प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

रोमन लोकसत्ताकाचा काळ-उत्तरार्ध, (ख्रि. पू. १३७-३९) : - ख्रि. पू. १३७ पर्यंतच्या काळांतील रोमन लोकांची साधी कृषिव्यवसायप्रधान रहाणी आणि शुद्ध नैतिक आचरण या गुणांच्या जोरावर रोमन लोकांनीं मोठें साम्राज्य संपादन केलें. या साम्राज्यविस्ताराचा रोमन राज्यकर्त्यांनीं असा एक फायदा करून घेतला कीं, गरीब रोमन लोकांनां या जिंकलेल्या देशांत वसाहती करण्याकरितां फुकट जमिनी दिल्या, व अशा रीतीनें रोमन समाजांतील गरीब वर्गाची स्थिति सुधारली. यामुळें खुद्द रोम राजधानींतले आणि या अनेक वसाहतींतले रोमन लोक बरेच श्रीमंत झाले. साम्राज्य बरेंच वाढल्यावर युद्धाचे प्रसंग कमी होऊन रोमन समाजाला शांततेचे दिवस लाभले. या शांततेच्या काळांत मोठमोठे धार्मिक उत्सव व समारंभ तसेच शारीरिक खेळांचे सामने, व नाटकें, तमाशे वगैरे करमणुकीचे प्रकार यांची आवड रोमन लोकांत वाढूं लागली; लॅटिन भाषेचें अध्ययन व त्या भाषेंत गद्यपद्यमय रचना यांच्याकडे रोमन लोकांचें लक्ष वेधलें; आणि ग्रीक भाषा व ग्रीक वाङ्‌मय, तसेंच ग्रीकांचें तत्त्वज्ञान व अलंकारशास्त्र या विषयांतहि रोमन लोकांनीं बरीच प्रगति केली.

या सुपरिणामाबरोबर ग्रीक लोकांतल्या कित्येक अनिष्ट गोष्टीहि रोमन लोकांत सहजच शिरल्या. ग्रीक लोकांतले भविष्यकथन करणारे, तसेच नाकाडोळ्यांचे वैदू, स्वयंपाकी, न्हावी, खुषमस्कर्‍ये, दरबारी वगैरे अनेक प्रकारच्या लोकांनीं रोमन समाजांत प्रवेश केला; व त्यामुळें रोमन समाजांत ब-याचशा अनिष्ट गोष्टी फैलावल्या. रोमन लोकांतले उच्च नैतिक सदगुण, लष्करी बाणा, आणि शेतीची आवड वगैरे सर्व लोपत गेले. रोमन कायदा आणि रोमन राज्यव्यवस्था यांचा बाह्य देखावा कायम होता, तथापि धनिक रोमन लोक आणि बडे सरकारी अधिकारी यांच्यामध्यें हळू हळू स्वार्थबुद्धीनें आणि चैनबाजीनें प्रवेश केला. याचा मुख्य परिणाम असा झाला कीं, रोमन पुढारी लोकांत व्यक्तिद्वेष वाढून राज्यांतील अधिकाराच्या जागांकरितां पक्ष पडून आपसांत यादवी सुरू झाली. रोमन प्रजासत्ताकाच्या उत्तरार्धाचा हा काळ अशा प्रकारच्या युद्धांनीं भरलेला आहे. या काळांतील ऐतिहासिक गोष्टींचें टिपण येणेंप्रमाणें:-

