प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
रोमच्या इतिहासांतील आद्य राजसत्ताककाळ - (ख्रि. पू. ७५३-५१०) - इटालीसंबंधाची प्राचीन माहिती फार अल्प व अस्पष्ट मिळते. ख्रि. पू. दुस-या सहस्त्रकांत १५०० च्या पूर्वीं तेथें आयबीरिअन व लिगूरिअन लोक रहात होते. पुढें आल्प्स पर्वताच्या बाजूनें एट्रुक्सन लोक इटालींत येऊन राहूं लागले. नंतर आर्यन वंशापैकीं सिक्युलाय नांवाची जात आणि त्यानंतर साबेलो अंब्रिअन नांवाची जात या देशांत येऊन राहिली. याशिवाय इटालीच्या किना-यावर अनेक ठिकाणीं ग्रीक लोक वसाहत करून राहूं लागले होते ते निराळेच. अशा प्रकारच्या परिस्थितींत मूळ रोम शहराची स्थापना झाली. टायबर नदीच्या कांठीं एका शेजारीं एक असलेल्या सात टेकड्यांवर वसलेला लोकसमाज मिळून रोम शहर बनलें. या लोकांनीं राजा व त्याच्या सल्ल्यासाठीं १०० लोकांचें एक मंत्रिमंडळ अशी शासनव्यवस्था ठरवून त्यांच्या हातीं राज्याचीं सूत्रें दिलीं. प्रथम या रोमच्या राज्यांत फक्त तीस गांवांचाच समावेश होत असे. रोमच्या या आद्य राजसत्ताक काळाचा इतिहास बहुतेक दंतकथात्मक आहे. रोमन लोकांचा प्राचीन इतिहास स्थूलतः येणेंप्रमाणें:-
रॉम्युलस (ख्रि. पू. ७५३-७१६) - पौराणिक काळापैकीं हा पहिला राजा होय. यानें सॅबिन लोकांबरोबर युद्ध केले. पण सॅबिन लोकांचा राजा टायटस टेशिअस याला जय मिळाला तेव्हां रोमन आणि सॅबिन लोकांमध्यें तह होऊन रॉम्युलस आणि टेशिअस या दोघांची द्विराजक सत्ता सुरू झाली. पुढें रॉम्युलस हा एका वादळाच्या वेळीं नाहींसा झाला, व त्यालाच लोक पुढें क्विरायनस देवता मानून भजूं लागले.
न्यू मा पाँ पि लि अ स (ख्रि. पू. ७१५-६७३) - याला रोमन लोकांनीं एक वर्षानंतर राजा नेमिलें. त्यानें रोमन लोकांनां एक विशिष्ट प्रकारचा धर्म लावून दिला व जेनस देवतेचें देऊळ बांधिलें.
टु ल स हॉ स्टि लि अ स (६७२-६४१) - यानें आल्बालाँगाबरोबर युद्ध केलें त्यांत रोमला जय मिळाला, व आल्बालाँगा मोडून तेथील सर्व लोक रोम येथें येऊन राहिले.
अँ क स मा र्शि अ स (ख्रि. पू. ६४१-६१६) - यानें लॅटिन प्रांतांतील चार शहरें जिंकून घेतलीं.
टा र्क्वि नि अ स प्रि स्क स (ख्रि. पू. ६१५-५७८) यानें कॅपिटोलाइन टेकडीवर ज्युपिटरचें देवालय बांधिले, सैन्यामध्यें नवीन प्रकारची व्यवस्था सुरू केली आणि सेनेट नांवाच्या मंत्रिमंडळाच्या सभासदांची संख्या तीनशें केली. त्यानें सॅबिन, लॅटिन आणि एट्रुस्कन या लोकांबरोबर लढाया करून जय मिळविले. या राजाचा त्याच्या मुलानें खून केला.
स र्व्हि अ स टु लि अ स (ख्रि. पू. ५७८-५३४) - हा टार्क्विनिअसचा जावई टार्क्विनिअसच्या मागून गादीवर आला. यानें रोमन प्रजेचे चार विभाग पाडले, रोम शहराभोंवतीं भिंती बांधिल्या व व्हीयाय लोकांबरोबर लढाया केल्या. ह्याचा ह्याच्या जांवयानें खून केला.
टा र्क्वि नि अ स सु प र ब स (ख्रि. पू. ५३४-५१०) - यानें ज्युपिटरचें देवालय पुरें केलें, लॅटिन राजांनीं बनविलेला संघ पूर्णपणें आपल्या ताब्यांत आणिला व आपला मुलगा सेक्स्टस याच्या मदतीनें गेबिआय शहर काबीज केलें. याचा मुलगा सेक्स्टस यानें ल्युक्रीशिआ नांवाच्या स्त्रीवर बलात्कार केल्यामुळें रोमन लोकांनीं चिडून बंड केलें; आणि राजसत्ताक पद्धति नाहींशी करून प्रजासत्ताक शासनपद्धति सुरू केली.