प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

बौद्ध शिल्पकला व चित्रकला.- बौद्ध संप्रदायाच्या आश्रयानें चित्रकलेस, मूर्तिशिल्पास व गृहशिल्पास विशिष्ट रूप आलें. त्यांच्या इतिहासास विचारेतिहासाप्रमाणेंच संप्रदायेतिहासांत स्थान दिलें पाहिजे. हिंदुस्थानांतील बौद्ध शिल्पकलेनें स्तूप, चैत्य व विहार अशीं तीन प्रकारचीं बांधकामें अस्तित्वांत आणलीं आहेत. स्तूप हे प्रथमतः बुद्धाचे अवशेष ज्या ठिकाणीं पुरून ठेविलेले होते त्या ठिकाणीं उभारण्यांत आले; परंतु पुढें बुद्धासंबंधीं ज्या ज्या ठिकाणीं महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या त्या ठिकाणींहि त्या गोष्टींचीं स्मारकें म्हणून स्तूप उभारले जाऊं लागले. सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे. तो ख्रिस्तपूर्व तिस-या शतकांत बांधण्यांत आला असावा. चैत्य म्हणजे सभागृह हें ख्रिस्ती लोकांच्या उपासनामंदिरासारखें असतें. कालांतरानें या चैत्यांमध्यें मूर्ती वगैरे ठेवण्याचा प्रघात पडून त्यांनां हिंदू लोकांच्या देवळांचें स्वरूप प्राप्त झालें. विहार किंवा मठ हे बौद्ध भिक्षूंनां राहण्यासाठीं बांधलेले असत. अजिंठा येथील विहार महत्त्वाचे आहेत. कारण त्यांवरून शुद्ध बौद्ध कला अवगत होते. ख्रि. पू. २०० पासून इ. स. ६०० पर्यंतच्या कालामध्यें ते बांधलेले असावेत. वेरूळ येथील विहारांवरून बौद्ध संप्रदाय, ब्राह्मण धर्म व जैन संप्रदाय यांचा परस्परसंबंध दिसून येतो. या ठिकाणीं बुद्धाच्या मूर्ती दृष्टीस पडतात. अगदीं प्राचीन काळीं बुद्ध किंवा बोधिसत्त्व यांच्या मूर्ती अस्तित्वांत नव्हत्या. त्या इसवी सनाच्या पहिल्या शतकांत दिसूं लागल्या. पुढें लवकरच चित्रकलेचाहि बौद्ध लोकांत प्रवेश झाला. धर्मपरायण बौद्धांच्या ज्ञानवृद्धीसाठीं, भिंतींवर व स्तंभांवर बुद्धाचीं चित्रें काढण्यांत येऊं लागलीं. जातककथांतील कितयेक प्रसंगांचीं चित्रें कांहीं ठिकाणीं काढलेलीं आढळतात. पुढें पुढें इतर लोकांप्रमाणेंच बौद्ध लोकहि मूर्तीचा उपयोग करूं लागले, व अखेरीस अमुक मूर्ति सामान्य हिंदूंची कीं बौद्धांची हें ओळखणेंहि दुरापास्त झालें. अशा रीतीनें बौद्ध संप्रदायाचें वैशिष्ट्य नष्ट होऊन तो संप्रदाय सामान्य हिंदुसंस्कृतींत समाविष्ट झाला.