ख्रि. पू. १३३-१११- या सुमारास ट्रिब्यून नामक पॅट्रिशियन लोकांच्या जाचापासून स्वतःचें संरक्षण करण्याकरितां लोकांनीं निवडलेल्या अधिका-यांचें प्रस्थ रोमन राज्यांत फार माजलें. राज्यकारभारांत प्रत्यक्ष कॉन्सलपेक्षांहि वरिष्ठ अधिकार हे ट्रिब्यून गाजवूं लागले. ख्रि. पू. १३३ सालीं टायबीरिअस सेंप्रोनिअस ग्रॅक्कस या नांवाचा इसम ट्रिब्यून निवडला गेला. त्यानें सार्वजनिक जमिनी गरीब लोकांनां वांटण्याचा व प्रत्येक माणसाकडे कांहीं मर्यादितच मालकीची जमीन असावी असा कायदा पुढें आणिला. या कायद्याला मोठ्या जमीनदार लोकांनीं विरोध केला. टायबीरिअस ग्रॅक्कस, त्याचा भाऊ केयस आणि सासरा अँप्पिअस क्लॉडिअस या तिघांनीं संगनमत करून वरील कायदा व दुस-या कित्येक सुधारणा अंमलांत आणण्याचा प्रयत्न चालविला; परंतु एक वर्षाच्या मुदतीनंतर आपण पुन्हां ट्रिब्यून निवडून यावें अशी कायद्याच्या विरुद्ध खटपट टायबीरिअस ग्रॅक्कसनें केली तेव्हां प्रतिपक्षानें दंगा केला, व त्यांत टायबीरिअस ग्रॅक्कस मारला गेला. त्याचा भाऊ केयस ग्रॅक्कस यानें नव्या सुधारणा करण्याचे धोरण तसेंच पुढें चालू ठेविलें. परंतु त्याला प्रतिपक्षी प्रबल भेटलें; यामुळें सामान्य लोकांची सहानुभूति मिळविण्याकरितां गरीब लोकांनां सरकारी खर्चानें धान्य वांटावें असा ठराव त्यानें पुढें आणिला. जिंकलेल्या दूरदूरच्या प्रांतांत रोमन लोकांच्या वसाहती स्थापाव्या ही कल्पनाहि त्यानेंच प्रथम पुढें मांडिली. शिवाय रोमन सेनेटकडून चोख न्याय मिळत नाहीं म्हणून स्वतंत्र न्यायकोर्ट स्थापावें असाहि कायदा त्यानें पास करून घेतला. ख्रि. पू. १२२ मध्यें त्यानें सर्व लॅटिन लोकांनां रोमन नागरिकत्वाचे हक्क द्यावे असा ठराव पुढें आणिला, पण तो सेनेटनें फेटाळून लाविला. याच्या पुढच्या वर्षीं केयस ग्रॅक्कस हा एका दंग्याच्या वेळीं मारला गेला. पुढील दहापांच वर्षांत, ग्रॅक्कसंबंधूंनीं ज्या कांहीं सुधारणा केल्या होत्या त्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनीं युक्तिप्रयुक्तीनें रद्द केल्या.

ख्रि. पू. १११-१००- या सुमारास न्युमिडिया या राज्याचे दोन राजे ज्युगर्था व अँधर्बल यांच्यामध्यें तंटा लागला. त्यांत अँधर्बल मारला गेला. पण मरणापूर्वी त्यानें रोमन सेनेटचें मदत देण्याबद्दल मन वळविलें होतें. त्यामुळें रोमनें ज्युगर्थाबरोबर युद्ध सुरू केलें; व त्यांत अखेर मेरिअस व सल्ला या दोन रोमन सेनापतींनीं ज्युगर्थाचा पराभव केला. ख्रि. पू. १०४ मध्यें मेरिअस कॉन्सल निवडून आला. या सुमारास सिंब्रि, ट्यूटोनीझ (ट्यूटोनाय) आणि अँब्रोनीझ या जातींच्या रानटी लोकांनीं इटालीवर स्वारी केली. परंतु मेरिअसनें रोमन सैन्याची चांगली व्यवस्था करून या रानटी लोकांचा पराभव केला व बरेच लोक कैद करून आणिले.

