प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.
लोकसत्ताक काळाच्या पूर्वार्धांतील लोकस्थिति - येणेंप्रमाणें या विजयाच्या काळांत रोमनें सर्व इटाली देशावर आपलें स्वामित्व प्रस्थापित केलें इतकेंच नव्हे, तर कार्थेज व मॅसिडोनिया येथील आपले बलाढ्य प्रतिस्पर्धी पूर्णपणें नाहींसे केले. रोमन लोकांच्या राजकीय गुणांचा विकास झालेला अर्थात् याच काळांत दिसतो. प्यूनिक युद्धांच्या सुमारास रोमन राज्यकारभाराची घटना पूर्णत्वांस येऊन पोहोंचली होती; प्लीबियन लोकांनां समान राजकीय हक्क मिळून आपसांतील तंटे नाहींसे झाले होते; इतकेंच नवहे तर मिश्र विवाहास कायद्याची संमति मिळून पॅट्रिशियन व प्लीबियन या दोन वर्गांचे पथक अस्तित्वच नाहींसें होत गेलें, व कोणत्याहि रोमन माणसाला कॉन्सलचा सर्वश्रेष्ठ दर्जा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा धरण्याचा मार्ग मोकळा झाला.
स र का री नो क रीं ती ल अ धि का रा च्या जा गा - तथापि कॉन्सलचा सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त होण्यास रोमन नागरिकाला अनेक दर्जांच्या अधिकारावरून काम करीत व अनुभव घेत वर चढत जावें लागत असे. निरनिराळ्या अधिकारांच्या जागांची वयोमर्यादाहि ठरलेली असे. सरकारी नोकरींतील पहिली अधिकाराची जागा क्वेस्टरशिप (कॉन्सलचा खजिनदार) हीं असून तीं मिळण्याकरितां माणसाचें वय कमींत कमी २७ वर्षांचें असावें लागे. पुढील जागा एडाइलशिपची (सार्वजनिक इमारती, रस्ते, पोलीस, खेळ व सार्वजनिक उत्सव वगैरे गोष्टींवर देखरेख ठेवणारा अधिकारी) असून तिच्याकरितां वयोमर्यादा ३७ ठरविण्यांत आली होती.त्यानंतरच्या प्रीटॉरशिपच्या (कॉन्सलचीं बहुतेक कामें करणारे दुय्यम अधिकारी) जागेस वय कमींत कमी ४० असावें लागे, व अखेरच्या कॉन्सलशिपच्या अधिकाराकरितां ४३ ही वयोमर्यादा होती. अशी बंधनें असल्यामुळें कॉन्सल होणारा इसम पुष्कळ अनुभवी व वयानें बराच प्रौढ असे. बहुतेक वरिष्ठ अधिकारांच्या जागांची मुदत एक वर्षाची असे व त्यांच्या कामाबद्दल पगार मिळत नसे. मात्र खर्चाकरितां भत्ता म्हणून कांहीं रक्कम देण्यांत येत असे.
सैन्य - रोमन लोकसत्तेचें खडें सैन्य मुळीच नसे. १७-४५ वयाच्या आणि चार हजार तांब्याच्या नाण्यांइतक्या किंमतीची संपत्ति असलेल्या सर्व लोकांची लष्करी नोकरींकरिता यादी तयार करीत असत. या यादींतून प्रत्येक कॉन्सलची दोन लीजनें (यांत पायदळ व घोडदळ मिळून अजमासें चार हजारांपासून सहा हजारांपर्यंत शिपाई असत) याप्रमाणें दोन कॉन्सलांचें मिळून चार लीजन सैन्य सरकारजवळ तयार असे. प्रत्येक वर्षाच्या शेवटीं या चार लीजनमध्यें नव्या माणसांची भरती करीत असत. या चार लीजनशिवाय जरूरीप्रमाणें लीजनची संख्या वाढवीतहि असत. येणेंप्रमाणें सैन्यांत आणि वरिष्ठ सरकारी नोकरींत दरसाल नव्या नेमणुकी होत असल्यामुळें कोणाहि माणसाच्या हातांत एक वर्षाहून अधिक अधिकार रहात नसे.
