प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

ललितविस्तर ग्रंथांतील बुद्धाची कथा - लाषलतविस्तर हा बुद्धचरित्रपर संस्कृत ग्रंथ हिंदुधर्मांतील पुराणांच्या पद्धतीवर लिहिलेला आहे. राम, कृष्ण यांच्याप्रमाणें बुद्ध हाहि एक परमेश्वराचा अवतार आहे अशा पद्धतीचें प्रतिपादन या ग्रंथांत असल्यामुळें हा अवतार घेण्याचें कारण व त्याची पूर्वतयारी यासंबंधाचें वर्णन या ग्रंथाच्या आरंभीच्या प्रकरणांत आहे. इतकेंच नव्हे, तर पुराणांतील, सूत शौनकाप्रत सांगतात या नमुन्यावरहुकूम ललितविस्तरांत भगवान् भिक्षूंच्या विनंतीवरून त्यांनां बुद्धचरित्राची कथा सांगतात, अशीच ग्रंथाची मांडणी केली आहे.

क था नि रू प णा चा प्र सं ग - कोणे एके काळीं भगवान् श्रावस्ती (कोसल देशाची प्राचीन राजधानी उर्फ आधुनिक आयोध्या प्रांतांतील फैजाबाद शहर) नगरीच्या जेतवनानजीक अनाथपिंडद नांवाच्या उपवनांत फिरतां फिरतां येऊन पोहोंचले. त्यांच्याबरोबर बारा हजार भिक्षूंचा समुदाय होता, व शिवाय बत्तीस हजार बोधिसत्वाहि होते. तेथें भगवान् समाधि लावून बसले असतां ईश्वर, महेश्वर, नंद, सुनंद, प्रशांत, महित, इत्यादि अनेक देवपुत्र प्राप्त झाले व त्यांनीं ललितविस्तर ग्रंथांतील कथा सांगण्याविषयीं भगवानास विनंति केली. बोधिसत्त्व व श्रावक यांनींहि तशीच विनंति केल्यावरून भगवान् ती कथा सांगते झाले.

अ व ता र प्र यो ज न- एकदां देवांनीं तुषित येथें वास्तव्य करून असलेल्या बोधिसत्त्वाकडे जाऊन जंबुद्वीपांत अवतार घेण्याबद्दल विनंति केली. तेव्हां बारा वर्षांनीं बोधिसत्त्व मनुष्य अवतार घेईल अशी भविष्यवाणी झालीं. नंतर अनेक देवपुत्रांनीं जंबुद्वीपांत (बौद्ध ग्रंथाप्रमाणें हिंदुस्थानांत) ब्राह्मणाचें रूप घेऊन ब्राह्मणांनां वेद शिकविला.

पुढें तिस-या प्रकरणांत चक्रवर्ती राजांचीं लक्षणें सांगून त्याला चक्ररत्न, हस्तिरत्न, स्त्रीरत्न वगैरे सात रत्‍नें कशीं प्राप्त होतात तें सांगितलें आहे. पुढें बोधिसत्त्वानें कोणत्या कुलांत जन्म घ्यावा याचा विचार करतांना वैदेह, कोशल, वंशराज, वैशाली, प्रद्योत, कंस, पांडु व सुमित्र या प्राचीन भारतीय कुलांचें गुणदोषविवेचन केलें आहे. नंतर बोधिसत्त्वानें ज्या कुलांत जन्म घ्यावयाचा त्या कुलाला अवश्य असलेले चौसष्ट गुण, व ज्या स्त्रीच्या पोटीं जन्म घ्यावयाचा त्या स्त्रीच्या ठिकाणीं अवश्य असलेले बत्तीस गुण सांगितले आहेत. बोधिसत्त्व व देवपुत्र यांनीं वरील सर्व गोष्टी विचारांत घेऊन बोधिसत्त्वानें शाक्य देशांतील शाक्य कुलांतल्या शुद्धोदन राजाच्या मायादेवी नांवाच्या स्त्रीच्या पोटीं जन्म घ्यावा असें ठरविलें.

चवथ्या अध्यायांत, बोधिसत्त्वानें मनुष्यजन्म घ्यावयास जाण्यापूर्वीं जमलेल्या देवपुत्रांनां निरनिराळे एकशें आठ विषय घेऊन धर्मनिरूपण केलें त्याबद्दलची माहिती दिली आहे.

बु द्ध ज न्म सू च क शु भ चि न्हें - पांचव्या अध्यायांत भगवान् भिक्षूंनां सांगतात:-  नंतर बोधिसत्त्वानें मैत्रेय बोधिसत्त्वाला तुषिताचा कारभार पाहण्यास नेमून देवपुत्रांचा निरोप घेतला व जंबुद्वीपांत जन्म घेण्याचा काल निश्चित केला. अवतारापूर्वीं शुभ चिन्हें म्हणून शुद्धोदन राजाच्या राजवाड्यांतील घाण, डांस, चिलटें वगैरे सर्व नाहीशीं होऊन सर्वत्र स्वच्छता झाली; हिमालयपर्वताकडील अनेक जातींचे पक्षी राजवाड्याच्या निरनिराळ्या भागांवर येऊन बसले; आणि बागांतील सर्व झाडें फलपुष्पांनीं भरून गेलीं. मायादेवीनें देहशुद्धीकरतां व मनःशुद्धीकरितां उपवास करण्याचें राजाच्या परवानगीनें ठरवून तें व्रत केलें. अप्सरांनीं राजवाड्यांत प्रवेश करून मायादेवीचें दर्शन घेतलें व तिच्यावर पुष्पवृष्टि केली.

सहाव्या अध्यायांत असें सांगितलें आहे कीं, वसंत ॠतूंत वैशाख महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशीं प्रशांत समयीं बोधिसत्त्वानें तुषित येथील निवासस्थान सोडून पीतशुभ्रवर्ण, सहा दांत इत्यादि गुणविशेषांनीं युक्त असलेल्या हत्तीच्या रूपानें मायादेवीच्या शरीरांत प्रवेश केला. त्या वेळीं याच गोष्टीचें स्वप्न मायादेवीला पडलें. तें तिनें राजाला सांगितलें; तेव्हां राजानें विचारल्यावरून ब्राह्मणांनीं त्याचा अर्थ असा सांगितला कीं, मायादेवीच्या पोटी एक पुत्र जन्मास येईल व तो चक्रवर्ती राजा होईल, पण पुढें गृहत्याग करून बुद्ध बनेल.

