प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ५ वें.
रोमन संस्कृति.

बादशाही काळाच्या पहिल्या दोन शतकांतील देशस्थिति - या काळांत अमीन उमरावांचें वैभव व ऐषआराम, कांहीं विशिष्ट ठिकाणींच लोकसंख्येचें केंद्रीभवन, रोमन लोकांचा निष्ठुरपणा व निर्दयता अशा निरनिराळ्या कारणांमुळें देशांत दारिद्र्य वाढलें. कांहीं बादशहांनीं गरीबगुरिबांस धान्य वांटून जो दयाळूपणा दाखविला, त्यामुळें देशाचा फायदा होण्याच्या ऐवजीं लोकांत आळशीपणा मात्र वाढला. परंतु यूरोपच्या राजधानींत दिसून येणारी ही दुःस्थिति साम्राज्याच्या दूरदूरच्या भागांत क्वचितच दिसून येत होती. याचें कारण येथील लोकांची रहाणी रोमच्या लोकांप्रमाणें ऐषआरामाची बनली नव्हती हें होय. रोमनें तत्कालीन जगाचा नैतिक अधःपात केला असें जें म्हणतात तें सर्वस्वीं नसलें तरी ब-याच अंशीं खरें आहे. रोमपेक्षां रोमन साम्राज्यांतील प्रांतांची स्थिति पुष्कळ चांगली होती, याचें कारण सर्व ठिकाणचे दुर्गुणी व व्यसनी लोक रोममध्यें येऊन रहात असल्यामुळें तेथें रोमन सदगुणांचा परिपोष होण्यास अवकाशच राहिला नव्हता.

आ यु ष्य क्र म व चा ली री ती - रोम शहराच्या लोकसंख्येंत झपाट्यानें वाढ झाल्यामुळें अशा प्रकारच्या दाट वस्तीच्या शहरांतील सर्व दोष तेथेहि दिसून येत होते. दुकानें घालून बसण्याची पद्धति अद्याप प्रचारांत आली नसल्यामुळें बहुतेक व्यापार फेरीवाल्यांमार्फतच चालत होता. त्यांतच आश्रितांचा व नोकरचाकरांचा घोळका बरोबर घेतल्याशिवाय उंबरठ्याबाहेर पाऊलहि न टाकणा-या अमीर-उमरावांच्या अनुयायांची भर पडत असे. व्यापाराकरितां व रोमचें वैभव पाहण्याच्या जिज्ञासेनें निरनिराळ्या देशचे लोक तेथें एकत्र जमत असल्यामुळें त्या शहरास मुंबईसारख्या बकाल वस्तीच्या शहराचें स्वरूप आलें होतें. सरकारी कामकाज व इतर उद्योगधंद्याचे व्यवसाय सकाळपासून दुपारपावेतों चालत असत. मध्यान्हीं सूर्य येतांच सर्व लोक आपलें कामकाज संपवून घरीं जाऊन कांहीं वेळ वामकुक्षी करीत. यानंतर पुढें अंधार पडेपावेतों लोकांचा सर्व वेळ विश्रांति घेण्यांत व करमणुकीच्या साधनांनीं स्वतःचें मनोरंजन करण्यांत जात असे. सुखवस्तू लोक व वेळ पोहणें, पळणें, घोड्यावरून फेरफटका करणें, भाल्याची फेंक करणें यांसारख्या व्यवसायांत घालवीत. गरीब लोकांस असल्या श्रमाच्या करमणुकींच्या साधनांची अर्थातच आवश्यकता नसे. हे खेळ सामान्यतः टायबर नदीकांठच्या सार्वजनिक मैदानांत होत असत; व तो झाल्यानंतर मुद्दाम तयार केलेल्या स्नानगृहांत जाऊन उटणीं व सुवासिक तेलें अंगास लावून उष्णोदकस्नान किंवा बाष्पस्नान करण्याची वहिवाट होती. रोमन लोकांस स्नानाची फार आवड होती व गरीब लोक देखील सार्वजनिक स्नानगृहांत जाऊन थोडेसे पैसे देऊन हें सुख अनुभवीत असत. या सार्वजनिक स्नानगृहांचा स्त्रियादेखील उपयोग करीत असें दिसतें.

रोमन लोक जेव्हां नाटकास किंवा सर्कशीस जात नसत तेव्हां ते घराबाहेर पडून रस्त्यांतील मौज पहात पहात चौकाकडे किंवा दुस-या एखाद्या सार्वजनिक ठिकाणीं जात. तेथें एखादा खबरबातम्या जमविणारा कोणी तरी वक्ता उभा राहून तो शहरांतील बादशहासंबंधींच्या किंवा साम्राज्यांतल्या इतर भागांतील बातम्या जमलेल्या लोकांस सांगून त्यांचें मनोरंजन करीत असे. यानंतर साहजिकच त्या ठिकाणीं जमलेल्या लोकांत प्रचलित राजकारणविषयक गोष्टींचा खल होऊन जो तो तत्संबंधीं आपल्या मतांचा उच्चार करीत असे. त्या काळीं वर्तमानपत्रें नसल्यामुळें बातम्या काढणा-या लोकांचा एक वर्गच अस्तित्वांत होता. तो बादशहाच्या व इतर मोठमोठ्या लोकांच्या हालचालींची खडानखडा माहिती ठेवीत असल्याचें दाखवीत असे. ह्या लोकांच्या द्वारें शहरांत ज्या बाजारगप्पा उठत त्यांस आळा घालण्याकरितां बादशहा जितका अधिकाधिक प्रयत्न करी तितका त्यांनां जास्तच ऊत येत असे. लोक आपल्याविषयीं काय बोलतात हें जाणण्यासाठीं बादशहाचे हेर सर्वत्र पसरलेले असल्यामुळें सार्वजनिक ठिकाणीं बादशहाच्या कृत्यांवर टीका करण्यास सामान्यतः लोक कचरत असत. तथापि वेळप्रसंगीं समयोचित कोटि करून स्वतःचा प्राणहि धोक्यांत घालणारे लोक आढळून येत नव्हते असें नाहीं.

ले ख न व्य व सा य व ग्रं था ल यें- होरेस म्हणतो कीं, या काळांत जवळ जवळ प्रत्येक इसमास आपल्या अंगीं लेखनकर्तृत्व आहे असें वाटत होतें. परंतु प्रत्येक इसमास आपले लेख प्रकाशित करण्याची ऐपत असणें शक्य नसल्यामुळें आपले लेख लोकांच्या नजरेस आणण्याच्या हेतूनें कित्येकजण, इतरांकडून टर उडविली जाण्याचीहि परवा न करतां आपले लेख सार्वजनिक ठिकाणीं किंवा इष्टमित्रांत वाचून दाखवित असत. सिनेकाचीं दुःखपर्यवसायी नाटकें उपलब्ध आहेत तीं अशा प्रकारें वाचून दाखविण्याकरितांच लिहिलेलीं असल्यामुळें त्यांची नाटकांचे नियम कडक रीतीनें लावून परीक्षा करणें युक्त होणार नाहीं.

रोम येथें ग्रंथप्रकाशनाचें काम त्या काळांत देखील जवळ जवळ हल्लींइतकेंच जोरांत चालू होतें. हर्क्युलेनिअम येथें जो खासगी ग्रंथसंग्रह सांपडला आहे, त्यावरून तत्कालीन पुस्तकांसंबंधीं बरीच कल्पना करतां येते. त्या वेळच्या खासगी ग्रंथालयांत देखील तीस तीस, बत्तीस बत्तीस हजार पुस्तकें असल्याचे उल्लेख सांपडतात. प्रत्येक पुस्तक पापायरसच्या किंवा चर्मपत्राच्या लांबलचक तुकड्याचें काडीभोंवतीं वळकटी केलेलें एक भेंडोळें असून तें झांकण असलेल्या नळकांड्यांत सुरक्षितपणें ठेविलेलें असे. खासगी लोकांच्या ग्रंथालयांत जर इतकीं पुस्तकें आढळून येतात, तर सार्वजनिक ग्रंथालयांत यापेक्षां कितीतरी अधिक पुस्तकें असलीं पाहिजेत. सीझरचा मित्र आसिनिअस पॉलिओ (मृत्यु ख्रि. पू. ६) यानें पहिलें साव्रजनिक ग्रंथालय स्थापिलें असें म्हणतात. तथापि सार्वजनिक ग्रंथालयास खरें महत्त्व ऑगस्टसच्या वेळेपासूनच आलेलें दिसतें. पब्लिअस व्हिक्टरच्या लिहिण्यावरून रोममध्यें त्या काळीं कमींत कमी २९ तरी सार्वजनिक ग्रंथालयें होतीं असें कळतें. तत्कालीन लोकप्रिय ग्रंथकारांत ओव्हिड, प्रोपर्शिअस व मार्शिअल हे औपरोधिक लेखक; होमर, व्हर्जिल, होरेस हे कवी; व सिसिरो, लिव्हि व प्लिनि हे गद्य लेखक देतां येतील. पुस्तकांत धंदा मुख्यत्वेंकरून रोममध्यें असलेल्या सुशिक्षित ग्रीक गुलामांनींच चालविलेला होता; व रोम शहरांत गुलामांचा भरणा बराच असल्यामुळें, त्या काळीं छापण्याची कला अस्तित्वांत नव्हती तरी पुस्तकें कमींत कमी पांच दिनारांइतक्या स्वल्प किमतींत विकतां येत असत.

