प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
सिंहलद्वीपांतील बौद्ध संप्रदाय.- सिंहलद्वीपांत बौद्ध संप्रदायाचा प्रसार अशोक राजानें केला अशी आख्यायिका आहे. हें मागें सांगितलेंच आहे. तिस्स हा सिंहलद्वीपचा पहिला बौद्धसंप्रदायी राजा असून ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या मध्याच्या सुमारास बौद्ध संप्रदाय हा सिंहलद्वीपांतील मुख्य संप्रदाय बनला.
सिंहलद्वीपांत हीनयान बौद्धपंथ प्रचलित आहे. येथील बौद्ध भिक्षूंची संख्या १८९१ च्या खानेसुमारीच्या वेळी ९,५९८ होती, १९०१ मध्यें ती ७,३३१ झाली व १९११ मध्यें तर ती सात हजारांहूनहि कमी झाली. वाङ्मय जपून ठेवणें हें बौद्ध भिक्षूंचें एक मोठे काम होतें. इसवी सनाच्या आरंभापर्यंत सामान्यतः महत्त्वाचें वाङ्मय तोंडपाठ करून तें पुढें कायम टिकविण्यासाठीं हुषार शिष्यांनां तोंडींच शिकविण्याची वहिवाट होतीसें दिसतें. अध्ययन व अध्यापन हीं भिक्षूंचीं मध्य कामें आहेत. भिक्षू लोक एके ठिकाणीं न राहतां अध्यापनासाठीं गांवोगांवीं हिंडत असतात. फक्त पावसाळ्यांत मात्र ते सर्व एके ठिकाणीं रहातात; व त्या वेळीं त्यांच्या धर्मसभा भरून त्यांत ते धर्मप्रवचनें करतात. या प्रवचनांसाठीं विहारांमध्यें मोठमोठे दिवाणखाने केलेले असतात.
सिंहलद्वीपांतील बौद्ध संप्रदायांत वैशिष्ट्य किंवा नाविन्य कांहींएक आढळत नाहीं. येथें सुशिक्षित लोकांचें लक्ष बौद्धसंप्रदायाकडे राहिल्यामुळें बरेच ग्रंथ तयार झाले आहेत. परंतु अनेक कर्तृत्ववान् लोकांनीं ब्रह्मचर्य पाळल्यामुळें येथील बौद्ध लोकांची संख्या मात्र बरीच कमी झाली आहे. तथापि जातिभेदाची कमी तीव्रता स्त्रियांनां अधिक असलेलें स्वातंत्र्य, भक्ष्याभक्ष्यविषयक मोकळीक व अधिक शिक्षण या बाबतींत हिंदुस्थानापेक्षां या देशाची लोकस्थिति अधिक समाधानकारक आहे.