प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

शाक्यांची नीतिमत्ता. - शाक्यांत (लिच्छवींस अनुलक्षून हें लिहिलेलें आहे) स्त्रियांच्या नीतीसंबंधीं विशेषसा निग्रह नव्हता, असें कित्येक जातकांवरून व खुद्द गौतमचरित्रावरून दिसतें. कठ्ठहारी जातकांत महानाम शाक्याची कन्या वासभखत्तिया ही कोसलाधिपाजवळ होती. सिगाल जातकावरून एका शाक्य कन्येवर कोसलाधिपाच्या राजगृहांतील एक नापिक आषक झाला होता. स्वतः गौतमाचें मत स्त्रियांसंबंधीं अत्यंत नीच होतें-इतकें कीं, मिलिंदप्रश्नांत शेवटीं 'अमरा' नांवाच्या स्त्रीच्या नियमाबद्दलहि नागसेनास शंका प्रगट करावी लागली. याहूनहि त्या वेळच्या नीतीचें उठावदार चित्र स्पेन्स हार्डीनें दिलें आहे. वैसालीची (शाक्यांचें स्थान) अम्रपल्ली नांवाची वेश्या अत्यंत सुंदर होती; व तिच्यामुळे वैसाली नगरीस अनेक फायदे होते. हे पाहून बिंबसारानेंहि राजगृहीं सर्व सुंदर स्त्रिया एकत्र करून त्यांतील अत्यंत सुंदर शालिवति नामक राजकन्या निवडून तिला वेश्यापण दिलें; व सर्व शहरानें कांहीं द्रव्य देऊन तिची योग्य प्रकारे स्थापना केली. हिच्याच पोटीं 'जीवक' नांवाचा प्रसिद्ध वैद्य जन्मला.

या प्रकारची त्या वेळीं शाक्यांची- म्हणजे गौतम ज्या कुलांतील त्यांची - नीति असल्यानें 'कोळी व कैकाडी' यांचीहि नीति त्याच दर्जाची असल्यास त्यांत नवल नाहीं; व कमीपणाहि नाहीं. हे कीकट व कोळी आपला चरितार्थ रोहिणी नदीच्या पाण्यावर होणा-या शेतीवर करीत असत; तसेच भद्दसाल जातकावरून गौतमाच्या हयातींतच प्रसेनजित् याचा पुत्र जो विदूदभ, त्यानें व ऐतिहासिक माहितीवरून अजातशत्रु यानें या सर्व शाक्यांचा जो निःपात केला, त्यावरून हे शाक्य आर्यावर्ताबाहेरून केवळ उदरभरणार्थच आले असावे असें दिसतें, मुलुखगिरीवर आलेले दिसत नाहींत. अशा कुळांत गौतमाचा जन्म झाला होता. यावरून 'दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ।'  ही कर्णोक्ति गौतमानेंहि उच्चारण्यासारखी होती असें चांदोरकर म्हणतात.

या कुलकथेवरून गौतमचरित्राचें रहस्य तर कळतेंच, परंतु त्याच्या धर्ममतावरहि उजेड पडतो; तसेंच त्याच्या चरित्रांत ज्या कित्येक गोष्टी दैवी चमत्कार किंवा परमेश्वरी स्फूर्ति म्हणून गायिल्या आहेत त्यांचा नेहमीं घडणा-या गोष्टींप्रमाणे उलगडाहि लागतो.