ल ग्न वि धी - लग्नाच्या वेळचे धर्मसंस्कार कुमारिकांच्या लग्नांत जितके सविस्तर होत तितके ते विधवाविवाहाच्या वेळीं होत नव्हते. प्राचीन काळीं पुनर्विवाह क्वचितच होत असत, व नंतरच्या काळांतहि ते फारसे लोकप्रिय नव्हते. फेब्रुवारीचा तिसरा आठवडा, मार्चचे पहिले दोन आठवडे व सबंध मे महिना, जूनचे पहिले पंधरा दिवस वगैरे कांहीं दिवस व महोत्सवाचे प्रसंग निरनिराळ्या कारणांसाठीं लग्नास वर्ज मानलेले होते. तथापि हा निषेध विधवांच्या विवाहास लागू नव्हता. त्याचप्रमाणें नव-या मुलीच्या मंडनाचे नियम देखील सर्वस्वीं कुमारिकांकरितांच सांगितलेले आहेत. लग्नाच्या सुरुवातीस देवांची इच्छा जाणण्यासाठीं सूर्योदयापूर्वीं शकुन पाहण्यांत येत असे. शकुन अनुकूल आढळून आल्यास एक पशुयज्ञ करून त्यांत शेळीचा बळी देण्यांत येई. यानंतर निमंत्रित पाहुण्यांसमक्ष वधूवरांनां लग्नास आपली सम्मति असल्याचें जाहीर करावें लागे. हा विधि झाल्यावर एका सुवासिनी स्त्रीकडून वधूचा हात वराच्या हातांत देण्याचा विधि होऊन त्यानंतर एक फलांचा यज्ञ होत असे. हा यज्ञ चालला असतांना वधू व वर हे दोघेहि बळी दिलेल्या शेळीचें कातडें घातलेल्या एका जोडखुर्चीवर बसलेले असत. संध्याकाळ झाल्यावर वर वाजत गाजत वधूस तिच्या सूत काढण्याच्या चरक्यासह आपल्या घरी नेई. वरात घरीं आल्यावर गृहप्रवेशाचा विधि होऊन दुस-या दिवशीं वधूकडून सर्व आप्तेष्टांस मेजवानी देण्यांत येत असे.

स्त्रि यां चा स मा जां ती ल द र्जा - आरंभीं रोमन लोकांत विवाह ही एक मोठी पवित्र संस्था गणली जात होती. ते स्त्रियांनां पुरुषाची विषयवासना तृप्त करण्याचें साधन समजत नसून, विवाहाचा उद्देश राष्ट्र-देवतांची सेवा करण्यासाठीं, रोमन वंशाचा विस्तार करण्यासाठीं व जिंकलेल्या देशांत रोमन सैन्य ठेवण्यासाठीं प्रजोत्पादन करणें हा गणला जात असे. या कडक ध्येयामुळें रोमन लोकांस इतर जातींतील लोकांशीं अर्थातच विवाहसंबंध करतां येत नव्हता. परंतु रोमन लोकसत्ताकाच्या जेव्हां पूर्वेकडे मोहिमी होऊन रोमन सैनिकांचे अथेन्स, सेमॉस किंवा एफिसस येथें हिवाळ्यांत तळ पडूं लागले, तेव्हां आल्बा येथील किंवा व्हॉल्शिअन टेकड्यांतील या अडाणी शेतक-यांच्या सुशिक्षित ग्रीक स्त्रियांशीं संबंध येऊन या स्त्रियांच्या अंगच्या गुणांनीं त्यांचे डोळे दिपून गेले. या स्त्रियांशीं कायदेशीर विवाह करणें त्यांस शक्य नव्हतें, व प्रचलित वेडगळ समजुतींमुळें आपल्या देशच्या स्त्रियांस चांगल्या प्रकारचें शिक्षण देऊन त्यांचा दर्जा वाढविण्याचीहि कल्पना त्यांच्या डोक्यांत कधीं आली नाहीं. यामुळें पूर्वींच्या काळीं जेथें एखादा कठोर हृदयी सेनापति त्याचा सैनिक परस्त्रीच्या मोहांत गुंतलेला आढळून आल्यास त्याच्या जेवणाच्या जागीं त्या स्त्रीच्या देखत त्याचें डोकें उडविण्याची शिक्षा देत असे, तेथें आतां रोमन जिल्हाधिकारी उघडपणें स्वारींत आपल्या अंगवस्त्रास घेऊन फिरूं लागले.

या गोष्टींचा रोमन लोकांच्या नीतिमत्तेवर फारच वाईट परिणाम झाला. ग्रीक स्त्रिया रोमन लोकांस आवडूं लागल्यामुळें ग्रीक वारयोषितांचा रोम शहरांत सुळसुळाट झाला; व विवाहसंस्थेबद्दल अनादर उत्पन्न होऊन वैवाहिक जबाबदारी टाळण्याकडे रोमन लोकांची प्रवृत्ति होऊं लागली. उलटपक्षीं स्त्रियांनांहि आपल्या गुलामगिरीच्या स्थितीचा वीट येऊन विवाह नकोसा झाला. कारण स्त्रिया म्हणजे पुरुषांच्या मालकीच्या जणूं काय निर्जीव वस्तूच आहेत अशी त्यांची रोमन समाजांत स्थिति झाली होती. लहानपणीं त्यांच्यावर बापाची मालकी असे, तर वयांत आल्यावर ती मालकी बापाकडून नव-याकडे जात असे. एवढेंच काय ते. त्यांनीं लहानसा अपराध केला तरी त्यांची नव-यापुढें किंवा चारचौघां इष्टमित्रांपुढें चौकशी केली जात असे. त्यांना परपुरुषाशीं संबंध ठेवल्याच्या संशयावरून नव-याच्या हातचा मार खावा लागे, व कधीं कधीं तर त्यांनां इतका बेदम मार बसे कीं त्यायोगे त्यांचा प्राणहि जाई.

रोमन प्रजासत्ताकाचें उत्तरार्ध कौटुंबिक झगड्यांनीं भरलेलें आहे. ख्रि. पू. ३३० मध्यें अनेक पोक्त वयाच्या रोमन स्त्रियांनीं विषप्रयोग करून आपल्या नव-यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचें आढळून येतें. अशा प्रकारच्या १७० स्त्रियांची त्यांच्या आप्तांच्या पंचायतीपुढें चौकशीं होऊन त्यांनां देहान्त शिक्षा देण्यांत आली. पुढील शतकांत स्त्रियांनीं सव्वा तोळ्यापेक्षां अधिक सोनें जवळ बाळगूं नये, रंगारंगांचीं वस्त्रें परिधान करूं नयेत, किंवा गाडींत बसून जाऊं नये, अशा प्रकारचीं त्यांच्यावर बंधनें घालणारा ओप्पियन नांवाचा कायदा झाला. तेव्हां त्यांनीं पुन्हां एक नवीन कट केला असें म्हणतात. परंतु आतां त्यांनीं नव-यांचे खून पाडण्याच्या भरीस न पडतां त्यांच्याशीं अबोला धरून प्रजोत्पादनाच्या बाबतींत त्यांची निराशा करण्याचें ठरविलें. यानंतर अर्ध शतकानें लेक्सओकोनिआ नांवाचा स्त्रियांचा वारसाचा हक्क काढून टाकणारा अत्यंत जुलुमी कायदा करण्यांत आला. व्यवहारांत या कायद्याची कडक रीतीनें अंमलबजावणी होऊं शकली नाहीं. तरी स्त्रीपुरुषांचा एकमेकांविषयीं मत्सर इतका वाढला कीं, कॅटिलायरेनिअन कटाच्या वेळीं नव-यांचा नायनाट करून देशांत मोठी क्रांति घडवून आणण्याच्या उद्देशानें राजद्रोही लोकांस शेंकडों विवाहित स्त्रियांकडून पैसा पुरविला गेला होता अशी पुरुषांत अफवा पसरली होती.