से ने ट - याप्रमाणें सैन्य आणि सरकारी नोकरी यांतील वरिष्ठ अधिकाराच्या जागांवरील माणसें बदलत असत तरी रोमन राज्यकारभाराचें धोरण संभाळणारी जी सेनेट सभा तिच्यांतील लोक कायमचे असत. जो इसम सेनेट सभेचा सभासद होई तो मरेपर्यंत त्या जागेवर कायम रहात असे. तथापि सेनेटचें सभासदत्व वंशपरंपरा मात्र चालत नसे. या सेनेटचे एकंदर तीनशें सभासद असत, आणि रोमन लोकसत्ताकाचा कारभार ही सेनेट व सर्व रोमन लोक यांच्या नांवानें चालत असे. सारांश सेनेट हीच सर्वसत्ताधारी सभा होती, व रोमच्या इतिहासांत या सभेचें अत्यंत महत्त्व आहे. सेनेटचा सभासद होण्यास तीन गोष्टी लागत असत. पहिली गोष्ट, वरिष्ठ दर्जाची सरकारी नोकरी; म्हणजे विशिष्ट हुद्दयावर नोकरी केलेल्या इसमांनांच सेनेटच्या निवडणुकीत उमेदवार होतां येत असे. दुसरी गोष्ट, उमेदवाराजवळ ठराविक किंमतीची जिंदगी असावी लागे. तिसरी गोष्ट, उमेदवाराचें वय तिसाच्या वर असावें लागे. कायदे करण्याचा अखेरचा अधिकार या सेनेटकडे असे. रोमन राज्याचें परराष्ट्रीय धोरणहि सेनेट सभाच ठरवीत असे. मात्र युद्ध करणे किंवा तह करणें या गोष्टी लोकांचीं मतें घेऊन ठरविण्यांत येत असत. कॉन्सल आपलीं कामें बरोबर करीत नसल्यास त्यांनां अधिकारावरून काढून डिक्टेटर म्ह. सर्वाधिकारी नेमण्याचा अधिकार सेनेटला असे. परराष्ट्रीय वकीलहि सेनेटच नेमीत असे. शिवाय विशेष महत्त्वाच्या आरोपांची चौकशी सेनेटचेच सभासद हायकोर्ट म्हणून करीत असत.
कु टुं ब व्य व स्था - रोमन रिपब्लिकच्या सॅमनाइट युद्धांपर्यंतच्या काळास सुवर्णयुग असें मानण्यांत येते. या काळांतले रोमन लोक साध्या रहाणीचे आणि प्रामाणिक होते यांत शंका नाहीं. तथापि ते ग्रीक लोकांइतके सुधारलेले व सुसंस्कृत नव्हते. शिवाय जसजसें रोमन साम्राज्य वाढत गेले तसतशी, इतर प्रांतांतील मागासलेल्या लोकांचा साम्राज्यांत अंतर्भाव होऊन, एकंदर लोकसंख्या पुष्कळच वाढली; आणि गुलामपद्धतीचा एक अत्यंत अनिष्ट प्रकार रोमन समाजांत सुरू झाला. युद्धाच्या वेळीं लुटींत पकडलेले अनेक इसम पुढें जनावरांप्रमाणें विकण्यांत येत असत. यामुळें सर्व धनिक पॅट्रिशियन व प्लीबियन इसमांजवळ पुष्कळ गुलाम असत. एक एका लढाईनंतर वीस वीस तीस तीस हजार इसम गुलाम म्हणून विकण्यांत येत असत. अशा गुलामांनां नागरिकत्वाचे कोणतेहि हक्क नसत व त्यांनां कायदेशीर विवाहसंबंधहि करतां येत नसत. त्यांनां खासगी मालकीची जिंदगी मुळींच करतां येत नसे. गुलामावर मालकाचा पूर्ण ताबा असे, आणि गुलामाला कोणी इजा केल्यास अगर त्याचा खून केल्यास त्याची नुकसानभरपाई मालकाला मिळत असे. अशा अमानुष गुलामपद्धतीचे रोमन समाजावर अर्थात फार अनिष्ठ परिणाम झाले. तथापि चांगल्या वागणुकीबद्दल बक्षीस म्हणून गुलामांनां स्वतंत्र करण्याची पद्धति रोमन लोकांत हळू हळू बरीच रूढ झाली. गुलामगिरींतून स्वतंत्र झालेल्या लोकांनां अनेक प्रकारचे कलाकौशल्याचे धंदे करून श्रीमंतहि होतां येत असे.
