प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
भूतानमधील बौद्ध संप्रदाय - भूतानमध्यें प्रचलित असलेल्या संप्रदायास दक्पा बौद्ध पंथ असें म्हणतात. लामा पंथाचाच हा एक जुना प्रकार आहे. या पंथांत पिशाचपूजेची चाल आहे.
दक्षिण तिबेटांतील एका लामानें (भिक्षूनें) सतराव्या शतकाच्या आरंभीं भूतानांत स्वारी केली, तेव्हांपासून भूतानांत बौद्धसंप्रदाय चालू आहे. येथील मुख्य लामास म्हणजे महोपाध्यायास धर्मराजा असें म्हणतात. त्याच्या हातीं ऐहिक व पारमार्थिक सर्व सत्ता असते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा एखाद्या लहान मुलाच्या देहांत प्रवेश करतो अशी तेथील लोकांची समजूत असून दैवी चिन्हांवरून व शुभ शकुनांवरून हें मूल शोधून काढण्यांत येतें, व तें मोठें झाल्यावर त्यास धर्मराजाची गादी मिळते. त्याच्या लहानपणीं सर्व सत्ता ज्या एका प्रतिनिधीच्या हातीं असते त्यास देवराजा असें म्हणतात. भूतानच्या मुख्य लामास म्हणजे धर्मराजास ''लोकनायक, धर्मसंरक्षक, सरस्वतीतुल्य विद्वान, धर्मशास्त्रज्ञ, ईश्वराचा अवतार'' वगैरे पदव्या आहेत. कार्ग्यूप नांवाचे जे लोक अद्भुत सामर्थ्य मिळविण्यासाठीं गुहांमध्यें रहातात त्यांपैकींच दक्पा ही एक शाखा आहे. तेथील भिक्षूंपैकीं अगदीं थोडे भिक्षू ब्रह्मचारी असतात. भूतानमधील बौद्ध लोक तांबडी टोपी घालतात. त्यांच्या धर्मराजाच्या टोपीवर एक लंबरूप शूलचिन्ह असतें. या लोकांत श्मश्रू करण्याची चाल आहे.
ताशि-को ही या देशाची राजधानी असून, येथेंच धर्मराजा रहातो. त्याचा मठ इतर सर्व मठांपेक्षां मोठा आहे. ब्रिटिश भूतानांत, दार्जीलिंग जवळ, कलिंपाँग व पेडाँग येथें दक्पांचीं देवळें आहेत. एकंदर लोकवस्तीच्या सुमारें दशांशाइतकी भिक्षूंची संख्या आहे, परंतु त्यांपैकीं मठांत फक्त थोडेच लोक रहातात; बाकीचे भिक्षू सरकारी नोकर किंवा व्यापारी आहेत. येथें कित्येक संन्यासी व संन्यासिनीहि आहेत.