्य, एकराज, मणिकुण्डल, घट व मित्तामित्त या जातकांवरून असें दिसतें कीं, कोसलाधिप प्रसेनजित् हा आपल्या सीमेवर कांहीं बंड झालें होते तें मोडण्याकरितां गेला असतां मागें त्याची स्त्री-गौतमानें त्यास मिळवून दिलेली मल्लिका-हिनें आपल्या एका प्रधानाबरोबर व्यभिचार केला. राजा परत आल्यानंतर त्यास तें वृत्त कळलें. वृद्धपणामुळें त्यास मल्लिका सोडवेना, परंतु प्रधानास मात्र त्यानें बंदींत टाकिलें. कदाचित् मल्लिकेनें त्यामुळें आकांत केला असावा. पुढें राजानें त्या प्रधानाचें काय करावें म्हणून गौतमास सल्ला विचारला असतां गौतमानें जो सल्ला दिला तो विचार करण्यासारखा आहे. त्यानें राजास असा प्रश्न केला कीं, या प्रधानाच्या बुद्धिमत्तेमुळें तुम्हास त्याची आवश्यकता आहे कीं नाहीं ? राजानें या प्रश्नास 'होय' म्हणून उत्तर दिल्यावर गौतमानें त्यास सोडून देऊन पुन्हां पूर्ववत् त्याच्या अधिकारावर त्यास स्थापावा असें सांगितलें.

गौतमानें असा सल्ला दिलेला पाहून अतिशय आश्चर्य वाटतें. अनीति ही दण्ड्य केव्हां, तर ज्या वेळीं तिच्यापासून लाभ नाहीं तेव्हां; अथवा जेव्हां लाभालाभाचा प्रश्न उद्भवतो तेव्हां नीतिअनीतीचा प्रश्न बाजूस सारणें योग्य आहे, असेंच गौतमानें या वेळच्या आपल्या वर्तमानें दाखविलें. गौतमाच्या धर्मावर जो एक मोठा आक्षेप आहे कीं, त्यास सत्य हें सत्य म्हणून प्रिय नव्हतें तर त्यापासून स्वतःचें कल्याण होतें म्हणून प्रिय होतें, म्हणजे त्याचा धर्म अत्यंत स्वार्थी आहे, त्या आक्षेपाच्या यथार्थत्वाची जणूं काय सिद्धीच गौतमानें प्रसेनजितास या वेळीं केलेल्या उपदेशानें केली. तसेंच राजांच्या अंतर्गृहांत व राजकारणांत झालेला हा बौद्धांचा प्रवेश पाहूनहि या संप्रदायाबद्दल मन साशंक होतें.

गौतमाच्या चरित्रांतील यानंतरची गोष्ट म्हणजे त्याचें महापरिनिर्वाण, गौतम कुसिनार - कुशनगर - येथें जाण्यास निघाला असतां प्रथम तो 'पावा' येथें गेला. तेथील 'चण्ड' नांवाच्या घिसाड्यानें आपल्या घरीं बोलावून आणून त्यास मांसभोजनं (डुकराच्या मांसाचें) दिलें. मिलिंद-प्रश्नांतील उल्लेखावरून असें दिसतें कीं, गौतमानें तेथें प्रकृतीस न मानवेल इतकें भोजन केलें व त्यामुळें त्यास अजीर्ण होऊन अतिसार झाला. वाटेंत बरोबर आनंद होता. लागलेली तहान भागवीत ते कुकुत्थ नदीवर येऊन पोहोंचले. तेथें गौतमानें स्नान केलें. परंतु त्यास अत्यंत थकवा येऊन भ्रम उत्पन्न होऊं लागला; म्हणून शेजारच्या आंबराईंत जाऊन तो आपल्या कंथेवर निजला. तेथून हलके हलके ते कुसिनाराजवळील आम्रराजींत जाऊन पोहोंचले. तेथून हिरण्यवती नदी ओलांडून उपवर्तन नामक शालवृक्षराजींत ते गेले, तेथें गौतमानें दोन शालवृक्षांत अंग टाकलें आणि निर्वाणास गेला. तो प्रसंग येणेंप्रमाणें वर्णिलेला आहे.