प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

काँग्रेसमधील पक्ष. - इ. स. १९०७ च्या सुतरच्या बखेड्यापूर्वींच काँग्रेसमध्यें पक्षभेद दिसून येत होता. बंगालची फाळणी झाल्यानंतर बहिष्काराची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीचा हेतू असा कीं जर सरकार लोकपक्षाचें म्हणणें ऐकत नसेल तर लोकांनीं प्रतिकार करावा व तो करण्यासाठीं बहिष्कार हें शस्त्र उपयोगास आणावें. बहिष्काराची चळवळ जी बंगाल्यांत सुरु झाली तिचें १९०६ सालच्या काँग्रेसनें समर्थन केलें. या सुमारासच देशांत चोहोंकडे सरकारविषयीं विरुद्ध मत जोरानें फैलावूं लागलें. सरकारच्या अनेक कृत्यांविषयीं संशय प्रदर्शित होऊं लागला. या कालांत तत्त्वभेदापेक्षां प्रकृतिभेदामुळें समाजांत मवाळ आणि जहाल असे दोन पक्ष तयार झाले आणि या दोन पक्षांत १९०७ सालीं सुरतेस खटका उडाला, आणि काँग्रेसमधून जहालपक्ष बाहेर पडला. जहाल उर्फ राष्ट्रीय पक्षास आपली स्वतंत्र काँग्रेस बनवितां आली नाहीं. पण हा पक्ष बाहेर पडल्यानें काँग्रेसला अत्यंत दौर्बल्य प्राप्त झालें व तिजविषयीं चोहोंकडे उदासीनता पसरली. ती इतकी कीं, १९१२ सालच्या बांकीपूरच्या काँग्रेसला जमलेले प्रतिनिधी २०० देखील नव्हते. त्यानंतर मवाळ व जहाल यांच्या समेटाचा प्रयत्‍न करण्यांत येऊं लागला आणि त्यामुळें १९१४ सालच्या मद्रासच्या काँग्रेसला आणि १९१५ सालच्या मुंबईच्या काँग्रेसला बराच जोर मिळाला. मुंबईच्या काँग्रेसमध्यें राष्ट्रीय पक्षाच्या भावनेला मान देणारा एक ठराव पास झाल्यामुळें पुढें राष्ट्रीय पक्षानें काँग्रेसमध्यें जाण्याचें ठरविलें. लखनौ, अमृतसर इत्यादि ठिकाणीं राष्ट्रीय पक्षाचा जोर फार झाला व पुढें मवाळ उर्फ प्रागतिक उर्फ नेमस्तपक्ष हा काँग्रेसमध्यें अधिकाधिक दुर्बल झाला, आणि सध्यां तो बाजूस राहिल्यासारखा झाला आहे.

नेमस्त पक्षांतील पुढारी नामदार गोखले हे १९१५ च्या फेब्रुवारी महिन्यांत मृत्यू पावले आणि सर फेरोजशहा मेहेता हेहि नंतर थोडक्या काळांतच वारले. या गोष्टी नेमस्तपक्ष बराच कमजोर करण्यास कारण झाल्या. १९२० सालीं आगस्टच्या पहिल्या तारखेस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचें देहावसान झालें. या कारणानें १९२० च्या सप्टेंबर महिन्यांत भरलेल्या जादा काँग्रेसमध्यें पुष्कळ लोकांस आपल्या मताप्रमाणें चालवूं शकणारा पुढारी महात्मा गांधी यांशिवाय दुसरा कोणी उरला नाहीं. महात्मा गांधी यांचा असहकारितेचा ठराव लोकमान्य असते तर बराच निराळ्या स्वरूपांत पास झाला असता असें कांहीं लोकांचें मत आहे. देशास नवीन मिळालेल्या राज्यपद्धतीमुळें निरनिराळे पक्ष आपआपली मतमालिका प्रसिद्ध करूं लागले होते. इतर पक्षांबरोबर काँग्रेस डेमोक्रॅटित पक्षानेंहि आपला कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. पण असहकारितेच्या तत्त्वामुळें काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाचा कार्यक्रम अगदींच बाजूस पडल्यासारखा झाला आहे. असो.

आयर्लंडांत स्वतंत्र लोकसत्तात्मक राज्य स्थापन करण्यासाठीं चालू असलेली चळवळ आणि इजिप्तला असहकारितेमुळें आलेलें यश यांच्यामुळें, स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाच्या पुकारामुळें आणि राष्ट्रसंघाच्या घटनेमुळें म्हणजे साम्राज्यांत शांतता राखण्यासाठीं साम्राज्य कोणास तरी जबाबदार असल्यामुळें लोकांच्या स्वराज्यविषयक महत्त्वकांक्षा अधिकाधिक वाढत आहेत. या महत्त्वाकांक्षांस मूर्तस्वरूप येण्यासाठीं एकसारखी चळवळ पाहिजे आहे असें काँग्रेसमधील पुढार्‍यांचें धोरण दिसतें. हिंदुस्थानास स्वराज्यास अधिकाधिक लायक करून अधिकाधिक हक्क द्यावेत या ब्रिटिश मुत्सद्दयांच्या धोरणाची पूर्णता होणें काँग्रेसमधील पुढार्‍यांच्या प्रस्तुतच्या धोरणामुळें शक्य होईल.

एक गोष्ट खरी कीं, लोकांची सत्ता आज पूर्वींच्या मानानें बरीच वाढली आहे आणि ती दिवसानुदिवस अधिकाधिक होत जाईल.