प्राचीन काळीं रोमन लोकांत अविवाहित राहणें हा कायद्यानें गुन्हा ठरविण्यांत आला होता. ख्रि. पू. पांचव्या शतकाच्या अखेरच्या एका उल्लेखावरून निदान तोंपावेतों तरी असल्या गुन्ह्याबद्दल चौकशी होऊन अपराध्यास शिक्षा होत होती असें दिसतें. हा कायदा पुढें सौम्य करण्यांत येऊन बक्षिसें देऊन विवाहास उत्तेजन देण्यांत येऊं लागलें. अशा प्रकारच्या बक्षिसाचा उल्लेख ख्रि. पू. १९९ साली 'सेन्सॉर' च्या जागीं असलेल्या सिपिओच्या भाषणांत प्रथम आढळतो. तथापि या दोन्हीहि उपायांचा कांहीं परिणाम झाला नाहीं. ख्रि. पू. १३१ सालीं, 'सेन्सॉर' असलेल्या मिटेलस मॅसिडोनिकस नांवाच्या पुरुषानें सेनेटमध्यें रोमन लोकांची संख्या दिवसानुदिवस झपाट्यानें कमी होत आहे अशी भीति व्यक्त केली होती. एवढा मोठा सीझर पण त्यालाहि रोमन लोकांच्या वैवाहिक जबाबदारी टाळण्याच्या वाढत्या प्रवृत्तीस आळा घालतां आला नाहीं. सरते शेवटीं ऑगस्टसनें वयांत आलेल्या सर्व पुरुषांनीं लग्न केलेंच पाहिजे असा सेनेटकडून कायदा पास करून घेतला. योग्य वधू शोधून लग्न जुळविण्यासाठीं म्हणून त्यानें लोकांस तीन वर्षांची मुदत दिली. परंतु तीन वर्षे संपलीं तेव्हां ती मुदत आणखी दोन वर्षे वाढविणें जरूरीचें वाटलें, व त्यानंतरहि पुढें अनेक वेळां अशाच रीतीनें मुदती वाढविण्यांत आल्या. त्यानें रोमन लोकांची वैवाहिक नीतिमत्ता सुधारण्यासाठीं कोणाहि स्वतंत्र झालेल्या स्त्रीशीं केलेलें लग्न कायदेशीर ठरविलें, व जो कोणी अविवाहित राहील त्याचा वारसाचा हक्क काढून घेण्याचा कायदा केला. एवढेंच करून तो थांबला नाहीं, तर एखादा इसम विवाहित असूनहि निपुत्रिक असला तरी देखील त्याच्या वारशाच्या रकमेपैकीं अर्धी रक्कम सरकारांत दंडादाखल जमा केली जावी असा त्यानें दुसरा एक ठराव करून घेतला. उलट पक्षीं मुलेंबाळें असणा-या इसमास सार्वजनिक ठिकाणीं मान मिळत असे. व सरकारी नोकरींतहि असा इसम निपुत्रिकांपेक्षां अधिक लायक समजला जात असे. परंतु ऑगस्टसनें विवाहासंबंधीं इतके कडक कायदे केले तरी त्यांचा फारसा उपयोग झाला नाहीं. कारण, धूर्त रोमन लोक कायद्याच्या कक्षेंत न येण्यासाठीं अनेक युक्त्या प्रयुक्त्यांचा उपयोग करूं लागले. सक्तीच्या विवाहाच्या कायद्यांतून सुटण्यांकरितां रोमन लोक नांवाला लग्न करून नंतर काडीमोड करूं लागले. तेव्हां अशा लोकांसहि पुन्हां कायद्याच्या कक्षेंत आणण्याकरितां नवीन नियम करावे लागले. शिवाय लोकांनां लग्न करण्यास भाग पाडण्याकरितां स्त्रीपुरुषांच्या बेकायदेशीर संबंधास कडक शिक्षा ठरविण्यांत आल्या. इतकेंच नवहे तर अशा प्रकारचे गुन्हे कमी करण्यासाठीं, असिक्रीडकांच्या सामन्यासारख्या प्रसंगीं जेव्हां स्त्रीपुरुषांनां एकत्र मिसळण्याची संधि मिळते तेव्हां स्त्रियांस पुरुषांच्या मागील रांगांत बसविण्याची व्यवस्था केली गेली, व कुस्त्यांच्या किंवा मुष्टियुद्धांच्या प्रसंगीं तर त्यांनां पहावयास येण्याचीच मनाई करण्यांत आली.

बा पा चे अ धि का र व मु लां चें दा स्य त्व - बायकासंबंधांत रोमन कायदा ग्रीक कायद्याइतकाच वाईट असला, तरी मुलांसंबंधांत मात्र तो ग्रीक कायद्याहूनहि अधिक वाईट होता. ग्रीक कायद्याप्रमाणें मुलगा ठराविक वयाचा झाल्यावर, लग्न झाल्यावर किंवा त्याला नागरिकत्वाचे हक्क मिळाल्यावर त्यावर बापाची सत्ता चालत नसे. मुलगा यांपैकीं कोणत्या तरी रीतीनें स्वतंत्र होण्यापूर्वींहि फार झालें तर बाप त्याला घराबाहेर काढूं शकत असे किंवा आपल्या मागें आपली मालमत्ता त्यास मिळूं नये अशी व्यवस्था करूं शकत असे. उलट पक्षी रोमन समाजांत बाप हयात असेपर्यंत त्याची आपल्या मुलांमुलींवर अप्रतिबंध सत्ता चालत असे; व ती इतकी कीं, मूळ रोमन कायद्याप्रमाणें रोमन कुटुंबांतील कर्त्या पुरुषास आपल्या पाल्यास विकण्याचा किंवा योग्य वाटल्यास त्याचा जीवहि घेण्याचा हक्क होता. तथापि, रोमन इतिहासांत बापानें आपल्या मुलास निर्दयपणाच्या शिक्षा केल्याचीं जरी अनेक उदाहरणें आढळतात, तरी त्याला देहान्त शिक्षा केल्याचा कोठें उल्लेख आलेला नाहीं; व बादशाही काळांतल्या २०० व्या वर्षी तर बापाचा हा हक्कच मुळीं कायद्यानें काढून घेण्यांत आला. हीच स्थिति मुलांचा विक्रय करण्याच्या हक्कासंबंधीहि दिसते; व ज्या अर्थी बापानें मुलांचा विक्रय केल्याचें लेखनिविष्ट झालेलें एकहि उदाहरण आज उपलब्ध नाही त्या अर्थी तो हक्कहि प्राचीन काळींच काढून घेण्यांत आला असावा.