बु द्धा चा ज न्म - सातव्या अध्यायांत भगवान् सांगतातः भिक्षूहो, बोधिसत्त्व जन्माला येण्यापूर्वीं बत्तीस शुभ शकुन झाले. फुलझाडांनां कळ्या आल्या पण फुलें उमललीं नाहींत, फळझाडांनां मोहोर आला पण त्यांनीं फळें धरलीं नाहींत, कपिलवस्तु नगरीकडे हिमालयांतले अनेक सिंह येऊन नगरीभोंवतीं हिंडूं लागले, पांचशें हत्तींनीं त्या नगरींत प्रवेश केला, आकाशांत सूर्यचंद्रतारकागणांचे रथ थांबून राहिले, जिकडेतिकडे सुगंध सुटले इत्यादि. हे शुभशकुन होते. पुढें पूर्ण दहा महिने भरल्यावर मायादेवी प्रसुत होऊन बोधिसत्त्व जन्मास आला. तेव्हां अनेक शुभ गोष्टी घडल्या : आजारी लोक रोगमुक्त झाले, क्षुधिततृषित लोकांची क्षुधातृष्णा शांत झाली, वेडे लोक पुन्हां सुबुद्ध झाले, दरिद्री श्रीमंत झाले व मायादेवीवर अप्सरांनीं पुष्पवृष्टि केली. शुद्धोदन राजानें पुत्रजन्मानिमित्त मोठा उत्सव करून मुलाचें नांव सर्वार्थसिद्ध असें ठेविलें. पुत्र जन्मल्यानंतर सातच दिवसांनीं मायादेवी मरण पावली. पूर्वी जन्म घेतलेल्या बोधिसत्त्वांच्या माताहि सर्व अशाच सात दिवसांनीं मरण पावल्या होत्या; कारण, बोधिसत्त्वाची गर्भाशयांत पूर्ण वाढ झाल्यानें मातेचें हृदय दुभंगून जातें. मायादेवी वारल्यानंतर तिची बहीण वृद्ध गौतमी हिनें राजपुत्राला वाढविलें. हिमवत्पर्वतावर एक असित नांवाचा महर्षि रहात होता. त्यानें अन्तर्ज्ञानानें बोधिसत्त्व जन्मास आल्याचें जाणून, कपिलवस्तु नगरींत जाऊन शुद्धोदन राजाची भेट घेतली. राजानें त्याचा मोठा आदरसत्कार करून त्याला राजपुत्र आणून दाखविला. महर्षीनें त्या राजपुत्रास वंदन करून त्याला जवळ घेतलें; परंतु सर्व शरीरावयवांचें निरीक्षण केल्यावर त्यास वाईट वाटून त्यानें अश्रू गाळण्यास सुरुवात केली. शुद्धोदन राजानें अश्रू गाळण्याचें कारण विचारल्यावरून तो म्हणालाः ''तुझा पुत्र उत्तम लक्षणांनीं संपन्न असून तो मोठा धर्मसंस्थापक होणार आहे. मला वाईट वाटण्याचें कारण एवढेंच कीं, हें बौद्ध रत्न पाहण्यास मी जिवंत राहणार नाहीं, व त्यामुळें मला त्याचा योग्य सत्कार करतां येणार नाहीं ! नंतर असित ॠषीनें राजपुत्राच्या शरीरावरचीं बत्तीस उत्तम लक्षणें व ऐशीं उपलक्षणें राजास समजावून सांगितलीं, व शेवटीं राजाचा निरोप घेऊन तो महर्षि स्वस्थानीं परत गेला.

बुद्धाच्या ईश्वरी अंशाची साक्ष पटविणारे चमत्कार - आठव्या अध्यायाचा सारांश येणेंप्रमाणें आहे : बोधिसत्त्व जन्माला आला त्या दिवशीं क्षत्रिय, ब्राह्मण व शाक्य वंशांतील अनेक कुटुंबांत मिळून वीस हजार मुली जन्मास आल्या होत्या. या सर्व पुढें त्यांनीं बोधिसत्त्वाबरोबर राहून त्याची सेवा करावी म्हणून त्यास अर्पण करण्यांत आल्या. एकदां राजपुत्राला देवालयांत दर्शनास नेण्यांत आलें तेव्हां असा चमत्कार झाला कीं, देवळांतील सर्व देवतांच्या मूर्ती आपलें स्थान सोडून स्वतःच राजपुत्रापुढें येऊन त्याला नमन करत्या झाल्या.

नवव्या अध्यायांत सांगितलें आहे कीं, शाक्य वंशांतील पांचशें लोकांनीं चांगले चांगले दागिने करून आणून राजपुत्राच्या अंगावर घालण्याकरितां दिले. पण ते राजपुत्राच्या अंगावर घालण्यांत आले तेव्हां त्यांचें तेज किंवा चकाकी कांहींच पडेना; राजपुत्राच्या शरीरकांतीपुढें ते सर्व अगदीं फिक्के पडले.

दहाव्या अध्यायाचें तात्पर्य असें कीं, राजपुत्र जरा मोठा झाल्यावर त्याला शिक्षणाकरितां शाळेंत घालण्यांत आलें. त्याच्याबरोबर दुसरीं दहा हजार मुलें होती. शाळेत शिरतांच राजपुत्राचे तेजःपुंज शरीर पाहून तेथील शिक्षक विश्वामित्र यानें आपणच स्वतः त्याला साष्टांग नमस्कार घातला. नंतर बोधिसत्त्वानें विश्वामित्र गुरुजींनां विचारलें : ''तुम्ही मला कोणती लिपि शिकविणार ? ब्राह्मी, खरोष्ठी, पुष्करसारी, अंग, वंग, मागधी; कीं मांगल्य, मनुष्य, शकारी, ब्राह्मवल्ली; द्रविड; कीं देवलिपि, नागलिपि, गंधर्वलिपि, यक्षलिपि, इत्यादि या चौसष्ट लिपीपैकीं मला तुम्ही कोणती शिकविणार ?'' हा अगाध ज्ञान दर्शविणारा प्रश्न ऐकून विश्वामित्र गुरुजी गलितगर्व होऊन व भांबावून जाऊन इतर मुलांनां शिकवूं लागले. बोधिसत्त्वानें आपल्या विद्यार्थी मित्रांनां तेथेच पूर्णज्ञानाचा उपदेश केला.