रोमन कुटुंबांतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापाचा किंवा पालकाचा कुटुंबांतील इतर माणसांवर असलेला अनियंत्रित अधिकार ही होय. रोमन कुटुंबांतील मुख्याचा आपली बायको, मुलगे, मुली, सुना वगैरेंवर अगदीं गुलामावरच्याप्रमाणें हक्क असे. मुलगा वयांत आल्यावर तो स्वतंत्र होत असे, पण मुली व बायका यांच्यावरील अधिकार नेहमींच कायम असे. मनुस्मृतींतलें ''न स्त्री स्वातंत्र्यमर्हति'' हें सूत्र रोमन स्त्रियांनां पूर्णपणें लागू होते. प्रथमपासून रोमन लोकांत एकपत्नीपद्धति चालू होती. घटस्फोट कायद्यानें मान्य होता तरी नैतिक दृष्ट्या तो गर्हणीय समजला जात असे. असा घटस्फोट ५०० वर्षांतून एकदा ऐकुं येतो असें प्राचीन रोमन लेखनांनीं लिहून ठेविलें आहे. या उच्च प्रकारच्या धार्मिक व पवित्र विवाहसंबंधाशिवाय दुसरा एक हलक्या दर्जाचा विवाहसंबंध रोमन लोकांत रूढ झालेला होता.
पा र मा र्थि क सं प्र दा य - रोमन लोकांनीं आपले धार्मिक विधी मूळ एट्रुस्कन लोकांपासून घेतले होते हें मागें सांगितलेंच आहे. शिवाय रोमन साम्राज्यांत निरनिराळ्या देशांतील मानव जातींचा समावेश झाल्यावर रोमन लोकांच्या धार्मिक विधींत अनेक गोष्टींचा समावेश होत गेला. देवतांची संख्या तर पुढें इतकी वाढली कीं, ''आमच्या देशांत माणसांपेक्षां देवांचीच संख्या अधिक आहे'' असें एका रोमन इसमाचे उद्गार आहेत. तथापि देवतांच्या स्वरूपाविषयीं व गुणांविषयीं रोमन लोकांनीं ग्रीक लोकांइतकी चिकित्सा केलेली दिसत नाहीं. उलट रोमन लोक देवतांशीं फार भिऊन वागत असत असें दिसतें. देवतांविषयीं वाटणा-या या धास्तीमुळें रोमन समाजांत माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत देवतेची कृपा संपादण्याकरितां अनेक धार्मिक विधी रूढ झालेले होते. माणसें मेल्यावर देव होऊन आपल्या आप्तेष्टांचें संरक्षण करतात अशीहि रोमन लोकांची समजूत असे, व म्हणून ते मेलेल्या माणसांनां अगदीं घरानजीक पुरून ठेवीत असत. तथापि रोमन लोक प्रत्यक्ष देवतांपेक्षांहि रोमन राज्याच्या कायद्याला अधिक मानीत असत. यासंबंधाचें एक लक्षांत ठेवण्यासारखें उदाहरण म्हणजे मृत देह घराजवळ पुरून ठेवण्याची चाल आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहे असें दिसून आल्यावर, कोणींहि गांवाच्या हद्दींत प्रेतें पुरूं नयेत असा रोमन सरकारनें कायदा केला आणि तो सर्व रोमन लोकांनीं बिनहरकत पाळला. या एकाच गोष्टीवरून सरकारी कायद्याबद्दल रोमन लोकांत किती आदर असे हें स्पष्ट दिसून येतें. तात्पर्य, वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यापेक्षां राष्ट्रहित आणि देशाभिमान यांची किंमत रोमन लोकांनां अधिक वाटत असे; त्याचप्रमाणें धार्मिक विधी व आचार यांपेक्षां सरकारी कायद्याचें महत्त्व रोमन लोकांनां अधिक वाटत असे. या दोन गोष्टींतच रोमन लोकांच्या साम्राज्यवैभवाचें बीज आहे असें म्हणावें लागतें.