बापाच्या मृत्यूनंतर त्याच्या वयांत न आलेल्या मुलाचें, किंवा वयांत येऊनहि बुद्धिभ्रंशासारख्या कांहीं कारणांमुळें वडिलार्जित संपत्तीचा उपभोग घेण्यास असमर्थ असलेल्या मुलाचें पालकत्व त्याच्या दुस-या एखाद्या नातेवाइकाकडे जात असे. कुटुंबांतील बायामंडळींपैकीं मयत इसमाची बायको व लग्न न झालेल्या पण वयांत आलेल्या मुली यांनां स्वतःची मालमत्ता उपभोगण्याचा हक्क असे; परंतु कायद्यासंबंधीं सर्व व्यवहार त्यांनां आपल्या पालकामार्फतच करावे लागत. वर दिलेल्या या मूळच्या नियमांत हळू हळू पुढें कायद्यानें सुधारणा घडवून आणण्यांत आली. पहिली सुधारणा म्हटली म्हणजे आपल्या मागून आपल्या कुटूंबांतील मंडळींचें पालकत्व कोणाकडे जावें हें प्रत्येकास मृत्युपत्र करून ठरवितां येऊं लागलें. ख्रि. पू. दुस-या शतकांत मयतानें मृत्युपत्रांत अशी इच्छा दर्शविली तर त्याच्या विधवेसहि आपल्या इच्छेनुरूप आपला पालक निवडतां येऊं लागला. पुढें ऑगस्टसनें असा कायदा केला कीं, तीन मुलें असलेल्या रोमन विधवेस किंवा चार मुलें असलेल्या स्वतंत्र झालेल्या स्त्रीस नव-यामागे पालकाची कांहीं गरज नाहीं. यानंतर डायोक्लीशिअनच्या काळांत तर पतीच्या निधनानंतर स्त्रियांस आपल्या मुलाबाळांचेंहि पालकत्व स्वतःकडे ठेवण्याचा हक्क प्राप्त झाला. मुलांच्या पालकत्वासंबंधीं मात्र याच्या अगदीं उलट दिशेनें सुधारणा करण्यांत आली. मुलास स्वातंत्र्य देण्याच्या ऐवजीं कायद्यानें पाल्यासंबंधीं पालकांचीच जबाबदारी अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला; आणि मुलाची वयांत येण्याची मर्यादा पूर्वी १४ होती तेथें आतां २५ करण्यांत आली. या बाबतींत कायद्यानें व्यक्तिस्वातंत्र्याइतकेंच कुटुंबाच्या एकंदर हिताहिताकडेहि लक्ष ठेविलेलें होतें. तथापि, व्यक्तिस्वातंत्र्याचे हे नियम समाजाच्या फारच लहान भागास लागू होते. रोमच्या लोकसंख्येंत गुलामांचाच भरण मोठा असून, व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतींत घडून आलेल्या सुधारणेपासून त्यांनां कांहींएक फायदा झाला नव्हता.

गु ला म गि री ची चा ल - मोठ्या रोमन माणसाच्या घरांत जे गुलाम असत त्यांचे दोन प्रकार होते. एक विकत घेतलेला गुलाम व दुसरा गुलाम बाप व गुलाम आई यांच्यापासून झालेला गुलाम मुलगा. ह्या दुस-या प्रकारच्या गुलामांस व्हर्नी असे म्हणत व त्यांचा दर्जा विकत घेतलेल्या गुलामांपेक्षां अधिक समजला जात असे. मोठमोठ्या अमीरउमरावांजवळ हजारों गुलाम असत. त्यांच्यामधील जन्ममृत्यूची किंवा त्यांच्या विक्रीची मालकास रोजच्या रोज वर्दी देण्याकरितां देखील एका स्वतंत्र इसमाची गरज लागत असे. ह्या गुलामांत निरनिराळ्या देशचे गुलाम असत व निरनिराळ्या देशच्या गुलामांची लायकी निरनिराळ्या कामांसाठीं प्रसिद्ध होती. ग्रीसमधून मुख्यत्वेंकरून व्याकरणकार व ग्रंथकार येत. आशियांतील लोक वाद्यें वाजविण्यांत किंवा स्वयंपाक करण्यांत कुशल असत. इजिप्तमधून येणारीं सुंदर मुलें आपल्या मधुर भाषणानें धन्याची करमणूक करण्याचें काम करीत. आफ्रिकन लोकांचा सामान्यतः धन्याच्या पालखीपुढें धांवून वाट मोकळी करण्यासाठीं उपयोग केला जात असे. जर्मन गुलाम हे खूप धिप्पाड व उंच असत व त्यांचा उपयोग सार्वजनिक सामन्यांतील द्वंद्वयुद्धांत स्वतःचा जीव गमावून रोमन लोकांची करमणूक करावी हाच काय तो समजला जात होता.

एवढ्या सर्व गुलामांचें पोट भरणें ही कांहीं सोपी गोष्ट नव्हती. या सर्वांनां काम पुरविण्यासाठीं रोमन उमरावांनां सर्व प्रकारचे कारखाने आपल्या घरींच ठेवावे लागत. हे लोक शेतांत काम करून आपल्या धन्याच्या अगडबंब कुटुंबास लागणारें सर्व धान्य पिकवीत व दररोज लागणा-या बहुतेक सर्व वस्तू ते स्वतःच घरीं तयार करीत. रोमन लोकांत अफाट साम्राज्यावर राज्य करण्यास लायक असलेले अनेक लोक निर्माण झाले याचें कारण, प्रत्येक उमरावाचें घर हें एक लहानसें राज्यच असल्यामुळें त्यांच्यावर देखरेख ठेवण्यांत आपोआपच उपर्युक्त कामासाठीं लागणारे गुण अंगीं येत असत. मध्यम स्थितींतील लोकांजवळ देखील त्यांच्या ऐपतीच्या मानानें बरेच गुलाम असत. मार्कस स्कॉरस हा पुढें चांगला नांवारूपास आलेला पुरुष आरंभीं अगदीं गरीब होता. त्याच्या बापानें आपल्या मागें सारा ३००० रुपयांइतका ऐवज ठेवला होता. तथापि त्याला त्याच्या बापापासून मिळालेल्या गुलामांची संख्या मात्र त्या मानानें पुष्कळच अधिक म्हणजे दहा होती. आज तीन हजार रुपये बाळगून असलेल्या इसमाजवळ दहा चाकर असूं शकतील अशी आपणांस कल्पनाहि करतां येत नाहीं. दुसरें उदाहरण होरेस कवीचें आहे. हा कवि सर्वस्वीं दुस-याच्या आश्रयावरच अवलंबून होता. त्याला खावयास जाडीभरडी भाकरीच मिळत असे; तरी जेवतांना त्याच्या तैनातीस तीन चाकर असत. याचें कारण मनुष्याची योग्यता त्या काळीं त्याच्या पदरीं असलेल्या गुलामांवरून ठरत असे. बड्या लोकांजवळ अनेक गुलाम असल्यामुळें त्याच्या अवयवांची सर्व कामें या गुलामांनींच वांटून घेतल्यासारखें झालें होतें. पाहुण्यास दार उघडण्यास चाकर निराळा, त्याला आंत नेण्यास चाकर निराळा, त्याची वर्दी देण्यास चाकर निराळा, पडदा बाजूस सारण्यास चाकर निराळा, जेवणाची ताटें आणण्यास चाकर निराळा, मालकाअगोदर पदार्थाची चव पहाण्यास चाकर निराळा, व ते पाहुण्यांच्या हातांत देण्यास चाकर निराळा, अशी रोमन अमीरउमरावांच्या घरांत विचित्र स्थिति होती ! यामुळें तो आळशी, निरुत्साही, भित्रा, बायकी व झोंपाळू बनला. घरांतील कोणत्या एखाद्या वस्तूचा तो जास्त उपयोग करीत असेल , तर तो कोचांचा होय. निजण्यास कोच, खाण्यास कोच, वाचण्यास कोच, व विचार करण्यासहि त्याला कोच लागत असे. रोमन लोकांच्या तैनातीस असेल्या या गुलामांनींच त्यांनां पुढें सीझरांचे गुलाम केले अशी जी म्हण आहे ती कांहीं खोटी नाहीं.