अकराव्या अध्यायांत भगवान म्हणतातः भिक्षूहो, राजपुत्र मोठा झाल्यावर एकदां आपल्या मित्रांसह एका खेड्यांत गेला असतां तेथें शेतक-यांची शेतांतील कामें पाहून झाल्यावर तो शेजारीं एका बागेत एकटाच जाऊन एका जंबुवृक्षाखाली बसला व विचारांत मग्न झाला. फार वेळ राजपुत्र न दिसल्यामुळें शुद्धोदन राजाने त्याच्या शोधास अनेक लोक पाठविले, तेव्हां त्यांनां तो जंबुवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला आढळून आला.

बु द्धा चा वि वा ह - बाराव्या अध्यायांत पुढें अशी कथा आहेः राजपुत्र मोठा झाल्यावर शुद्धोदन राजानें त्याचा विवाह करण्याचें ठरविलें व त्या संबंधानें शाक्य कुलांतील पांचशें गृहस्थांबरोबर चर्चा केली. जो तो राजपुत्रासाठीं आपल्या मुलीची शिफारस करूं लागला. तेव्हां राजाने त्यांनां राजपुत्राकडे धाडलें व राजपुत्रानें आपणांस बायको कशी पाहिजे तें त्यांनां सांगितलें. अनेक शाक्यकन्या आणून राजपुत्राला दाखविण्यांत आल्या तेव्हां त्यांपैकीं दण्डपाणि नांवाच्या शाक्य इसमाची गोपा नांवाची कन्या राजपुत्रानें पसंत केली. राजानें त्या मुलीला मागणी घातली; पण दण्डपाणीनें उत्तर पाठविलें कीं, मुलगा कोणत्या शास्त्रकलांत प्रवीण आहे तें पाहिल्याशिवाय मुलगी देऊं नये असा आमचा कुलसंप्रदाय आहे. त्याप्रमाणें एके दिवशीं तरवार, धनुष्यबाण, कुस्ती व हत्ती चालविणें या विद्यांतील कौशल्याचे सामने करण्यांत आले असतां त्यांत बुद्धानें अनेक तरुणांवर विजय मिळविलाः इतकेंच नव्हे तर त्यानें सर्वच तत्कालीन विद्यांमध्यें व कलांमध्यें आपलें नैपुण्य दाखविलें. या संबंधांत अशी एक कथा दिली आहे कीं, बुद्धाचा प्रतिस्पर्धी देवदत्त हा सामन्यासाठीं जात असतां समोरून बुद्धाचा हत्ती येत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून देवदत्तानें एका हातानें त्या हत्तीचा सुळा धरून दुस-या हातानें त्याच्या श्रीमुखांत इतक्या जोरानें थप्पड मारली कीं, तो हत्ती ताबडतोब गतप्राण होऊन खाली पडला, मागून सुंदरानंद नांवाचा राजपुत्र आला. त्याला ही हकीकत समजली तेव्हां त्यानें देवदत्तानें हें चांगले केले नाही असे उद्भार काढून हत्तीची शेपूट धरून त्यास रस्त्याच्या बाजूस आणून टाकलें. सुंदरानंदाच्या मागून सिद्धार्थ रथांत बसून आला. त्याला हत्तीसंबंधी सर्व हकीकत कळली. तेव्हां त्यानें सुंदरानंदाची प्रशंसा केली; परंतु एवढा मोठा प्राणी रस्त्याच्या बाजूस सडत पडला तर लोकांस त्रास होईल असें म्हणून त्यानें रथाबाहेर एक पाय काढला व आंगठ्यानें त्या हत्तीचें शेपूट धरून त्यास इतक्या जोराने भिरकाविलें कीं तो हत्ती सात तट व सात खंदक यांच्या पलीकडे दोन मैलांवर जाऊन पडला. बुद्धाच्या शौर्यानें दण्डपाणि संतुष्ट झाला व आपली कन्या गोपा राजपुत्राला अर्पण करण्याचें ठरवून त्यांचा त्यानें मोठ्या थाटानें विवाह लावला. लग्न झाल्यावर गोषा वापरण्याबद्दल वडील स्त्रियांनीं गोपेला उपदेश केला. पण ती कधींहि गोषा घेत नसे. राजपुत्राला इतर चौ-यायशीं हजार कन्या अर्पण केल्या होत्या त्या सर्वांमध्यें गोपा ही राजपुत्राची मुख्य राणी होऊन राहिली.

बु द्धा ला वै रा ग्य प्रा प्त हो ण्या स घ ड ले लीं का र णें-  या अनेक स्त्रियांसहवर्तमान राजपुत्रानें अत्यंत सुखानें कालक्रमणा कशी केली त्याचें वर्णन तेराव्या अध्यायांत आलें आहे. याप्रमाणें काल जातां जातां राजपुत्राची गृहत्याग करण्याची वेळ जवळ आली. एके दिवशीं पहाटेस देवपुत्र र्‍हीदेव दुस-या बत्तीस हजार देवपुत्रांसह राजपुत्राकडे येऊन स्वप्नामध्यें त्यास गृहत्याग करण्याविषयीं सूचना करता झाला.

