प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

मॅक्समुल्लरचें मत आणि महावंसोच्या व पेगूच्या लेखांवरून निर्वाणकालनिश्चय -  प्रो. मॅक्समुल्लर यांनीं बुद्धाचा निर्वाणकाल ख्रि. पू. ४७७ अथवा ४७८ असावा असें अनुमान काढलें आहे (संस्कृत वाङ्‌मयाचा इतिहास पृ. २६२-३००).

महावंसोंत म्हटलें आहे कीं, अशोकाच्या कारकीर्दीच्या १७ व्या वर्षी पाटलिपुत्र येथें बुद्धसभा भरली व तिच्या नंतर २ 'भिक्षू 'सोवनभूमीं' त पाठविण्यांत आले.

पेगूच्या इ.स. १४७६ च्या कल्याणी लेखांत वरील गोष्टीचा उल्लेख आहे, व असें म्हटलें आहे कीं, अशा रीतीनें बुद्धाच्या निर्वाणानंतर २२६ वर्षांनीं 'रामञ्ज' देशांत बुद्धसंप्रदाय सुरू झाला.

अशोकाचा राज्यारोहणकाल बहुमतानें ख्रि. पू. २६० समजला जातो. यानंतर १८ वर्षांनीं म्हणजे ख्रि. पू. २४२ सालीं पाटलिपुत्राची सभा झाली. याच्या पूर्वीं २३६ वर्षे बुद्धाचा निर्वाणकाल आहे, तेव्हां ख्रि. पू. ४७८ हा बुद्धाचा निर्वाणकाल या दोन लेखांवरून सिद्ध होतो (बर्जेस - इं. अँ. पु. ३० पृ. ११७).