गु ला मां ची वा ग णू क - अँटोनायनसच्या काळापर्यंत गुलाम लोकांसंबंधीं रोमन लोकांत फार निर्दय कायदे होते. कायद्याप्रमाणें धनी आपल्या गुलामांचें वाटेल तें करूं शकत असे. त्याला आपल्या गुलामास मारण्याचा, विकण्याचा किंवा जीवहि घेण्याचा हक्क होता. परंतु व्यवहारांत गुलामांची स्थिति या कायद्यावरून आपणांस वाटते तेवढी वाईट नव्हती. शेतावर काम करणा-या गुलामांस अगदीं गुराप्रमाणें वागविण्यांत येत असें हें खरें. त्यांनां रात्रीच्या वेळीं गोठ्यासारख्या जागेंत कोंडून ठेवण्यांत येत असे; व त्यांनीं पळून जाऊं नये म्हणून दिवसां त्यांनां पायांत बिड्या घालूनच काम करावें लागत असे. येथें त्यांनां किती त्रास होत असेल याची कल्पना सणाच्या दिवशीं त्यांनां सुट्टी मिळत असे तेव्हां ज्या प्रकारें ते आनंदानें आरडण्याओरडण्यांत व नाचण्याबागडण्यांत काळ घालवीत त्यावरून चांगली करतां येते. तथापि शहरामध्यें गुलामास यापेक्षां पुष्कळ चांगल्या रीतीनें वागविण्यांत येत असे. गुलामांस शेतांत काम करण्यास पाठवीत तें सामान्यतः त्यावर मालकाची खपा मर्जी झाली म्हणजे शिक्षा म्हणूनच पाठवीत असत. मालकाजवळ असतांनां गुलामास मालकाला लुटून पैसा जमविण्याची व मालकाची मर्जी संपादून वेळ प्रसंगीं स्वातंत्र्यहि मिळविण्याची बरीच संधि असे. कारण, घराची सर्व व्यवस्था गुलामांच्याच ताब्यांत असे. आपल्या घरांत काय आहे व काय नाहीं याचा पुष्कळदां मालकास पत्ताहि नसे. बादशहाजवळ जे गुलाम असत त्यांची स्थिति तर याहूनहि अधिक चांगली होती. हे अत्यंत गर्विष्ठ व उद्धट असून बादशहाइतकाच आपणांसहि मान दिला गेला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा दिसत असे. बादशहाकडून एखादी गोष्ट करून घ्यावयाची असली म्हणजे अमीरउमरावांनां प्रथम या गुलामांस बराच लांच द्यावा लागत असे. बादशहाच्या पदरचे कांहीं गुलाम तर हुद्दयाच्या जागांवरहि नेमले गेल्याचीं उदाहरणें आहेत. गरिबाच्या पदरीं असलेल्या गुलामांस मात्र आपल्या मालकाबरोबर त्याच्या सर्व हालअपेष्टा सोसाव्या लागत. परंतु गरिबाच्या कुटुंबांत गुलामास या हालअपेष्टांबद्दल प्रेमाचा भरपूर मोबदला मिळत असे. येथें त्याची वागवणूक गुलामापेक्षां इष्टमित्रासारखीच अधिक असे.

गु ला म गि री च्या चा ली चा रो म न स मा जा व र प रि णा म - रोमन समाजाचा अभ्यास करतांना प्रामुख्यानें दृष्टोत्पत्तीस येणारी गोष्ट म्हणजे, ज्या दुर्गुणांनीं अखेर रोमन साम्राज्याचा नाश झाला, त्यांच्या मुळाशीं सर्वस्वीं ही गुलामगिरीची चालच होती ही होय. या गुलामांमुळें वरिष्ठ लोकांत लांचलुपचपतीचे प्रकार कसे अस्तित्वांत आले हें वर दाखविलेंच आहे. ह्या गुलामांमुळें रोमन माणूस आळशी बनला. ह्या गुलामांमुळें त्याच्या शक्तीचा -हास झाला. ह्या गुलामांमुळें मानवी जीविताबद्दल त्याच्या मनांत तिरस्कार उत्पन्न झाला; व तो संवयीनें निष्ठुर बनत गेला. सीझरांच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या चांगल्या लोकांचे झालेले शिरच्छेद लोकांनीं शांतपणे तोंडांतून ब्रहि न काढतां पाहून घेतले याचें कारण असल्या प्रकारच्या हालअपेष्टा त्यांनां मुळींच नवीन नव्हत्या. रोममधील रोमन लोकांविषयीं तिरस्कार वाटत असलेल्या या गुलामांच्या मोठ्या संख्येमुळेंच रोमन लोकांवर सीझरांचा जुलूम शक्य झाला असें म्हणावयास हरकत नाहीं. या गुलामगिरीच्या पद्धतीमुळें रोमन समाजावर जे अनिष्ट परिणाम होत होते ते त्या वेळीं कोणाच्या ध्यानांत आलेले दिसत नाहींत. गुलाम हा माणूसच आहे ही गोष्ट तत्त्ववेत्त्याप्रमाणें कांहीं रोमन लोकांसहि पटली होती. व ऑगस्टसच्या कारकीर्दीत गुलाम लोकांची स्थिति सुधारण्याकरितां कांहीं कायदेहि करण्यांत आले. परंतु या कायद्यांचा मूलतः जे दयाळु स्वभावाचे होते त्यांच्याशिवाय इतरांवर कांहींच परिणाम होऊं शकला नाहीं. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हटली म्हणजे, एकहि जुन्या लेखकाच्या लेखांत गुलामगिरीची चाल कधीं काळीं नष्ट होऊं शकेल असा नुसता संभव दर्शविणारे देखील कोठें शब्द सांपडत नाहींत ही चाल त्यांच्या इतकी हाडींमासीं खिळली होती कीं, मनुष्य तिला अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो त्याला तिचा अभाव असलेल्या समाजाची नुसती कल्पना करणें देखील कठिण झालें होतें.

खे ळ व क र म णु की चे प्र का र - कोणत्याहि जनतेचा खरा स्वभाव तिच्या खेळांच्या स्वरूपावरूनच चांगला व्यक्त होतो. कारण खेळामध्यें मनुष्य व्यवसायाच्या वेळची कृत्रिम बंधनें बाजूस ठेवीत असल्यामुळें त्याच्या ख-या मनोविकारांस पूर्ण वाव मिळालेला असतो. प्राचीन रोमन लोकांच्या खेळांसंबंधी फारच थोडी माहिती आज आपल्यापाशीं आहे. तथापि अशी एक दंतकथा उपलब्ध आहे कीं, रोमन लोकांनां नृत्याची व खेळांची बरीच गोडी होती. महोत्सवाच्या व श्मशानयात्रेच्या प्रसंगीं वाद्यें आवश्यक समजलीं जात असत; आणि जेवणाच्या व दुस-या कित्येक प्रसंगीं गाणीं म्हणण्याचा प्रघात होता. खेळांपैकीं चेंडू फेंकणें व झेलणें, त्याचे टप्पे पाडणें वगैरे चेंडूच्या खेळाचे कित्येक प्रकार त्यांच्यामध्यें प्रचलित होते. एका पक्षानें दुस-या पक्षाकडे चेंडू फेंकावयाचा व दुस-यानें तो आडवून आडवलेल्या जागीं उभें रहावयाचें; नंतर दुस-या पक्षानें पुन्हां अडवलेल्या जागेपासून पहिल्या पक्षाकडे चेंडू फेंकावयाचा व पहिल्याने तो आडवून आडविलेल्या जागीं उभें रहावयाचें; व अशा रीतीनें प्रत्येक पक्षानें आपल्या समोरच्या पक्षास मागें मागें रेटीत नेण्याचा प्रयत्न करावयाचा असाहि एक त्यांच्यामध्यें अनेक जणांनीं मिळून खेळण्याचा चेंडूचा खेळ होता. या चेंडूच्या खेळांत सबंध गांवचा गांव देखील एकदम भाग घेऊं शकत असे. हे खेळावयाचे चेंडू केसांचे किंवा पिसांचे बनविलेले असत. पाँपीच्या वेळीं हवा भरलेला मोठा चेंडूहि उपयोगांत असल्याचें आढळून येतें.

रो म न ना ट क गृ हें व स र्क शी - हल्लींच्या नाटकगृहांत व रोमन नाटकगृहांत मुख्य महत्त्वाचा फरक म्हटला म्हणजे, हल्लींच्या नाटकगृहांत खासगी नाटक मंडळ्यांचे खेळ होतात व ते पाहण्यास ठराविक पैसे भरून तिकिटें घेणा-या मंडळीसच फक्त जातां येतें, तर रोमन नाटकगृहें हीं सार्वजनिक करमणुकीकरितां म्हणून मुद्दाम बांधलेलीं असून त्यांत सरकारी अधिका-यांकडून फुकट खेळ करविले जात व ते खेळ पहाण्यास जाण्याचा आपणास हक्क आहे असे प्रत्येक नागरिक समजत असे. अर्थात् हीं नाटकगृहें तीस तीस हजार मंडळी मावतील एवढीं मोठीं केलेलीं असत. या ठिकाणीं होणा-या नाटकांत नट पितळेच्या ओठाचे मुखवटे व उंच टांचांचे जोडे घालून रंगभूमीवर येत; व हीं हालतीं चालतीं बाहुलीं जुन्या दुःखपर्यवसायी नाटकांतील संभाषणें लोकांपुढें पाठ म्हणून दाखवीत. त्या वेळच्या सुप्रसिद्ध नटांत कांहीं रोमन नांवें आढळून येतात, तरी मुख्यत्वेंकरून त्यांत ग्रीक लोकांचाच भरणा जास्त होता. बाथिलस व पिलाडीझ हे दोन तत्कालीन लोकप्रिय नट होते. तथापि, या नाटकगृहांत जमणा-या सामान्य जनतेची अभिरुचि असल्या केवळ नीरस संभाषणांनीं तृप्त होणें शक्य नव्हते. यामुळें असल्या दोन खेळांच्या दरम्यानच्या अवकाशांत गारुडी, विदूषक, दोरीवरून चालणारे, मुष्टियुद्ध करणारे वगैरे लोकांच्या झुंडीच्या झुंडी रंगभूमीवर येऊन प्रेक्षकांचें मनोरंजन करीत असत. एवढेंच नव्हे, तर अत्यंत अश्लील प्रकारचे देखावे देखील लोकांच्या करमणुकीकरितां या रंगभूमीवरून दाखविले जात असत. लोकांच्या अनाचारी मनोवृत्तीस आळा घालण्याकरितां कायदेपंडितांनीं आपल्याकडून कायदे करून ठेविले होते; पण त्यांतहि पैशासाठीं लोकांसमोर नग्न स्थितींत येणें हें हलकटपणाचें आहे, एवढाच काय तो असल्या प्रकारच्या खेळास आक्षेप घेण्यांत आला होता.