चवदाव्या अध्यायांत म्हटलें आहेः नंतर लवकरच शुद्धोदन राजाला असें स्वप्न पडलें कीं, राजपुत्र अनेक देवांसह राजवाड्यांतून बाहेर पडून भगवीं वस्त्रें धारण करून संन्याशीं बनला. तेव्हां राजा ताबडतोब घाबरून उठला व त्यानें प्रथम राजपुत्र राजवाड्यांत असल्याची खात्री करून घेतली. नंतर राजपुत्रानें राजवाड्यांतून निघून बागेंत झाडाखालीं बसून विचार करूं नये म्हणून, राजाने तीन राजवाडे उत्तम त-हेनें सजवून तेथील सुखांत आपल्या मुलाचें मन सतत रमविण्याचा प्रयत्न केला. तथापि एके दिवशीं रथांत बसून राजपुत्र बागेंत जाण्यास निघाला. वाटेंत त्याला एक जराग्रस्त इसम दिसला, आणि स्वतःस अशीच जरा प्राप्त होणार हा विचार मनांत येऊन तो फार कष्टी झाला. दुस-या एका प्रसंगीं रथांतून जात असतांना राजपुत्रानें ज्वरादि रोगांनीं ग्रस्त असा इसम पाहिला, व स्वतःलाहि अशीच रोगग्रस्तता येणार हे जाणून तो दुःखी झाला. तिस-या वेळी एका मेलेल्या माणसाचें प्रेत जाळावयाकरितां नेत असलेले त्यानें पाहिलें व स्वतःलाहि एके काळीं असाच मृत्यु येणार हें पाहून या दुःखांतून मुक्ति कशी मिळवावी याचा विचार तो करूं लागला. पुन्हां एके प्रसंगीं एक भिक्षु शांत व आनंदी वृत्तीचा, पूर्ण ब्रह्मचारी व हातांत भिक्षेचा लोटा घेतलेला असा त्यानें पाहिला, व भिक्षावृत्ताचा मार्ग अवलंबिणें हाच मार्ग विद्वज्जनांनां मान्य आहे असा राजपुत्रानें मनाशीं विचार केला. ही सर्व हकीकत शुद्धोदन राजाला समजतांच त्यानें राजपुत्राच्या वाड्याभोंवतीं कडेकोट बंदोबस्त करून मोठा पहारा ठेवला.

रा ज पु त्रा चा गृ ह त्या ग - पंधराव्या अध्यायांत राजपुत्राच्या गृहत्यागाची हकीकत आहे. वर सांगितल्याप्रमाणें जगांतील मानवी दुःखें पाहून राजपुत्राचें मन उद्विग्न झालें व त्यानें संसार सोडून भिक्षु होण्याचा निश्चय केला. व त्यानें पित्याकडे जाऊन त्याची या गोष्टीस परवानगी मिळविली. परंतु इतर शाक्य स्त्रीपुरुषांनीं राजपुत्र वाड्यांतून जाऊं नये म्हणून राजाच्या परवानगीनें आटोकाट बंदोबस्त व प्रयत्न केला. पण राजपुत्राच्या गृहत्यागाचा दिवस येतांच अनेक देव, देवपुत्र, नाग, यक्ष, वगैरेंनीं त्याच्या जाण्याची तयारी करून राजपुत्राला त्याच्या वाड्यांतील राजस्त्रियांच्या नाशवंत देहासंबंधाचा किळसवाणा व वैराग्यजनक देखावा दाखविला. तेव्हां राजपुत्र निश्चयपूर्वक गृहत्याग करून नगराबाहेर पडला. तो गेल्याचें समजतांच राजवाड्यांत व नगरांत सर्व माणसें अत्यंत दुःख करूं लागलीं.

वै शा ली न ग रा प्र त ग म न -  सोळाव्या अध्यायांत हकीकत दिली आहे ती अशीः याप्रमाणें बोधिसत्त्व निघून गेल्यामुळें राजा शुद्धोदन, शाक्य कन्या गोपा व सर्व अन्तः-पुर शोकानें व्याप्त झालें. इकडे बोधिसत्त्व आपलीं वस्त्रें एका लुब्धकरूपी देवपुत्राला देऊन व त्याचीं आपण धारण करून पुढें चालूं लागला. प्रथम तो एका शाक्य ब्राह्मणीच्या आश्रमास गेला. तिनें अन्नवस्त्र देऊन त्याचा चांगला सत्कार केला. तेथून तो पद्मा नांवाच्या ब्राह्मणीच्या आश्रमीं गेला. तिनेंहि त्याचा अन्नवस्त्रानें सत्कार केला. नंतर तो रैवत महर्षीकडे गेला. तेथेंहि त्याचा वरीलप्रमाणेंच सत्कार झाला. पुढें त्रिमदंडिकपुत्र नांवाच्या राजानें केलेल्या सत्काराचा स्वीकार करून तो हळूहळू वैशाली नगरीकडे गेला. तेथें आराड कालाम नांवाच्या एक साधु तीनशें शिष्यांसह रहात होता. त्याजवळ बोधिसत्त्व जाऊन म्हणाला कीं, मी ब्रह्मचर्य आचरण करतों तेव्हां त्यानें सांगितलें कीं, तूं ब्रह्मचर्य आचरण कर व अशा धर्मानें वाग कीं, तुला थोड्याच तपानें धर्मज्ञान मिळेल. बोधिसत्त्वानें विचार केला कीं, आपणाला छंद, वीर्य, स्मृति समाधि, प्रज्ञा हीं सर्व आहेत. तेव्हां आपण धर्माच्या प्राप्‍तीकरितां व साक्षात्काराकरितां प्रयत्न करावा असा विचार करून त्याप्रमाणें त्यानें प्रयत्न केला; व नंतर आराड कालाम यास जाऊन विचारिलें कीं, तूं देखील याचप्रमाणें धर्मप्राप्ति करून घेतलीस काय ? यावर त्या साधूनें होय असें उत्तर दिलें. तेव्हां बोधिसत्त्व त्यास म्हणाला कीं, मीहि धर्मप्राप्ति करून घेतली आहे. यावर तो साधु म्हणाला कीं, हे गौतम जो धर्म मला ठाऊक आहे तो तुलाहि ठाऊक आहे, व जो तुला ठाऊक आहे तो मलाहि ठाऊक आहे; तेव्हां आपण दोघेहि या शिष्यगणांस शिकवूं. याप्रमाणें आराड कालाम यानें गौतमाची पूजा करून गौतमाला आपल्या बरोबरीचें स्थान दिलें. नंतर गौतमाला असें वाटूं लागलें कीं, हा आराडाचा धर्म मोक्षदायक नाहीं, तेव्हां आपण दुःखनाशाकरितां कोणत्या धर्माचा शोध करावा ? याप्रमाणें विचार करून गौतम वैशाली नगरीचा त्याग करून मगध देशाप्रत गेला, व तेथें राजगृह नगराजवळ जो पांडव नांवाचा पर्वत आहे त्याच्या बाजूस जाऊन राहिला.

