प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
ऑगस्टाइन काळ (ख्रि. पू. ३०-इ.स. १४) - रोमन बादशाही सत्तेच्या काळाचे तीन विभाग पडतात. पहिला विभाग ऑगस्टाइन काळ; दुसरा विभाग रोमन बादशाहीच्या भरभराटीचा काळ; व तिसरा तिच्या अवनतीचा काळ. यांपैकीं पहिल्या विभागांतील ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी येणें प्रमाणें:-
ऑगस्टसच्या कारकीर्दीत ख्रि. पू. २९ मध्यें रोम येथील आपसांतील युद्धें संपून शांततेच्या काळास सुरुवात झाली, व त्याचें निदर्शन म्हणून जेनस देवतेच्या देवालयाचे दरवाजे सेनेटच्या आज्ञेवरून बंद करण्यांत आले. ऑक्टेव्हिअन हा सैन्याचा मुख्य सेनापति नेमण्यांत येऊन युद्ध किंवा तह करण्याचा अधिकार त्याला देण्यांत आला. त्याचप्रमाणें त्याला ऑगस्टस ही पदवी अर्पण करण्यांत येऊन एकदर १० वर्षांसाठीं प्रो-कॉन्सल नेमण्यांत आलें. ख्रि. पू. २० मध्यें पार्थियाच्या राजाबरोबर व १२-९ मध्यें जर्मनींत रोमनें कांहीं लढाया केल्या. ख्रि. पू. ४ किंवा १ मध्यें येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.