संपत्तीमुळें व वैभवामुळें दिवसानुदिवस रोमन लोकांस अधिकाधिक भपक्याची आवश्यकता वाटूं लागली. शूर व बुद्धिमान् ट्रिब्यून क्यूरिओ यानें कांहीं यांत्रिक रचना करून नाटकाचें काम झाल्यावर चाकांवर फिरणारी अर्धवर्तुलाकार दोन लांकडी नाटकगृहें समोरासमोर आणून त्यांचा असिक्रीडकांच्या सामन्यासाठीं अँफिथिएटरप्रमाणें उपयोग करण्याची जी शक्कल काढली ती अर्वाचीन स्थापत्यशास्त्रज्ञांसहि तोंडांत बोट घालण्यास लावण्याइतकी अचाट आहे. जूलिअस सीझरच्या वेळचें अँफिथिएटरहि लांकडीच होतें, आणि तें व त्याच्या पूर्वीचीं अँफिथिएटरें काम झाल्यावर मोडून टाकण्यांत येत असत असें दिसतें. ह्या नाटकगृहांवर व अँफिथिएटरांवर प्रेक्षकांचें उन्हापासून संरक्षण करण्याकरितां कापडाचें छत लावलेलें असे. नाटकगृहाची कायमच्या उपयोगाची दगडी इमारत प्रथम पाँपीनें बांधिली, व दगडी अँफिथिएटर बांधण्याचें श्रेय ऑगस्टसचा दुय्यम सेनापति स्टाटिलिअस टॉरस यास आहे.

अँफिथिएटरचा प्रकार जरी रोमन लोकांत नवीन होता तरी जिच्या पूरणार्थ तें अस्तित्वांत आलें त्या सर्कशीची स्थिति तशी नव्हती. ती रोमन लोकांत प्राचीन काळापासून प्रचारांत असून तींत घोड्यांच्या व रथांच्या शर्यती, शिकार वगैरे प्रकार होत असत. या वार्षिक शर्यतींच्या खेळांसाठीं सभोवतीं ठेंगणी भिंत घातलेलें एक क्रीडांगण बनविलेलें असे, व पसरलेल्या वाळूवरून त्यास अँरेना हें नांव मिळालें होतें. या क्रीडांगणाच्या तीन बाजूंस आरंभीं आरंभीं मूळचाच एखादा उंचवटा खोदून प्रेक्षकांस बसण्याकरितां जागा बनविण्याची वहिवाट होती. या शर्यतीच्या खेळांची रोमन लोकांस पूर्वींपासून फार आवड होती. या ठिकाणीं निरनिराळे रानटी प्राणी मोकळे सोडून त्यांची पारधहि करण्यांत येत असे. हा प्रकार सहाव्या शतकांत विजयी रोमन सेनापती पूर्वेंकडून आपल्या बरोबर सिंह, हत्ती, जिराफ वगैरे निरनिराळ्या प्रकारचे चित्रविचित्र प्राणी आणूं लागले तेव्हांपासून प्रचारांत आलेला दिसतो. सेनापतीची लोकप्रियता त्यानें लोकांस दाखविण्याकरितां आणलेल्या चित्रविचित्र पशूंच्या संख्येवरच अवलंबून असल्यामुळें अमीरउमरावांची आपसांत परदेशांतून कोण अधिक पशू आणतो अशी जणूं काय अहमहमिकाच लागलेली दिसत होती.

अ सि क्री ड कां चे (ग्लॅ डि ए ट र्स चे) घो र सा म ने -  असिक्रीडकांच्या युद्धाची चाल कशी प्रचारांत आली हें जरी नक्की सांगता येत नाहीं, तरी तिचा उपक्रम रोमन लोकांत प्रथम ख्रि. पू. २६४ मध्यें मार्कस व डेसिमस ब्रूटस यांनीं आपल्या पित्याच्या अंत्यविधीच्या वेळीं असिक्रीडकांचें द्वंद्वयुद्ध करविलें तेव्हांपासून झालेला दिसतो. रोमन लोकांनां हा प्रकार इतका आवउला कीं, रोमन अमीरउमरावांची सर्व संपत्ति व अक्कल आपल्या लोकांच्या करमणुकीसाठीं सर्कशींतील रानटी पशूंच्या व मानवी प्राण्यांच्या कत्तली घडवून आणण्याच्या कामी खर्च होऊं लागली. पाँपीनें एका दिवसांत क्रीडांगणांत सहाशें सिंह आणलें. ऑगस्टसनें ४२० चित्त्यांचें लोकांपुढें प्रदर्शन करून त्यांची करमणूक केली. प्लिनी सांगतो कीं एकदां वीस हत्तींनां सहाशें कैद्यांबरोबर लढावयास लाविलें होतें. ट्राजननें करविलेले खेळ तीन महिन्यांहून अधिक दिवस चालले होते. वीस हजार असिक्रीडक लढण्यासाठीं क्रीडांगणांत उतरले व वीस हजारांहून अधिक पशू ठार करण्यांत आले. टायटस ह्या लोकप्रिय झालेल्या राजानें पांच हजारांहून अधिक पशूंची एका दिवसांत कत्तल करविली होती. लोकांच्या मनाची करमणूक करण्यासारखा एखादा विचित्र प्राणी मिळविण्यासाठीं जगाचा कोपरानकोपरा घुंडाळण्यांत येत असे. या प्राण्यांचा पुरवठा करण्याच्या कामीं जर कोणीं व्यत्यय आणला, तर रोमन लोकांचा त्याच्यावर भयंकर घुस्सा होई. पुढें थीओडोशिअसच्या वेळीं मात्र आत्मसंरक्षणार्थ देखील सिंहाचा वध करण्याची कायद्यानें मनाई करण्यांत आली.