रा ज गृ हीं ग म न व बिं बि सा रा ची गां ठ - नंतर गौतमानें भिक्षा मागण्याकरितां राजगृह नगरांत प्रवेश केला. गौतम हळू हळू राजवाड्याजवळ जाऊं लागला असतां, राजगृहांतील लोक त्याला पाहून हा कोण ब्रह्मा किंवा इंद्र किंवा वैश्रवण आला आहे असें म्हणून आश्चर्यचकित दृष्टीनें त्याच्याकडे पाहूं लागले. राजगृहाचा राजा बिंबिसार यानें त्याला पाहिल्यावर तो सपरिवार त्याची भेट घेण्याकरितां पांडवशैलाजवळ गेला, व त्यानें त्यास राजगृहांत राहण्याचा आग्रह केला. त्याचें वर्णन असें आहे:-

परम प्रमुदितोस्मि दर्शनात्ते
अवचिवु स मागधराज बोधिसत्त्वं ।
भव हि मम सहायु सर्व्वराज्यं
अह तव दास्ये प्रभूतं भुङक्ष्व कामान् ॥
माच पुनर्वने बसाहि शून्ये
माभूपु तृणेपु वसाहि भूमिवासं ।
परम सुकुमारु तुभ्य कायः
इह मम राज्यि वसहि भुंडक्ष्व कामान ॥

परंतु बोधिसत्त्वानें
न च अहं कामगुणेभिरर्थिकोस्मि ॥
कामं विपसमा अनन्त दोषा
नरके प्रपातन प्रेततिर्य्यग्योनौ ।

इत्यादि शब्दांत राजाला उत्तर दिलें, व राजा आपल्या नगरांत परत गेला.

ग ये स त पा च र ण - सतराव्या अध्यायाचा सारांश येणेंप्रमाणें आहेः राजगृह नगरांत रामपुत्र रुद्रक नांवाचा एक साधु सातशें शिष्यगणासह रहात होता. त्याला पाहून बोधिसत्त्वास असें वाटलें कीं, हा माझ्यापेक्षां अधिक ज्ञानवान् नाहीं त्या अर्थीं आपण याचें शिष्यत्व पतकरून त्यास समजाधीची असारता दाखवून द्यावी. याप्रमाणें विचार करून बोधिसत्त्व रुद्रकाजवळ जाऊन म्हणाला, 'तुला हा धर्म कोणीं शिकविला ? त्यानें उत्तर केलें कीं, मीच तो शिकलों, मला तो कोणींहि शिकविला नाहीं.' यावर बोधिसत्त्वानें त्यास समाधीचा मार्ग शिकविण्याविषयीं विनंती केली, व तो साधूहि बरें असें म्हणाला. नंतर बोधिसत्त्व एकांतांत गेला असतां त्याच्या पुण्य, ज्ञान, पूर्व सुचरित वगैरेंच्या प्रभावामुळें त्यास सर्व समाधीचें ज्ञान झालें. तेव्हां तो रुद्रकाजवळ येऊन म्हणाला, 'संज्ञानासंज्ञानसमापत्तीचा आणखी एखादा मार्ग आहे कीं काय ?' रुद्रक म्हणाला 'नाहीं.'  हें ऐकून बोधिसत्त्व समजला कीं, या रुद्रकाजवळ श्रद्धा, वीर्य, समाधि, प्रज्ञा इत्यादि कांहीं एक नसून आपल्याजवळ तें सर्व आहे. तुझा धर्म मला ज्ञात झाला आहे असें जेव्हां त्यानें रुद्रकास सांगितलें तेव्हां रुद्रक लागलीच म्हणाला, तर चला, मग आपण दोघेहि ह्या शिष्यगणास शिकवूं. यावर बोधिसत्त्व उत्तरला. 'पण या मार्गानें निर्वाणप्राप्ति होणार नाहीं, हा मार्गा निरुपयोगी आहे.' असें म्हणून बोधिसत्त्व तेथून निघून गेला. तेव्हां रुद्रकाच्या पांच भद्रवर्गीय शिष्यांनीं आपण येथें रात्रंदिवस प्रयत्न करून आपणांस जें प्राप्त होत नाहीं तें या श्रमणानें इतक्या लवकर प्राप्त करून घेतलें त्या अर्थीं हा मोठा उपदेशक होईल असा विचार करून ते रुद्रकास सोडून बोधिसत्त्वाकडे गेले. पुढें बोधिसत्त्व राजगृह सोडून त्या पांच शिष्यांसह मगध देशांत प्रचार करण्याकरितां गेला, व फिरत फिरत गयेस येऊन पोहोंचला. तेथें अनेक श्रमण व ब्राह्मण निरनिराळ्या रीतीनें तप करीत असलेले पाहून स्वतः बोधिसत्त्वानेंहि सहा वर्षे अतिशय घोर असे तपाचरण केलें. या तपानें त्याचें शरीर अतिशय कृश झालें. त्याच्या बरगड्या कर्कटकाप्रमाणें झाल्या, व त्याच्या पाठीचा कणा वेणीप्रमाणें दिसूं लागला. तो कांहीं दिवस एक तांदूळ खाऊन व नंतर कांहीं दिवस एकच तिळ खाऊन राहिला, आणि नंतर त्यानें कांहीं दिवस निराहार वृत्ति ठेविली यामुळें तो अतिशयच कृश झाला. तो इतका कीं, कानावाटे आंत गेलेलें तृणबीज नाकांतून बाहेर पडत असे व नाकावाटें गेलेलें कानांतून बाहेर पडत असे. याप्रमाणें त्यानें अत्यंत कडक तपाचरण केलें.