ख्रि. पू. १००-८६ (मे रि अ स ची का र की र्द)- मेरिअस हा वरील पराक्रमामुळें सहा वेळां कॉन्सल निवडून आला. नवीन जिंकून घेतलेल्या जमिनी स्वतःच्या शिपायांनां वांटून द्याव्या असा कायदा त्यानें सेनेटकडून पास करून घेतला. परंतु पुढें ख्रि. पू. ९९ मध्यें सेनेटनें त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मदतीनें त्यास विरोध केला. तेव्हां युद्ध उपस्थित झाल्याशिवाय आपल्या हातीं सत्ता राहण्याची आशा नाहीं असें वाटून तो आशियांत गेला, व तेथें त्यानें मिथ्राडेटीझशीं कुरापत काढून वैर संपादण्याचा प्रयत्न केला. नंतर तो स्वदेशीं परत आला व सामाजिक युद्धांत त्यानें दुय्यम सेनापतीच्या जागीं काम केलें (९०) या धामधुमीच्या काळांत सल्ला आणि ज्यूलिअस सीझर हे दोन पराक्रमी रोमन इसम पुढें आले. ख्रि. पू. ८८ मध्यें मिथ्राडेटीझशीं युद्ध सुरू होऊन सेनेटनें सैन्याचें आधिपत्य सल्ला याजकडे दिलें; परंतु मेरिअसनें सल्पिशिअस या ट्रिब्यूनच्या मदतीनें तें सल्ला याजकडून काढून स्वतःकडे घेतलें. तेव्हां सल्ला रोमवर चालून आला व त्यानें सल्पिशिअस व मेरिअस यांचा पराभव केला. सल्ला व मेरिअस यांच्यामधील लढा म्हणजे वस्तुतः लोकपक्ष व सेनेट यांच्यामधीलच लढा होता. ट्रिब्यूनची वाढती सत्ता सेनेटला असह्य झाली होती. सल्ला यास विजय मिळतांच त्यानें मेरिअसला पकडून त्यास मॅजिस्ट्रेटकडून देहान्त शिक्षा ठोठावली. पण लोकांच्या सहानुभूतीमुळें मेरिअस बचावून आफ्रिकेंत पळून गेला. ख्रि. पू. ८७ मध्यें, निवडणुकी आटपून सल्ला हा आशियांत निघून गेल्यावर कॉन्सल एल. कॉर्नीलिअस सिन्ना यानें, सल्पिशिअस याच्या ज्या लोकपक्षाचे हक्क विस्तृत करण्याच्या ठरावांवर रणें माजून सल्ला यानें तरवारीच्या जोरावर तात्पुरता विजय मिळविला होता तेच ठराव पुन्हां लोकसभेपुढें आणले. पण त्याचा साथीदार जो दुसरा कॉन्सल त्यानें सैन्यासह येऊन मत द्यावयास आलेल्या विरुद्ध पक्षाची कत्तल केली. ही संधि साधून मेरिअस यानें आफ्रिकेंतून सिन्नाच्या मदतीस येऊन रोमवर स्वारी केली व तें शहर हस्तगत करून तेथें पांच दिवस उमराव मंडळींची कत्तल व लुटालूट केली. शेवटीं ८६ मध्यें लोकसभांनीं मेरिअसला पुन्हां सातव्यानें कॉन्सल नेमिलें, पण तो लवकरच मरण पावला.

ख्रि. पू. ८६-७८ (स ल्ला ची  का र की र्द)- तिकडे आशियांत सल्ल्यानें मिथ्राडेटीझचा पराभव केल्यावर तो परत सैन्यांनिशीं रोमवर चालून आला. त्याच्या पक्षास मोठा पाँपी हा पराक्रमी पुढारी मिळून त्यानें रोमन येथील कॉन्सलचा पराभव केला. यानंतर मिथ्राडेटीझबरोबर पुन्हा युद्ध सुरू होऊन तें ८१ मध्यें संपलें. इकडे रोममध्येंहि मुख्य सत्ता हाती घेण्याकरितां निरनिराळ्या पुढा-यांच्या पक्षात मारामा-या सुरू होत्या त्यांत अखेर सल्ला विजयी होऊन त्यानें सर्व सत्ता हातीं घेतली, व प्रतिपक्षांतील अनेक पुढारी माणसांची कत्तल करून त्यांची मालमत्ता जप्त केली. नंतर त्यानें सेनेट सभा पुनर्घटित करून तिचे अधिकार वाढविले, व ट्रिब्यूनची सत्ता कमी केली. याप्रमाणें राज्यकारभाराची नीट व्यवस्था लावून दिल्यावर सल्लानें ७९ मध्यें स्वतः होऊन अधिकारन्यास केला, व लागलाच पुढच्या वर्षी तो मरण पावला.

ख्रि. पू. ७८-६० (पाँ पी ची का र की र्द)- पाँपीनें तिस-या मिथ्राडेटीझवर युद्धांत जय मिळविला व भूमध्यसमुद्रावर चांचेगिरी करणा-या अनेक लोकांचा पराभव केला. शिवाय सिरिया, आशियामायनर या रोमन प्रांतांतील बंडाळी मोडिली. ६२ मध्यें तो रोमला परत आला तेव्हां त्यानें आपल्या शिपायांनां नव्या जमिनी मिळाव्या अशी मागणी केली. पण सेनेटनें ती नाकारिली.

