प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
बादशाही अंमलाचें दुसरें शतक (इ. स. ९६-१८०) - डोमिशिअननंतर झालेल्या ओळीनें पांचहि बादशहांनीं राज्यकारभार चांगल्या प्रकारें केला. म्हणून हें दुसरें शतक पांच चांगल्या बादशहांचें शतक या नांवानें प्रसिद्ध आहे. यांच्यापैकीं पहिला बादशहा नर्व्हा हा इ. स. ९६ मध्यें राज्यावर आला. त्यानें फार सौम्यपणाचें धोरण स्वीकारलें होतें. पण त्याची कारकीर्द दोनच वर्षांनीं संपून ट्राजनची कारकीर्द (इ. स. ९८-११७) सुरू झाली. त्याच्या कारकीर्दींत १०१-१०२ मध्यें डेशिअन लोकांनीं युद्ध सुरू केलें; परंतु अखेर ट्राजननें त्यांचा पराभव करून त्यांचा देश आपल्या साम्राज्यास जोडला. ११४ पासून ११६ पर्यंत ट्राजननें पार्थिअन लोकांबरोबर युद्ध करून जय मिळवले. आणि आर्मीनिया, मेसापोटेमिया व असुरिया हे देश रोमन साम्राज्यांत सामील केले. या लढाईवरून परत आल्यावर हा बादशहा लवकरच मरण पावला. याच्या कारकीर्दींत लोकोपयोगी कामेंहि बरींच करण्यांत आलीं. यानंतर हेड्रिअन (इ. स. १७-३८) बादशहा झाला. यानें ट्राजननें नुकतेच जिंकलेले प्रांत सोडून दिले. याच्या कारकीर्दींत सार्मेशिअन लोकांबरोबर बरींच वर्षें युद्ध चालू होतें. १२०-१२७ या सालांत हेड्रिअननें साम्राज्याच्या सर्व प्रांतांनां भेट दिली. १२१ सालीं ब्रिटनमध्यें या राजाच्या नांवाची एक भिंत बांधण्यांत आली. १३२ सालीं प्रीटॉरनीं केलेले अनेक कायदे एकत्र संगृहीत करण्यांत आले. १३२-१३५ या सालीं यहुदी लोकांबरोबर दुसरें युद्ध झालें. या कारकीर्दीत कांहीं सार्वजनिक इमारतीहि बांधल्या गेल्या. पुढला म्हणजे चौथा चांगला बादशहा (इ. स. १३८-१६१) अँटोनायनस पायस हा होय. याची सर्व कारकीर्द शांततेंत व भरभराटींत गेली. १३९ मध्यें ब्रिटनमध्यें एक बंड झालें तें लॉल्लिअस अर्बिकस यानें मोडलें. पांचव्या चांगल्या कारकीर्दीत (इ. स. १६१-१७८) मार्कस ऑरीलीअस व ल्यूशिअस व्हीरस या दोघांनीं जोडीनें राज्यकारभार केला. १६२-६५ मध्यें पार्थियन लोकांबरोबर युद्ध करून रोमन लोकांनीं आर्मीनियाचें राज्य कायदेशीर वारसास दिलें. १६३ मध्यें ख्रिस्ती लोकांचा छळ झाला. १६६ मध्यें मार्कोमॅन्नाय व इतर कांहीं रानटी टोळ्यांनीं एकत्र मिळून रोमन साम्राज्यावर स्वारी केली. तेव्हां दोघेहि बादशहा त्यांच्याबरोबर लढण्याकरितां गेले. १६९ मध्यें ल्यूशिअस व्हीरस बादशहा मरण पावला. १७४ मध्यें रोमन सैन्यानें क्वेडाय लोकांविरुद्ध जय मिळविला. याच लढाईंत 'थंडरिंग लीजन' या नांवानें प्रसिद्ध असलेली अद्भुत चमत्कारिक गोष्ट घडली. १७५ मध्यें अँव्हिडिअस कॅशिअस यानें आपण टॉरस पर्वताशेजारच्या सर्व प्रदेशाचे बादशहा असल्याचें जाहीर केलें, पण त्याच सालीं तो मारला गेला. १७८ मध्यें मार्कोमॅन्नाय लांबरोबर पुन्हां युद्ध सुरू झालें व तें पुढील कारकीर्दींत १८० मध्यें संपलें.