प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

गौतमाचें नांव - गौतमाच्या चरित्राचा विचार करूं लागलों म्हणजे प्रथम त्याच्या नांवाचाच प्रश्न पुढें उभा राहातो. गौतमाचें नांव कोणतें ? अमरकोशांत 'गौतम' हें नांव आहे.

सर्वज्ञः सुगतो बुद्धो धर्मराजस्तथागतः ।
समंतभद्रो भगवान् मारजिल्लोकजिज्जिनः ॥ इत्यादि

यांत 'विशेषनाम' कोणतें ? शाक्यमुनि, शाक्यसिंह, नागराज, भदन्त, हीं नांवें विशेषनामें नव्हत. सिद्धार्थ, विनायक, त्यांपैकींच गौतम (विनयति शास्तीति विनायकः ।  गौतमो गौतमगोत्रावतारात ॥ अमरकोश क्षीररवामीकृत टीकेसह १. १३-१५) या नांवाबद्दल स्पेन्स हाडींनें स्पष्ट असे म्हटलें आहे कीं, हें पैतृक नांव आहे. गौतमाची एक सावत्र आई गौतमी असावी असें दिसतें, व तिनेंच गौतमाचें त्याच्या आईच्या निधनानंतर पालन केलें, म्हणून 'गौतम' हें नांव त्यास मिळालें असावें. 'भगवान' हें नांव महायानी अश्वघोषानंतर 'सद्धर्मपुण्डरीकांत' आढळतें. याचें कारण उघड आहे कीं, त्यापूर्वीं कित्येक वर्षें बौद्ध संप्रदायावर श्रीभगवद्गीतेचा बराचसा परिणाम झाला होता. अश्वघोषाच्या 'प्रबुद्धधर्मांतहि भगवद्गीतेशीं सम असे कित्येक विचार आहेत. एवढेंच नाहीं तर समान वचनेंहि त्यांत आहेत ! परंतु या ग्रंथांत 'भगवान' हें नांव आढळत नाहीं. आपल्या पुराणांत जे उल्लेख आहेत त्यांवरूनहि या बुद्धाच्या नांवाचा निश्चय होत नाहीं.

ततः कलौ संप्रवृत्ते संमोहाय सुरद्विषाम् ।
बुद्धो नाम्ना ऽञ्ज्नसुतः कीक्रटेपु भविष्यति ॥ १.३, २४

या श्रीमद्भागवतांतील श्लोकावरून बुद्ध' हेंच गौतमाचें नांव होतें असें दिसतें.

विष्णुपुराणांत तर त्याचें नांव नुसतें 'मायामोह' म्हणूनच दिलें आहे. गौतमाच्या आईचें नांव महामाया किंवा माया, असें होतें व तिच्या पोटीं मोहरूप पुत्र उत्पन्न झाला त्यास 'मायामोह' म्हणतात, असा या पुराणांतील श्लोकाचा भावार्थ आहे.

तपस्याभिरतान्सोध मायामोहोमहासुराम् ।
मैत्रेय ददृशे गत्वा नर्मदातीर संश्रयान् ॥

अग्निपुराणांत 'बुद्धावतार कथनम्' या १६ व्या अध्यायांत
रक्षरक्षेति शरणं वदन्तो जग्मुरीश्वरम् ।
मायामोहस्वरूपोऽसां शुद्धोदनसुतोऽभवत् ॥

श्रीमद्भागवत, विष्णुपुराण व अग्निपुराण यांतील हे जे उतारे दिले आहेत त्यांवरून त्या वेळीं बुद्धाचें नांव गौतम होतें हें या श्लोककारांस माहीत नाहींसें दिसतें. पुराणांतील या श्लोकांचा काळ निश्चयानें कनिष्काच्या वेळचा अथवा त्यानंतरचा असला पाहिजे. हा कालनिश्चय थोडक्यांत करूं.

अश्वघोषाच्या 'प्रबुद्धधर्मांत' सुखवति सूत्राचा उल्लेख केलेला आहे. सुखवतिसूत्रांत अनादि बुद्ध, त्याचे बोधिसत्त्व व त्याचे मानवी अवतार यांची कल्पना आहे. म्हणजे त्या वेळीं 'बुद्धास' अवतारत्व प्राप्त झालेलें होतें; अश्वघोष हा वसुमित्र अथवा वसुबंधु याचा समकालीन होता. कनिष्कानें जालंधर येथें जी संगीति भरविली होती तिचा अध्यक्ष वसुमित्र हा होता. म्हणजे कनिष्काच्या वेळीं बुद्धाचें अनादित्व व सर्वज्ञत्व प्रस्थापित झालें होतें. कनिष्कानें आपल्या नाण्यावर बुद्धाची मूर्ति खोदविलेली आहे. यावरून असें सहजच अनुमान होतें कीं, बुद्ध हा परब्रह्म व गौतम हा त्या परब्रह्माचा मानवी अवतार अशी समजूत कनिष्काच्या वेळीं दृढ झालेली असावी. कनिष्काच्या नंतर वासुदेवाच्या वेळीं वैदिक धर्माचें पुनरुज्जीवन झालें. त्याच्या वेळीं नारायण वासुदेवाचीं देवालयें बांधिलीं गेलीं. यावरून कदाचित् चातुर्वर्णीयांनीं बुद्धास अश्वघोषाचा बुद्ध - बिंबसाराचा अथवा प्रसेनजित् यांचा गौतम नव्हे - व्यक्ति म्हणून नव्हे, तर एक मूर्तरूप कल्पना म्हणून आपल्या अवतारांत त्याची गणना केली असावी असें वाटतें.

तेव्हां विशिष्ट व्यक्ति म्हणून नव्हे, तर केवळ एक कल्पना म्हणून जर आपल्या पुराणकारांनीं बुद्धास अवतार कल्पिलें असेल, तर त्याचें विशिष्ट नांव त्यांनीं दिलें नाहीं हेंहि योग्चय आहे. परंतु तसें नसल्यास त्यांपैकीं कोणींहि बुद्धाचें नांव न देणें हें आश्चर्य आहे. त्या वेळींहि गौतम बुद्धाच्या नांवाचा निश्चय नव्हता काय ? स्पेन्स हाडीनें तर 'सिद्धार्थ' हें बुद्धाचे पांचव्या दिवशीं पाळण्यांत ठेविलेलें नांव होतें, असें म्हटलें आहे.