ख्रि. पू. ६०-४९ (प हि लें ट्रा य म वि रे ट उ र्फ त्रि कू ट स त्ता)- या काळांत पाँपी, सीझर व क्रॅसस यांनीं आपलें त्रिकूट बनवून राजकीय सत्ता हातीं घेतली. ५९ मध्यें सीझर कॉन्सल झाला; आणि पाँपीच्या सैनिकांनां जमिनी देण्याच्या ठरावाला लोकसभेनें संमति दिली. सिसिरो व केटो हे वरील त्रिकूटाचे बलाढ्य प्रतिस्पर्धी होते. ख्रि. पू. ५७ व ५१ यांच्या दरम्यान सीझरनें फ्रान्स, जर्मनी वगैरे युरोपचा भाग जिंकून घेतला. या काळांत पाँपी व कॉन्सल होता. पुढें सीझरचें आणि पाँपीचें पटेनासें झालें व सेनेटनें सीझरला परत बोलाविलें.

ख्रि. पू. ४९-४४ (जू लि य स सी झ र चें व र्च स्व)- सीझर परत आल्यावर पाँपी ग्रीसमध्यें पळून गेला. ४८ मध्यें सीझर कॉन्सल नेमला गेला. त्याच सालीं त्यानें पाँपीचा पराभव केल्यामुळें पाँपी इजिप्तमध्यें पळून गेला व तेथें मारला गेला. यानंतर इजिप्तमध्यें राज्याबद्दल तंटे चालू होते तिकडे स्वारी करून सीझरनें इजिप्शियन सैन्याचा पराभव केला, आणि क्लीओपाट्रा व तिचा भाऊ यांच्या हातीं राजसत्ता देऊन व त्यांनां रोमचे मांडलिक बनवून तो परत आला. सीझरला दहा वर्षांकरितां डिक्टेटर म्हणजे सर्वाधिकारी म्हणून नेमण्यांत आलें. तेव्हां त्यानें राज्यकारभारांत अनेक सुधारणा केल्या. त्यानें मतदानाचा हक्क अधिक लोकांनां दिला, सेनेटच्या सभासदांची संख्या वाढविली, अधिक रोमन वसाहती करविल्या, सर्व रोमन साम्राज्याची पाहणी करण्याची व्यवस्था केली, आणि कायद्यांचें नवें कोड तयार करण्याची योजना केली. शिवाय त्यानें अनेक सार्वजनिक कामें करण्याचें ठरविलें. याप्रमाणें सीझर सर्वसत्ताधीश व लोकप्रिय झाला तेव्हां त्यालाच कायमचा राजा नेमून राजमुकुट अर्पण करण्याबद्दल सूचना पुढें आल्या. पण त्यानें राजपद स्वीकारण्याचें नाकारिलें. तथापि त्याच सालीं म्हणजे ४४ मध्यें ब्रूटस, कॅशिअस वगैरे त्याच्या प्रतिस्पर्ध्यानीं गुप्त कट करून त्यास ठार मारिलें. पुढें सीझरच्या पक्षाचा मार्क अँटनी यानें या कटवाल्यांविरुद्ध लोकमत तयार केलें. तेव्हां कटवाले पळून गेले आणि मार्क अँटनी रोममध्यें सर्वसत्ताधीश बनला.

ख्रि. पू. ४४-३० (दु स रें ट्रा य म व्हि रे ट)- ४३ मध्यें सेनेटनें ऑक्टोव्हिएनस (ऑक्टेव्हिअन) याचा पक्ष घेऊन त्याला अँटनीविरुद्ध पाठविलें; तेव्हां अँटनीचा पराभव होऊन ऑक्टेव्हिअन कॉन्सल झाला. परंतु त्यानें अँटनी व लेपिडस यांशीं सख्य करून पुन्हां एक त्रिकूट बनविलें. या त्रिकूटानें ब्रूटस, कॅशिअस वगैरे कटवाल्यांविरुद्ध, सूड उगविला. ४० मध्यें या त्रिकूटानें रोमन साम्राज्य आपसांत वांटून घेतलें. पुढें अँटनी क्लीओपाट्राच्या जाळ्यांत सांपडून इजिप्तमध्यें जाऊन राहिला व आक्टेव्हिअनशीं त्याचें जमेनासें झालें. तेव्हां दोघांमध्यें लढाई होऊन अँटनीच्या आरमाराचा पराभव झाला. ख्रि. पू. ३० मध्यें अँटनी व क्लीओपाट्रा या दोघांनीं आत्महत्या केली. यानंतर इजिप्त देश रोमन साम्राज्यास जोडण्यांत येऊन आक्टेव्हिअन सर्व रोमन साम्राज्याचा सत्ताधीश बनला.