प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति
ग्रीकांच्या स्वतंत्र इतिहासास आळा घालणारी सत्ता रोमन लोकांची होय. यांच्या सत्तेंत ग्रीकसंस्कृति नष्ट न होतां कांहीं अंशीं रूपांतरित झाली आणि बळावली. यांची यूरोपला किंबहुना जगाला देणगी म्हटली म्हणजे कायदा होय. अधिक श्रेष्ठ प्रकारची शासनसत्ता रोमनें उत्पन्न केली, व शासनसत्तेचें एक अंग जो कायदा तो रोमनें शिस्तवार विकासविला. परंतु कला व शास्त्र या बाबतींत ग्रीसनें कार्य अधिक पुढें नेलें. रोमला सांस्कृतिक इतिहासांत महत्त्वाचें स्थान मिळण्यास कायद्याशिवाय दुसरें कारण नाहीं. राष्ट्रविकासाच्या इतिहासांत मात्र रोमला महत्त्वाचें स्थान आहे.