रोमन लोकांची रक्ताची तहान केवळ रानटी पशूंच्या अंतकालच्या वेदना पाहून शमन होण्यासारखी नव्हती. अगोदर शिक्षण देऊन तयार केलेल्या असिक्रीडकाच दुस-या एका असिक्रीडकाशीं जेव्हां त्यांच्या त्या निर्घृण डोळ्यांसमोर युद्ध चालत असे तेव्हां त्यांनां आनंदाच्या उकळ्यावर उकळ्या फुटत. अशा प्रसंगींच्या अँफिथिएटरमधील देखाव्याचें वर्णन करणें केवळ अशक्य आहे. हीं युद्धें पहात असतां प्रेक्षकसमुदाय आनंदानें अगदीं वेडा होऊन जाई. भाल्याचा, तरवारीचा किंवा सुरीचा वार होऊन खेळाडूच्या अंगांतून रक्ताची चिळकांडी उडाली, कीं ते आपल्या जागेवर उठून उभे रहात, मोठमोठ्यानें ओरडत व टाळ्या पिटीत; वाहवा, काय सफाईचा वार ! असे शब्द दहा हजार लोकांच्या तोंडून एकदम बाहेर पडून सर्व अँफिथिएटर दुमदुमून जाई; व अत्यंत शरमेची गोष्ट म्हटली म्हणजे या नीच कोटीच्या आनंदांत इतर बाजारबुणग्याबरोबर केवळ अमीर उमराव व बादशहाच नव्हेत तर कोमल मनोवृत्तीच्या म्हणून समजल्या जाणा-या स्त्रिया देखील सारखाच भाग घेत असत. एखादा असिक्रीडक लढतां लढतां मेला, की त्याचें शरीर सभोंवती त्या कामासाठीं तयार असलेले नोकर सर्व प्रेक्षकांसमक्ष फरफटत फरफटत बेफिकीरपणें बाजूच्या गर्तेत नेऊन टाकीत, क्रीडांगणांतील वाळूवर जेथें त्याचें रक्त सांडलें असेल तेथें लांकडाचा भुसा पसरला जाई व ताबडतोब त्याच्या जागीं दुसरा बळी आपल्या आहुतीनें प्रेक्षकजनांची करमणूक करण्यास पुढें येत असे. अशा रीतीनें हें किळसवाणें कसाबखान्याचें काम एकसारखें चालत असे. विशेष लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही कीं, या गोष्टी क्वचित् प्रसंगीं किंवा आकस्मिक कारणानें घडत होत्या अशांतला भाग मुळींच नाहीं. त्या मुद्दाम, पद्धतशीरपणें व शांत चित्तानें केल्या जात होत्या. त्या रोमन लोकांच्या रोजच्या व्यवहारांतल्याच गोष्टी होत्या. आरंभीं आरंभीं रानटी पशूंशीं लढण्यासाठीं शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचीच योजना होत असे; परंतु पुढें पुढें या कामासाठीं पगारी स्वयंसेवक नेमण्याची गरज भासूं लागली. सामान्यतः जरी हे असिक्रीडक म्हणजे त्या कामासाठीं विकत घेतलेले असे गुलामच असत, तरी पुष्कळदां भरपूर पगार देऊन स्वतंत्र इसम देखील असिक्रीडकांच्या कामासाठी तयार केलेले आढळून येतात. पुढें पुढें तर रोमन लोकांनां या गोष्टीची इतकी चटक लागली कीं, मोठमोठे अमीरउमराव देखील सभोंवतालच्या हजारों प्रेक्षकजनांची वाहवा मिळविण्यासाठीं स्वतःचा जीव धोक्यांत घालून क्रीडांगणांत उतरूं लागले. या खेळांचा लोकांच्या अंगीं धैर्य उत्पन्न करण्याच्या कामीं उपयोग होतो असें त्यांचें समर्थन केलें जात असे. परंतु त्यांच्या योगें कांहीं शूर खेळाडू निपजत असले तरी, प्रेक्षकांवर तरी त्यांचा फारच वाईट परिणाम होत असे. या खेळांनीं प्रेक्षकांच्या अंगीं धैर्य तर आणलें नाहींच, पण दुस-याच्या हालआपेष्टा पाहून त्याचा कळवळा येण्याची जी मनुष्यांत नैसर्गिक मनोवृत्ति असते ती मात्र साफ नाहींशी केली. त्या काळीं सुद्धां विचारी लोकांस असले खेळ आवडत नव्हते हे खरें. पण रिकामटेकड्या बाजारबुणग्यांनीं मनें गुंतवून राज्यांत शांतता ठेवण्यासाठीं याच काय पण दुस-या कोणत्याहि नीच कोटींतील करमणुकीच्या साधनांस संमति देण्यास ते तयार झाले असते.

वर वर्णिलेल्या अत्यंत क्रूरपणाच्या गोष्टी एक उच्च दर्जाच्या प्राचीन संस्कृतीनें अलंकृत झालेल्या रोमन समाजामध्यें घडल्या असतील हें अलीकडील कोणाहि इसमाला शक्य सुद्धां वाटणार नाहीं. परंतु अनेक कवी, इतिहासकार व तत्त्ववेत्ते यांचे ग्रंथ, त्याचप्रमाणें शेंकडो अँफिथिएटरांचे प्रत्यक्ष पहावयास मिळणारे अवशेष वगैरेंच्या निःसंदिग्ध व भरपूर पुराव्यावरून या बाबतींत संशय घेण्यास तिळमात्र जागा रहात नाहीं. या सर्व तामसी राक्षसी मनोवृत्तींचा पुरावा देणा-या गोष्टी वाचल्या म्हणजे रोमच्या सत्तेचा जो अखेर अधःपात झाला तो यथायोग्यच झाला असें म्हणावें लागतें. ज्या रानटी लोकांनां गुलाम करून त्यांच्याकडून रोमन सत्ताधीश असिक्रीडनाचे प्राणघातक खेळ करवीत असत. त्या रानटी जातींच्या वंशजांनीं रोमन लोकांनां त्यांच्याच खुद्द राजधानींत कंठस्नान घालून यथायोग्य सूड उगविला असें म्हणावें लागतें. स्वतंत्र रोमन नागरिक, रोमन सरदार, रोमन सेनेटर वगैरे सर्व दर्जाचे बादशाही वैभवानें मदांध झालेले रोमन पुरुष आणि रोमन स्त्रियांसुद्धां इतक्या नैतिक अधःपाताप्रत पोंचल्या होत्या कीं, अवाढव्य रोमन साम्राज्यावर सत्ता चालविण्यास सदरहू रोमन समाज यक्तिंचितहि पात्र नव्हता.

रो म न बा द श हां चें सं प्र दा य वि ष य क धो र ण - सामान्य जनतेच्या पारमार्थिक समजुतींत क्रांति घडवून आणणें हें सरकारचें कर्तव्य नाहीं किंवा सरकारी शक्तीच्या आटोक्यांतलेंहि तें नाहीं. तथापि सीझर बादशहांनीं रोमन साम्राज्यांतील मुख्य संप्रदायाधिपति या नात्यानें एकराष्ट्रीय संप्रदाय चालू ठेवणें, व रोम येथें अनेक-दैवत-पूजनाला मोकळीक देणें या दोन परस्परविरोधी गोष्टी करण्याची आकांक्षा धरिली. धार्मिक सुधारणेसंबंधाची दुसरी कोणतीहि कल्पना त्यांच्या डोक्यांत नव्हती. बादशाही धोरणानुसार हळू हळू रोमनें जिंकलेल्या सर्व देशांतील देवतांचें भजनपूजन रोम शहरांतील कॅपिटॉलमध्यें होऊं लागलें. पौरस्त्य देशांतील पारमार्थिक संप्रदायांवर रोमन बादशहांचा विश्वास नव्हता तरी देखील अफाट रोमन साम्राज्यांतील प्रजाजनांच्या संतोषाकरितां रोम येथें रोमन व ग्रीक देवतांबरोबर इजिप्त व आशियामधील देवतांची स्थापना करण्यास परवानगी देणें त्यांनां भाग पडलें. साम्राज्यसंरक्षक अशा एका एकीकरणाच्या प्रयत्‍नामुळें लोकांची ईश्वरश्रद्धा मात्र हळू हळू डळमळीत होत गेली. अनेक उपासनासंप्रदायांची एकत्र खिडकी झाल्यामुळें लोकांत सर्वच संप्रदायांविषयीं अश्रद्धा पसरूं लागली. या अश्रद्धेचा पगडा उच्च दर्जाच्या बुद्धिमान लोकांवर व खुद्द रोमन बादशहांवर अधिक बसला. समाजामध्यें शांतता व स्वस्थता नांदण्याकरितां सामान्य जनतेमध्यें ईश्वरश्रद्धा जागृत असणें अवश्य आहे ही गोष्ट रोमन बादशहा जाणून होते. म्हणून प्रजाजनांच्या धर्मसमजुती न दुखावतील अशी व्यवस्था करण्याचें त्यांनीं धोरण स्वीकारलें. धर्म म्हणजे सामान्य श्रद्धाळू जनतेला फसविण्याचे व ताब्यांत ठेवण्याचें एक साधन असें मानलें जात असे. उच्च दर्जाचे बहुतेक तत्त्ववेत्ते नास्तिक मताचे असत किंवा कांहीं उच्च दर्जाच्या पंथाचे चहाते असत. भोळ्या धर्मसमजूती, ग्राम्य धार्मिक विधी किंवा देवादिकांचे अद्‍भुत चमत्कार यांचा ते उपहासच करीत असत.