क ला कौ श ल्य - हळू हळू ग्रीक वाङ्मयानें रोमन लोकांवर आपला पगडा बसविला, त्याप्रमाणें ग्रीक कलाकौशल्यानेंहि बसविला. युद्धांत मोठमोठे विजय मिळाल्यावर त्यांचें स्मारक म्हणून जीं देवालयें बांधण्यांत येत असत तीं रोमन सरकार एट्रुस्कन किंवा ग्रीक कारागिरांकडून बांधवीत असे. इटालीचा दक्षिणभाग जिंकल्यावर रोमन लोकांचा ग्रीक कलाकौशल्याचा कामाशीं फार निकट संबंध येत गेला. ग्रीकांच्या राज्यांतील नाण्यांचे अनेक सुंदर नमुने रोमन लोकांनां मिळाले, व रोमन लोकांजवह मौल्यवान धातूंचा संग्रह अधिकाधिक होत गेला. शिवाय जिंकलेल्या मुलुखांतून अनेक प्रकारचे पुतळे व मूर्ती रोमन लोकांनीं लुटून आणिल्या होत्या. व्होल्सिनी या एकाच शहरांतून रोमन लोकांनीं २००० पुतळें आणिले असें नमूद केलेलें आहे. याप्रमाणें अँग्रिजेटम, सिराक्यूस, कॉरिंथ वगैरे अनेक शहरांतून अनेक कलांचे अनेक उत्कृष्ट नमुने रोमन लोकांनीं आपल्या राजधानींत आणिले. तथापि ललित व उपयुक्त कलांचें प्रत्यक्ष ज्ञान मात्र रोमन लोकांनीं मिळवून त्यांत प्रगति केली नाहीं, हें रोमन लोकांच्या बुद्धिमत्तेंतलें मोठें वैगुण्य आहे. तथापि राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनें साम्राज्यांतील शहरांची आरोग्यदृष्ट्या नीट मांडणी करणें, प्रत्येक शहराला पाण्याचा भरपूर पुरवठा करणें व शहरांतील घाण वाहून जाण्याकरितां गटारें नहर, वगैरे नीट बांधणें या गोष्टी रोमन लोकांनीं उत्तम केल्या होत्या. शिवाय ज्वालामुखींतील तलावांत सांठलेला रस वाहून जाण्याकरितां रोमन लोकांनीं जे बोगदे तयार केले होते ते रोमन लोकांच्या वास्तुकलेंतील नैपुण्याची साक्ष देतात. तथापि ही बोगदे खोदण्याची कलाहि त्यांनीं एट्रुस्कन लोकांपासून घेतली होती असें दिसते.
वा ङ् म य - रोमन इतिहासांतील या सुवर्णयुगांत रोमन वाङ्मयालाहि सुरुवात झालेली दिसते. परंतु प्रथमचे रोमन ग्रंथ म्हणजे ग्रीक ग्रंथांचीं केवळ भाषांतरे होतीं. पहिल्या प्यूनिक युद्धानंतर (ख्रि. पू. २४०) लिव्हिअस अँड्रोनायकस याने लिहिलेलें पहिलेंच नाटक रोम येथें रंगभूमीवर आलें. त्यानें दुसरीहि अनेक नाटकें लिहिलीं, पण ती ग्रीक वाङ्मयांतून घेतलेलीं होतीं. त्यानेंच ओडिसी या ग्रीक काव्याचेयं लॅटिनमध्यें भाषांतर केलें. दुसरा कवि नीव्हिअस यानें कांहीं नाटकें लिहिलीं व पहिल्या प्यूनिक युद्धावर एक स्वतंत्र काव्य केलें. क्यू. एनिअस याला रोमन काव्याचा आद्यजनक मानतात. त्यानें प्रथम लॅटिन भाषेमध्यें ग्रीक वृत्तांचा प्रचार पाडला. यानें अनेक आनंदपर्यवसायी व शोकपर्यवसायी नाटकें लिहिलीं. शिवाय रोमचा काव्यबद्ध इतिहासहि त्यानें लिहिला होता. मिक्शिअस प्लॉटस आणि सिसिलिअस स्टेशिअस या दोघांनीं अनेक आनंदपर्यवसायी नाटकें लिहिलीं. या यांनींहि ग्रीक नाट्यग्रंथांचा बराच आधार घेतला होता. यांशिवाय दुसरे कित्येक कवी होऊन गेले; तथापि त्यांपैकीं कोणीहि प्रत्यक्ष जातीनें रोमन नव्हता. प्रत्यक्ष रोम शहरानें असा एकहि कवि निर्माण केला नाहीं. रोमन लोकांत क्यू. फेबिअस पिक्टॉर, एल. सिन्सिअल, अँलिमेंटस पॉस्टयूमिअस अँल्बायनस, एम. पोर्शिअस केटो वगैरे कित्येक इतिहासकार होऊन गेले. यांपैकीं पहिल्या तिघांनीं आपले ग्रंथ ग्रीक भाषेंत लिहिले. सर्शिअस यानें प्राचीन रोमन राज्यपद्धतीसंबंधानें ग्रंथ लिहिला. व बरेंच ऐतिहासिक संशोधन केलें. केटो यानें कृषिविषयक लिहिलेला ग्रंथ आज उपलब्ध आहे. त्यावरून प्राचीन इटालीबद्दल बरीच माहिती मिळते.