मा रा चा मो ह पा ड ण्या चा प्र य त्न व बो धि स त्त्वा चा प्र थ म श री र ब ल प्रा प्त क र ण्या चा नि श्च य - यानंतर अठरावा अध्याय सुरू होतो. त्यांत म्हटलें आहे कीं, याप्रमाणें बोधिसत्त्व सहा वर्षें दुष्कर तपश्चर्या करीत असतां पापी मार एकासारखा त्याच्या पाठीस लागला होता, व त्याच्या शरीरांत प्रवेश करण्याची संधि पहात होता. परंतु त्याला अवसर न मिळाल्यामुळें तो बोधिसत्त्वास येऊन म्हणतोः 'हे शाक्यपुत्र तूं शरीरास कष्ट देऊन काय करतोस ? तूं जर जिवंत राहिलास तर धर्माचरण करून तुला श्रेयप्राप्ति होईल, व दानदिकांमुळें तुला पुण्यप्राप्ति होईल' तेव्हां बोधिसत्त्वानें त्यास उत्तर केलें: 'पुण्यप्राप्ति हेंच ज्यांचें ध्येय असेल त्यांस तूं या गोष्टी सांग. मी मरण्याला भीत नाहीं; कारण आयुष्याच्या अंतीं मरण हें आहेच. मी ब्रह्मचर्यामुळें या जगांत पुन्हां येणार नाहीं, व मी तुझ्या काम, रति, क्षुत्पिपासा इत्यादि सैनिकांवर जय मिळविणार आहे.' हें भाषण ऐकून मार अंतर्धान पावला. यानंतर बोधिसत्त्वाच्या मनांत असा विचार आलाः 'हा मार्ग बोधिप्राप्‍तीचा किंवा जातिजरामरण यांचा नाश करण्याचा नव्हे, तर आपण पित्याच्या उद्यानामध्यें जंबुवृक्षाखालीं ध्यानस्थ बसलों होतों तो मार्गच बोधिप्राप्ति व जातिजरामरणदुःख यांचा नाश करणारा आहे. तर आपण आतां त्याच मार्गाचें अवलंबन करावें. परंतु त्या मार्गाचा अवलंब करणें शरीराच्या दुर्बल स्थितींत शक्य नसल्यामुळें, प्रथम आहार मिळवून व शरीरबल स्थापन करून नंतर बोधिमंडाकडे जावें.' अशा रीतीनें, बोधिसत्त्वानें सहा वर्षें तपाचरण केल्यावर आसनावरून उठून आहार मिळविण्याकरितां गमन केलें. तेव्हां त्याबरोबर जे पांच शिष्य आले होते, ते बोधिसत्त्व तपाचरण सोडून आहार मिळविण्याकरितां गेलेला पाहून त्याला सोडून वाराणसीप्रत गेले. बोधिसत्त्व जात असतां दहा कुमारी त्याच्या दर्शनाकरितां व पूजेकरितां आल्या. त्यांची पूजा व सत्कार यांचा स्वीकार करून व गोचर ग्रामामध्यें भिक्षा मागून बोधिसत्त्व वर्ण, रूप व बल यांनीं युक्त असा झाला. तेव्हांपासून बोधिसत्त्वाला लोक सुंदर श्रमण असें म्हणूं लागले.

बो धि स त्त्वा च्या नि रि च्छ ते चें उ दा ह र ण - याच ग्रामीं सुजाता नांवाची ग्रामिकाची मुलगी बोधिसत्त्व तपाचरण करीत असतांना त्याच्या तपःसिद्धयर्थ व शरीरस्वास्थ्याकरितां दररोज आठशें ब्राह्मणांनां भोजन घालीत असे. तिची अशी इच्छा होती कीं, बोधिसत्त्वानें आपलें भोजन ग्रहण करून नंतर आपणास उपदेश करावा. इकडे बोधिसत्त्व सहा वर्षें तप करीत राहिल्यामुळें त्याची वस्त्रें जीर्ण झालीं होती. तो चांगल्या वस्त्राच्या शोधांत असतां त्याच वेळीं सुजातेची एक दासी मरण पावून तिचें प्रेत वस्त्र गुंडाळून श्मशानांत ठेविलेलें होतें. बोधिसत्त्वानें या प्रेताचें वस्त्र डाव्या पायानें ओढून उजव्या हातानें घेतलें आणि पुष्करणीवर तें धुवून शिवून धारण केलें. नंतर त्याच्या अविमलप्रभ नांवाच्या देवपुत्रानें काषाय वस्त्रें दिलीं. तीं धारण करून बोधिसत्त्व गोचार ग्रामाकडे निघाला. तेथें सुजातेनें त्याला सुवर्णपात्रांत भोजन दिलें. पण बोधिसत्त्वानें अन्न ग्रहण करून सुवर्णपात्र निरंजना नदींत टाकून दिलें. हें पात्र पुरंदरानें पूजेकरितां नेलें. नंतर बोधिसत्त्व बोधिद्रुमाकडे चालता झाला.

बो धि द्रु मा क डे प्र या ण.- १९ व्या अध्यायांत सांगितलें आहे कीं, याप्रमाणें बोधिसत्त्व निरंजना नदींत स्नान करून व शरीरबल संपादन करून बोधिद्रुमाकडे जात असतां त्याच्या मार्गावर रत्नखचित ध्वजपताकांनीं अलंकृत असे तालवृक्ष इत्यादि निर्माण झाले व अप्सरादिकांनीं त्याचा मार्ग सुगंधयुक्त जलांनीं सिंचित केला. वाटेंत कालिक नागराजाची पट्टराणी वगैरेंकडून त्याचा सत्कार करण्यांत आला.

यापुढील २० व्या अध्यायाचें तात्पर्य येणें प्रमाणें आहे:- याप्रमाणें बोधिसत्त्व बोधिमंडाप्रत जाऊन तेथें आसनस्थ झाल्यावर त्यानें बोधिसत्त्व संचोदनी नांवाचे किरण आपल्या सर्व बाजूंनां टाकल्यामुळें सर्व दिशा प्रकाशित झाल्या. तेव्हां निरनिराळ्या दिशांचे बोधिसत्त्व तेथें येऊन त्यांनीं बोधिमंडाखालीं बसलेल्या बोधिसत्त्वाची पूजा करून स्तुति केली, व नंतर ते आपआपल्या ठिकाणीं परत गेले.