स्टो इ सि झ म ना म क त त्त्व ज्ञा न पं थ - वर वर्णिलेल्या रोमन येथील धार्मिक परिस्थितींतील क्रान्तीला स्टोइक पंथ अपकारक होण्याऐवजीं अधिक उपकारकच झाला. स्टोइक पंथानें माणसाच्या मनांत स्वाभिमान व स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ति या दोन गुणांची वृद्धि केली. परंतु हेच दोन गुण रोमन बादशहांनीं चालविलेल्या जुलमी सत्तेला प्रतिकूल होते. त्यामुळें अर्थातच स्टोइक पंथ सीझर बादशहांनां आणि त्यांची खुशामत करून राहणा-या भोंवतालच्या लोकांनां अप्रिय वाटत होता. उलट पक्षीं या पंथाची तत्त्वें उच्च दर्जाच्या बुद्धिमान् व विद्वान् लोकांनां पटून ते त्याचे अनुयायी बनत होते व त्या पंथाच्या तत्त्वांचा पुरसकार करण्याकरितां वाटेल त्या हालअपेष्टा सोसण्यास तयार होते. अशी स्थिति केवळ रोमन शहरांतच नव्हे तर रोमन साम्राज्यांतील दूर दूरच्या प्रांतांतहि थोड्याबहुत प्रमाणांत होती. सर्व जित लोक, रोमन साम्राज्यांत राहिल्यानें होणारे शांतता आणि सुरक्षितता हे फायदे जाणून होते. तथापि पारतंत्र्य आणि रोमन बादशहांचें डोळे दिपविणारें वैभव पाहून विचारी लोकांच्या मनाचा कल स्टोइक पंथांतील स्वाभिमान आणि स्वतंत्रता या दोन गुणांकडे अधिक वळत चालला होता. ही अनुकूल परिस्थिति लक्षांत घेऊन स्टोइक पंथाच्या पुढा-यांनीं आपलीं तत्त्वें समाजामध्यें रुजविण्याकरितां अधिक नेटाचे प्रयत्न सुरू केले. न्याय, विश्वबंधुता, समता, भूतदया, वगैरे तत्त्वांचा प्रसार त्यांनीं चालविला. सेनिका, एपिक्टीटस, मार्कस ऑरीलिअस, प्लुटार्क वगैरे या पंथाचे पुढारी होते. द्वेष, परनिंदा, क्रोध, शत्रुत्व, सूड, इत्यादि दुर्गुणांनां माणसाच्या हृदयांत स्थान मिळूं नये असा त्यांचा उपदेश असे. तामसी मनोविकारांनां बळी न पडतां मनुष्यानें सहिष्णुता, सहानुभूति, प्रेम इत्यादि सदगुणांनीं प्रेरित होऊन एकमेकांशीं वागावें असें ते म्हणत असत.

या स्टोइक पंथाच्या तत्त्वांचा ज्या वेळीं बराच प्रसार झालेला होता अशा वेळीं रोमन साम्राज्यावर एका नव्या संप्रदायानें स्वारी केली.

ख्रि स्ती सं प्र दा य आ णि रो म न सा म्रा ज्य - ख्रिस्ती संप्रदायाची पवित्रता, त्यांतील नैतिक उपदेशाची थोर योग्यता आणि त्या संप्रदायाच्या प्रचारकांचा शुद्ध व कडकडीत जीवितक्रम या गुणांचा पगडा धर्मभ्रष्ट व अनीतिमान् बनलेल्या रोमन समाजावर सहज पडला असेल असें आपणांस वाटतें. शिवाय रोमन साम्राज्यांत अनेक उपासनासंप्रदाय गुण्यागोविंदानें एकत्र नांदावे अशी रोमन बादशहांची योजना असल्यामुळें धर्मसहिष्णुता हा गुण रोमन समाजाच्या अंगवळणीं पडला होता असेंहि म्हणण्यास हरकत नाहीं. तथापि नव्या ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसारास रोमन समाजांत कसून विरोध करण्यांत आला असें इतिहासावरून दिसतें. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर केवळ ७० वर्षांनींच ख्रिस्ती संप्रदायाच्या निरपराधी प्रचारकांनां एका सुस्वभावी रोमन प्रो. कॉन्सलनें मरणाची शिक्षा ठोठावली. ट्राजननंतरच्या अनेक रोमन बादशहांनीं अनेकदां फर्मानें काढून ख्रिस्ती लोकांनां कायदेबहिष्कृत ठरविलेलें आढळून येतें. रोमन बादशहांनीं आणि गव्हर्नरांनीं यरुशलेम शहर आणि तेथील ख्रिस्ताचें पवित्र देवालय अनेकदां उध्वस्त केलें. उलट पक्षीं यहुदी लोकांनीं रोमन सार्वभौमत्वाचें जूं झुगारून देण्याकरितां अनेकदां बंडें केलीं, पण यहुद्यांविरुद्ध युद्धांत जय मिळविल्यावर रोमन बादशहांचा राग शांत होत असे आणि यहुदी लोकांनां त्यांच्या धर्मसहिष्णुतेचा लाभ घडत असे. यहुदी लोक आणि ख्रिस्तपंथी लोक यांनां वागविण्यांत रोमन बादशहा अशा प्रकारचा पक्षपात कां करीत असत याचें कारण अगदीं उघड व स्पष्ट आहे. तें असें कीं, यहुदी लोक म्हणजे एक राष्ट्र मानलें जात असे, आणि त्या राष्ट्रानें रोमचें सार्वभौमत्व कबूल केलें कीं रोमन लोक संतुष्ट असत. उलट पक्षीं ख्रिस्ती लोक म्हणजे एक नवा पंथ होता; व तो पंथ रोमन साम्राज्यांतील इतर पंथांनां नष्ट करून त्यांची जागा स्वतः पटकावण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळें अर्थातच पूर्वपरंपरागत धर्मसमजुतींबद्दल अभिमानी असलेली रोमन जनता ख्रिस्ती संप्रदायप्रचारकांनां शत्रुवत् लेखूं लागली, व त्यांचा नायनाट करण्याकरितां रोमन साम्राज्यांत जोराचा प्रयत्न करण्यांत आला.

ख्रि स्ती लो कां चा छ ळ- ख्रिस्ती लोकांची सांप्रदायिक मंडळें व संघ असल्यामुळें त्यांचा नायनाट करण्याचें काम फार कठिण होतें. शिवाय रोमन लोक कायदेप्रिय असल्यामुळें ख्रिस्ती लोकांनां कायद्याच्या कलमांत पकडून योग्य पुराव्यानिशीं आरोप शाबीत केल्याशिवाय शिक्षा करणें त्यांनां लांछनास्पद वाटे. धर्मच्छळाच्या बाबतींत प्राचीन व अर्वाचीन बादशहांची तुलना करतां रोमन बादशहा पेक्षां पांचवा चार्लस, किंवा चौदावा लुई हे अधिक क्रूर व अत्याचारी ठरतात. रोमन बादशहांनीं केलेल्या ख्रिस्ती लोकांच्या छळाचा एकंदर इतिहास पाहतां असें स्पष्ट दिसतें कीं, (१) प्रथम बरेच दिवस रोमन सरकारचें ख्रिस्ती पंथाकडे लक्षच गेलें नव्हतें; (२) पुढें धर्मच्छळ सुरू झाल्यावर ख्रिस्ती लोकांवर खटले फार सावधगिरीनें व नाखुषीनें करण्यांत येऊं लागले; (३) त्यांनां दिलेल्या शिक्षा ब-याच सौम्य असत; आणि (४) ख्रिस्ती संप्रदायाला मधून मधून बरेच शांततेचे दिवस लाभले होते.

रोमन बादशहा नीरो याच्या कारकीर्दींत ख्रिस्ती लोकांचा प्रथम छळ झाला. याच्या कारकीर्दींत रोम शहराला आग लागली. तें आग लावण्याचें कृत्य ख्रिस्ती लोकांनीं केलें असा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांनां अनेक प्रकारच्या क्रूर शिक्षा देण्यांत आल्या. ''कांहींनां खिळे मारून 'क्रूसला' टांगण्यांत आलें, कांहींच्या अंगाला ज्वालाग्राही पदार्थ फांसून अंधा-या रात्रीं पलित्याप्रमाणें जाळून त्यांचा उजेडाकरितां उपयोग करण्यांत आला, व कांहींनां रानांतील जनावरांच्या कातड्यांत गुंडाळून भयंकर शिकारी कुत्र्यांच्या तावडींत देण्यांत आलें,'' असें टॅसिटसनें लिहून ठेविलें आहे.

ख्रिस्त्यांच्या धर्मच्छळाला सुरुवात ट्राजन बादशहाच्या कारकीर्दीत झाली; व तो छळ हेड्रिअन, अँटोनायनस पायस व मार्कस ऑरीलिअस यांच्या कारकीर्दींत तसाच चालू होता.