मा रा चा प रा भ व.- पुढें २१ व्या अध्यायांत असें म्हटलें आहे:- नंतर बोधिसत्त्वानें आपल्या भ्रूविवरांतरापासून भार-मंडल-विध्वंस-कारी नांवाचे किरण टाकिले. त्यामुळें मारास धाक उत्पन्न होऊन त्याला निरनिराळ्या ३२ अशुभ देखाव्यांनीं युक्त असें एक स्वप्न पडलें. तेव्हां मार भयभीत होऊन त्यानें आपल्या सेनेला बोलावून आणिलें. यानंतर त्याच्या सेनेचें कुतूहलोत्पादक वर्णन आहे. माराचे सहस्त्र पुत्र होते, त्यांत सार्थवाह इत्यादि कांहीं बोधिसत्त्वास अनुकूल होते, व इतर मारपक्षाचे होते. त्यांच्यामध्यें बोधिसत्त्वाच्या बलाविषयीं अनुकूल प्रतिकूल संभाषण झालें. नंतर मार बोधिसत्त्व यांत युद्ध व संभाषण होऊन माराचा पराभव झाला व मार अंतर्धान पावला. मग मारानें आपल्या मुलींनां बोलावून बोधिसत्त्वास जिंकण्यास पाठविलें. तेवहां मारकन्यका व बोधिसत्त्व यांमध्यें पुढील त-हेचें संभाषण झालें.

मारदुहिता म्हणतेः
प्रेक्ष हि तावच्चंद्रवदना वदनावलिनिभा
वाच मनोज्ञ श्लक्ष्ण दशना हिमरजतनिभाः ।
ईदृश दुर्लभाः सुरपुरे कुत मनुजपुरे
ते त्वया लब्ध ये सुरवरैरभिलषित सदा ॥
बोधिसत्त्व उत्तर करितोः
पश्यामि कायममेध्य मशुचिं कृमिकुल भरितं
जर्जर मिन्धनञ्च भिदुरमसुखपरिगतम्
यत्सचराचरस्य जगतः परमसुखकरं
तत्पदमच्युतं प्रतिलभे बुधजनमहितम् ॥
इत्यादि.

याप्रमाणें मारदुहितांनीं अनेक प्रकारचें भाषण केलें; परंतु बोधिसत्त्व त्यांस वश झाला नाहीं. तेव्हां त्यांनीं त्याप्रमाणें जाऊन पित्यास सांगितलें. त्या वेळीं श्रीवृद्धि, तपा, श्रेयसी इत्यादि आठ बोधिवृक्षदेवता होत्या. त्यांनीं बोधिसत्त्वाची पूजा करून तूं लवकरच दशबल होशील असा त्यास आशीर्वाद दिला; व त्याची षोडशाकारानें श्री वाढविली. इतके शुद्धावासकायिका नांवाच्या देवपुत्रांनीं षोडशाकारांनीं मारास दुर्बल केलें व त्याचें विच्छेदन केलें.

बो धि प्रा प्ति.- २२ व्या अध्यायाचा सारांश असा : याप्रमाणें बोधिसत्त्व मारावर विजय मिळवून प्रथम पहिल्या व नंतर दुस-या, तिस-या व चौथ्या याप्रमाणें ध्यानांत निमग्न झाला. अशा रीतीनें शुद्धचित्त झालेला बोधिसत्त्व विचार करूं लागला कीं, हीं जरामरणादि कशापासून उत्पन्न होतात ? हीं जातीपासून उत्पन्न होतात. जाती कशापासून उत्पन्न होते ? जाति भवापासून उत्पन्न होते. भव कशापासून उत्पन्न होतो ? भव उपादानापासून होतो. उपादान तृष्णेपासून उत्पन्न होतें. याप्रमाणें अविद्येपासून हीं सर्व उत्पन्न होतात असा त्यानें विचार केला. याप्रमाणें एक आठवडाभर बोधिसत्व बोधिमंडाच्या ठिकाणीं बसून राहिला. तेव्हां त्याला बोधिप्राप्ति झाली व मीं जातिजरामरणदुःखाचा अंत केला असें तो म्हणाला.

२३ व्या अध्यायांत सांगितलें आहे कीं, याप्रमाणें बोधिसत्त्व बोधिमंडाच्या ठिकाणी बसला असतां अनेक देवपुत्र, देव, इंद्र, महाराज, भौम व अंतरिक्ष देव इत्यादिकांनीं त्याची स्तुति केली.

याप्रमाणें देवांकडून स्तविलेला बोधिसत्त्व आसनस्थ होऊन बोधिवृक्षाकडे पहात एक आठवडाभर राहिला. सात दिवसांनंतर कामावचर नांवाच्या देवपुत्रांनीं त्याला सुगंधयुक्त उदकानें स्नान घातलें. नंतर समंतकुसुम नांवाचा देवपुत्र येऊन त्यानें बुद्धास विचारिलें कीं, हे भगवन् ज्या समाधीच्या योगानें तूं सात दिवस एकाच आसनावर राहूं शकलास त्या समाधीचें नांव काय ? बुद्धानें उत्तर केलें, हिला प्रीत्याहारव्यूह नामक समाधि म्हणतात. तेव्हां देवपुत्रानें त्याची स्तुति केली. दुस-या आठवड्यांत बोधिसत्त्वानें दीर्घचक्रांत भ्रमण केलें. तिस-या आठवड्यांत तो बोधिवृक्षाकडे अनिमिष नेत्रांनीं पहात राहिला. चौथ्या आठवड्यांत त्यानें सूक्ष्म चक्रामध्यें पूर्वसमुद्रापासून पश्चिमसमुद्रापर्यंत भ्रमण केलें. नंतर पापी मार बुद्धाकडे येऊन म्हणाला कीं, हे भगवन् आतां तूं निर्वाणांप्रत जा. तुझी निर्वाणाची वेळ झाली आहे. तेव्हां बुद्धानें उत्तर दिलें, मी प्रथम स्थविर भिक्षु, बहुश्रुत, विनीत, विशारद असे निर्माण करून त्यांच्याकडून धर्मप्रसार करीन व त्यानंतर निर्वाणास जाईन. तेव्हां मार दुःखित होऊन निघून गेला. तेव्हां त्याच्या रति, अरति व तृष्णा या तीन मुली बुद्धास मोह पाडण्याकरितां आल्या; परंतु बुद्धानें त्यांजकडे पाहिलें नाहीं. तेव्हां त्या तशाच जराजर्जर होईपर्यंत उभ्या राहिल्या. नंतर त्यांनीं बुद्धाची क्षमा मागितली. पांचव्या आठवड्यांत तथागत मुचिलिंद नागराजाच्या भवनांत राहिला. त्यानें पर्जन्य आला तेव्हां त्यावर फणांचें आच्छादन केलें. याप्रमाणें सर्व दिशांच्या नागांनीं त्यावर आपल्या फणांचें आच्छादन केलें. व पर्जन्य थांबल्यावर नमस्कार करून ते आपआपल्या घरीं गेले. सहाव्या आठवड्यांत तथागत मुचिलिंद नागराजाच्या घरून निघून न्यग्रोध वृक्षाखालीं येऊन बसला. तेव्हां निर्ग्रंथ, परिव्राजक श्रावक वगैरेंनां यानें पावसाचा आठवडा सुखानें घालविल्याबद्दल आश्चर्य वाटलें. सातव्या आठवड्यांत तथागत तारायण वृक्षाच्या मुळाशीं बसला. त्या वेळीं त्रपुष्प व भल्लिक या नांवाचे दोन वणिगबंधू माल घेऊन जात होते. त्यांच्या गाडीची चाकें जमीनींत आंसापर्यंत गेलीं. तेव्हां त्यांनीं बोधिसत्त्वाची स्तुति केली. व बोधिसत्त्वाला रत्नपात्रामध्यें भोजन दिलें. तेव्हां बोधिसत्त्वानें त्यांस स्वस्तिकारक आशीर्वाद दिला. त्याचें वर्णन सुमारें ५० पद्यांत केलें आहे.

ध र्म च क्र प्र व र्त न - २५ व्या अध्यायांतील कथाः नंतर बोधिसत्त्वानें असें मनांत आणिलें कीं, मी धर्म जाणला. तर मी आतां धर्मचक्राचें प्रवर्तन करितों. असें म्हणून त्यानें ऊर्णाकोशापासून प्रभाविसर्जन केलें. त्या प्रभेमुळें सर्व वस्तू सुवर्णासारख्या दिसूं लागल्या. बोधिसत्त्वाच्या मनांतील धर्मप्रवर्तनाचा आशय ब्रह्म्यास कळून त्यानें देवपुत्रांनां बोलावून आणून आपण तथागतास धर्मचक्रप्रवर्तन करण्याविषयीं विनंती करूं असें म्हटलें व अनेक शतसहस्त्र ब्राह्मण घेऊन तो तथागताकडे आला, व त्यानें त्याची स्तुति केली. नंतर देवांचा इंद्र शक्र अनेक देवांसह येऊन बुद्धास धर्मचक्रप्रवर्तनाविषयीं विनंति करूं लागला. नंतर बुद्धानें धर्मचक्र प्रवर्तनाचा निश्चय केला. तेव्हां पृथ्वीवरील व आकाशांतील देवांनीं व ब्रह्मकायिक देवांनीं मोठा घोष केला.

उ प दे श.- २६ व्या अध्यायांतील कथासूत्र येणेंप्रमाणें आहे : नंतर बुद्धानें विचार केला कीं, आपण जो मनुष्य आपल्या धर्माची हेटाळणी करणार नाहीं त्यास प्रथम उपदेश करावा. म्हणून त्यानें रुद्रक रामपुत्र व अंडकालाम यांचेबद्दल तपास केला. तेव्हां ते मृत झाले असें त्यास समजलें; व पांच भद्रवर्गीय शिष्य वाराणसीस आहेत असें कळलें. तेव्हां तो वाराणसीस जाण्यास निघाला. वाटेंत त्याचा व आजीवकाचा संवाद झाला. त्यांत त्यानें आजीवकास देवासुरगंधर्वांमध्यें माझ्याबरोबरीचा कोणी नाहीं मी जिनांच बरोबरीचा आहे असें सांगितलें. वाराणसीस गेल्यावर नावेकरितां देण्यास पैसा नसल्यामुळें तो आकाशांतून परतीरास गेला. ही गोष्ट राजा बिंबसार यास कळल्यावर त्यानें सर्व प्रव्रजितांस नावेचें भाडें माफ केलें. नंतर तथागत वाराणसीमध्यें भिक्षा मागण्याकरितां गेला असतां त्याला दुरून येत असतांना पांच भद्रवर्गीयांनीं पाहिला. तेव्हां त्यांनीं विचार केला कीं, यानें पूर्वीचें तपाचरण सोडून दिलें असावें असें दिसतें. त्या अर्थी आपण यास उत्थापन देऊं नये व त्याचा आदरसत्कारहि करूं नये. परंतु जसजसा बुद्ध जवळ येऊं लागला, तसतसें त्यांस आसनावर बसणें अशक्य होऊं लागून ते आपोआप उठून उभे राहून त्याचा सत्कार करूं लागले. नंतर बुद्धानें आसनावर बसून आपल्या शरीरापासून प्रभा विसर्जन केली तीमुळें सर्वत्र प्रकाश पडला. नंतर त्यानें रात्रीच्या पहिल्या प्रहरांत शांत बसून दुस-या प्रहरामध्यें कांहीं कथा सांगून तिस-या प्रहरामध्यें भद्रवर्गीयांस उपदेश केला. नंतर मैत्रेय बोधिसत्त्व तेथें येऊन त्यानें बोधिसत्त्वास धर्मचक्र कसें प्रवर्तन केलें असें विचारिलें. तेव्हां बोधिसत्त्वानें गभीर, दुर्दमन, दुरनुबोध, दुर्विज्ञेय इत्यादि चक्रे व तथागत, सम्यगसंबुद्ध, स्वयंभू इत्यादि कोणास म्हणावें हें सांगितलें. शेवटीं २७ व्या आध्यायांत ग्रंथश्रवणमाहात्म्य वर्णन केलें आहे.